Friday, January 13, 2012

दादासाहेब कन्नमवार

वृत्तपत्रांनी घडविलेल्या प्रतिमा नेहमी निर्दोषच असतात असे नाही. त्यातून तशा प्रतिमा घडविण्याची प्रतिज्ञाच करून बसलेले एखादे सामर्थ्यवान वृत्तपत्र मनात आणील तर एखाद्याची प्रतिमा त्याला हवी तशी उभी करू शकते. चळवळींच्या काळात निघणारी अन् चळवळींसाठी चालणारी वृत्तपत्रे या बाबतीत फार मोठा अन्याय करीत असतात. महाराष्ट्रात असा अन्याय आचार्य अत्रे यांच्या 'मराठा' या दैनिकाने अनेकांवर केला आहे. ह.रा. महाजनी यांच्यापासून लक्ष्मणशास्त्री जोशी यांच्यापर्यंत आणि यशवंतरावांपासून पुढे देशाच्या पंतप्रधानपदावर पोहोचलेल्या मोरारजीभाईंपर्यंत अनेकांच्या प्रतिमा अतिशय विकृत स्वरूपात मराठी मानसावर आचार्यांनी त्यांच्या समर्थ लेखणी आणि वाणीच्या द्वारे ठसविल्या आहेत. मराठी भाषा, साहित्य व संस्कृती इ. बरोबरच महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीतील त्यांचा मोठा वाटा कायमचा स्मरणात राहणार असला तरी त्यांची ही कर्तबगारीही विसरता येण्याजोगी नाही. अत्र्यांच्या या कर्तृत्वाचा सर्वात मोठा व निरपराध बळी मारोतराव सांबशीव उपाख्य दादासाहेब कन्नमवार हा आहे.
अत्र्यांनी त्यांची यथेच्छ टवाळी केली. त्यासाठी अग्रलेखांपासून नाटकांपर्यंतचे सारे लेखनप्रकार हाताळले. संयुक्त महाराष्ट्राच्या यशस्वी लढयाचे एक कर्णधार असलेल्या आचार्यांवर मराठी मानस मोहीत होते आणि त्या राज्याचे पहिले उपमुख्यमंत्री व नंतर मुख्यमंत्री झालेले कन्नमवार अत्र्यांसह त्यांच्या तमाम चाहत्यांच्या रोषाचे आणि टिंगलटवाळीचे विषय होते. कन्नमवारांचे दुर्दैव हे की त्या अपप्रचाराला आपल्या कर्तृत्वाने उत्तर द्यायला आयुष्याने त्यांना पुरेसा वेळ दिला नाही. मुख्यमंत्रीपदाच्या त्यांच्या कारकीर्दीला जेमतेम एक वर्ष पूर्ण होत नाही तोच त्यांचे निधन झाले आणि मराठी मनावरची त्यांची अत्रेकृत प्रतिमाच कायम राहिली.
दि. 24 ऑक्टोबर 64 या दिवशी कन्नमवारांचा मृत्यू झाला. आपल्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत त्यांनी हिऱ्यांच्या स्मगलिंगपासून अनेक गोष्टींना उत्तेजन दिले असा मोठा प्रवाद मुंबईतील टीकाखोर वृत्तपत्रांनी त्यांच्या अखेरच्या दिवसात उभा केला होता. कन्नमवारांचे दारिद्रयोत्पन्न व दारिद्रयसंपन्न आयुष्य ठाऊक असणाऱ्या त्यांच्या वैदर्भीय व अन्य चाहत्यांना त्या प्रचारी प्रवादाने तेव्हा कमालीचे व्यथित केले होते. त्यांच्यावर कोणते तरी बालंट येणार किंवा तशाच एखाद्या आरोपावरून त्यांना बदनाम केले जाणार असे वाटू लागले असतानाच त्यांच्या निधनाची बातमी आली आणि त्यांचे सहस्त्रावधी चाहते पार कासावीस होऊन गेले.
बरोबर एक महिन्याच्या अंतराने दादासाहेबांच्या जीवनावर साहित्यभूषण तु.ना. काटकर यांनी लिहिलेल्या एका छोटेखानी पुस्तकाचे प्रकाशन नागपूरच्या चिटणीस पार्कवर तेव्हाचे संरक्षणमंत्री यशवंतराव चव्