Monday, September 26, 2011

मूर्ती लहान पण दहशत महान

मला कुत्र्यांची पहिल्यापासून आवड! पण इथे सासरी प्राण्यांची आवड कोणालाच नव्हती. एके दिवशी आमच्या माळ्याने कुत्र्याचे एक छोटेसे पिल्लू आणून दिले. गोड, गोजिरवाणे- तसे pedegree नाही ! भटकेच कुत्रे, पण अगदी रुबाबदार, जणू राजाच! म्हणून नाव ठेवले ‘वाघ्या’. आश्चर्य म्हणजे ते आमच्याकडे लगेच रुळले. आमचा स्वतंत्र बंगला असल्यामुळे इमानी राखणदार हवाच होता. ती कामगिरी वाघोबानी चोख पार पाडली. आम्हा घरच्या पाच माणसांव्यतिरिक्त त्याला ‘बाहेरची’ अशी एकच व्यक्ती चालत असे व ती म्हणजे मालती- आमच्याकडे घरकाम करायला येते ती. कारण अधूनमधून ती त्याला लाडका खाऊ आणायची ना! (नॉनव्हेज). तिच्या मुली कधी आल्या तर त्यांच्या अंगावर धावून जायचा. स्वयंपाकीणबाईंच्या हातच्या गरमागरम पोळ्या आवडीने खायचा, पण त्या घरात आल्या रे आल्या की याची भुंकायला सुरुवात! फाटकाची कडी वाजली की हा भुंके. कॉलबेलची गरज त्याच्या हयातीत पडलीच नाही.
वाघ्याला गॅलरीत बांधलेले असायचे- ‘त्याच्या’ सोफ-कम-बेडवर. त्याच्या या बैठकीवर आम्ही बूड टेकताच प्रथम गुरगुरायचा, पण मग बसू द्यायचा- मेहेरबानी केल्यासारखा- इतका पझेसिव्ह. एकदा गंमतच झाली- स्वयंपाकीणबाई आल्या, पण वाघ्या साखळीतून कसा सुटला कोण जाणे! त्यांच्या मागे धावत जाऊन त्यांचे लुगडेच फाडले. त्या बिचाऱ्या खाली पडल्या. तेवढय़ात आम्ही त्याला साखळीत अडकवले म्हणून पुढचा अनर्थ टळला! सगळेचजण खूप हादरलो. बाईंना घरात आणून शांत केले व आमच्याकडील एक लुगडे नेसायला दिले, पण हा आपला आपण त्या गावचेच नाही असे दाखवत पोळ्या खायला हजर! आता बोला! तेव्हापासून वाघ्याला गॅलरीत बंद करून मगच ‘इतर’ लोकांना आत घेत असू. अर्थात ती माणसे ‘आपली’ नाहीत हे तो आम्हाला सांगे. वाघ्याची कीर्ती चोराटोरांपर्यंत पोचली होती, कारण दारं उघडी टाकली तरी घरात प्रवेश करायची टाप नव्हती! वाघ्याचा भुंकतानाचा अभिनिवेश इतका खुनशी असायचा की एरवी हरणासारखा गोंडस दिसणारा वाघ्या क्षणार्धात वाघासारखा व्हायचा. Dr Jekyll and Mr. Hyde सारखा.
त्याला Anti Rabies ची लस टोचायला जेव्हा त्याचे डॉक्टर यायचे तेव्हा त्यांचीही घाबरगुंडी उडायची. ते फाटकाच्या बाहेर इंजेक्शन घेऊन व आम्ही फाटकाच्या आत दोन-दोन साखळदंडांनी वाघ्याला बांधून धरलेले! डॉक्टर फाटकाबाहेरून त्याला आत हात घालून इंजेक्शन द्यायचे. वाघ्या फक्त दीड फूट उंच व दोन-तीन फूट लांब इतका छोटासाच होता. मूर्ती लहान पण दहशत महान. त्याला इंजेक्शन हा कार्यक्रम मुळीच आवडत नसे. अशा वेळी तो आमच्यावरही भुंके. दुसरा नावडता कार्यक्रम म्हणजे आंघोळ. टॉवेल, साबण अशी तयारी दिसली की हा धूम ठोके. कॉटखाली, सोफ्याखाली लपे, पण शेवटी ‘आलीया भोगासी’ असे भाव चेहऱ्यावर आणत आमच्या स्वाधीन होई. आंघोळ झाल्यावर त्याला कॉटवर झोपायची मुभा मिळत असे म्हणून असेल कदाचित. कालांतराने त्याने आंघोळ प्रकरण स्वीकारले, पण इंजेक्शन मात्र शेवटपर्यंत नाही.
वाघ्याचा पायगुण चांगला! पुढच्याच वर्षी मला मुलगी झाली. बाळंतपणाला माहेरी गेले, पण मनात सारखी धाकधूक होती की, वाघ्या या नवीन पाहुणीला ‘आपले’ म्हणेल? का तीही ‘इतर’ ठरेल? मग मात्र पंचाईत! दीड महिन्यांनी मुलीला घेऊन घरात शिरले मात्र वाघ्याने भुंकून भुंकून घर डोक्यावर घेतले व आनंदाने उडय़ा मारायला सुरुवात केली. पण ‘हे’ भुंकणे व ‘ते’ भुंकणे यात खूप फरक होता. दुसऱ्या दिवशीपासून आमच्याबरोबर वाघूचे रूटीनही बदलले. रोज रात्री आम्ही त्याला अंगणात सोडत असू व सकाळी घरात घेत असू. आत आल्यावर पहिले काम म्हणजे घरातल्या सगळ्यांना शेपूट हलवून व कुईकुई करून गुड मॉर्निग म्हणणे व मग गॅलरीत सोफा-कम-बेडवर स्थानापन्न होणे! पण बाळ आल्यावर आधी पाळण्याकडे जाऊन ती नीट आहे ना! ही खात्री करून मगच बाकीच्यांकडे जाऊ लागला. ती रडायला लागली की हा अस्वस्थ! सारखा तिच्याकडे जाई व परत आमच्याकडे येऊन भुंके- जणू त्याला सांगायचे असे- बाळ एवढे रडतेय पण तुम्ही मात्र ढिम्म बसून आहात! असे आम्हाला रागे भरत असे. एक गोष्ट आमच्या लक्षात आली- ती म्हणजे वाघ्या कुठल्याही पिल्लाला काही करत नसे- प्राणी अथवा माणूस! त्याची आणखी एक गंमत म्हणजे तो शंकरभक्त होता! सोमवारी कडकडीत उपास करत असे! आम्ही गमतीने म्हणत असू, वाघ्याही आमच्यासारखाच ब्राह्मण आहे!
घरात छोटी पाहुणी आल्यावर वाघ्या अगदी वाघूदादासारखा वागू लागला. तिने काहीही केलेले त्याला चालत असे. एरवी शेपटीला हात लावलेला त्याला मुळीच खपत नसे. माझी मुलगी तेव्हा नुकतीच पावले टाकायला लागली होती. एकदा हिचा पाय त्याच्या शेपटीवर पडला. आम्हा सर्वाच्या काळजाचा ठोका चुकला. आता काय होणार? पण वाघ्या समंजसपणे तिथून न भुंकता, न रागावता उठला व कॉटखाली जाऊन बसला. जणू म्हणाला- चालू द्या बाई तुमचे! आम्हीच बाजूला होतो.
तसा वाघ्या प्रकृतीने धडधाकट. क्वचितच आजारी पडे! पण पडलाच तर मात्र त्याला औषध कसे द्यायचे हा एक यक्षप्रश्नच असे. लहान असताना त्याला पेढे, दुधी हलवा, घट्ट साय, गुलाबजाम वगैरेमध्ये औषधाची पूड मिसळून देत असू, पण मोठा झाल्यावर याला फसेनासा झाला आणि इंजेक्शन देण्याचा तर विचारच नको. ते म्हणजे रोगापेक्षा इलाज भयंकर अशी गत.
रोज संध्याकाळी व सकाळी माझे सासरे वाघूला बाहेर रस्त्यावर फिरवायला घेऊन जात. तो त्याच्या दिवसातला हाय पॉईंट असे. ‘चला!’ असे म्हणतच तो आनंदाने कुईकुई असा ठेवणीतला आवाज काढत सासऱ्यांच्या मागेपुढे नाचत राही व दरवाजा कधी उघडतो इकडे शेपूट हलवत बघत राही! फिरून आल्यावर त्याला घरात यायचे नसे! रात्री अंगणात सोडायच्या वेळी ‘चला’ म्हटले की मात्र रागाने गुरगुरत अंगावर येई किंवा कुठे तरी लपे! त्यामुळे ‘चला’ शब्द कोणत्या वेळी उच्चारतो यावर त्याची प्रतिक्रिया अवलंबून असे.
काही कारणाने कालांतराने माझे सासू-सासरे व आम्ही तिघे असे वेगळे राहू लागलो- म्हणजे राहत्या घराच्या वरतीच मजला बांधून. त्यामुळे वाघ्या खाली-वर दोन्हीकडे राहू लागला. त्यातच माझ्या सासऱ्यांना अर्धागवायू होऊन ते अंथरुणाला खिळले. वाघ्याचे आता वय झाले होते. डोळ्यात मोतिबिंदू झाले होते. सदर घटनेनंतर मात्र क्वचितच आजारी पडणाऱ्या वाघ्याची तब्येत झपाटय़ाने खालावत गेली. आता विचार करताना असे वाटते की काय झाले असेल? एक तर वाघूचे वय झाले होते, आम्ही विभक्त झालो- हे खटकले का? शिवाय सकाळ- संध्याकाळ फिरायला नेणारे सासरे- त्यांच्याच पायाशी हा बसून असे! या सर्व गोष्टींच्या एकत्रित परिणामामुळे त्याला माणसाप्रमाणेच डिप्रेशन आले असेल का? मुक्या प्राण्याचे बोलके डोळे बहुधा हेच सांगायचा प्रयत्न करत होते की, आता मला जगायची इच्छा नाही! मला जाऊ द्या शांतपणे. इतकी सगळी स्थित्यंतरे अधू पण उघडय़ा डोळ्यांनी पाहावली नसतील- रुचली तर मुळीच नसतील, पण जिवात जीव असेपर्यंत तो फक्त त्याच्या कुटुंबासाठी त्याच्या परीने झटला. शेवटी त्याने अन्न-पाणी दोन्हीचा त्याग केला व आमच्या मांडीवर देह ठेवला! वाघ्या आमच्या अंगणातील आंब्याखाली चिरविश्रांती घेत आहे.
चि. वाघ्या! होय! तो आमच्यासाठी चिरंजीवच आहे! घरात आल्यापासून तो जाईपर्यंतची अनेक रूपे डोळ्यांसमोर अजूनही येतात- खेळकर वाघ्या, खोडकर वाघ्या, समंजस वाघू, हट्टी-संतापी वाघू, पझेसिव्ह वाघ्या, इमानी वाघ्या, प्रेमळ वाघ्या- खुनशी वाघ्या आणि शेवटी-शेवटी हतबल-अगतिक झालेला- माणूस वाघ्या! माणसातल्या सर्व भाव-भावना त्याच्यात होत्या- फक्त म्हणायला तो कुत्रा होता.
वाघ्याला जाऊन १६ र्वष झाली, पण त्याची दहशत एवढी आहे की, अजूनही गेटला हात लावण्याआधी लोक विचारतात-
कुत्र्याला बांधलंय ना?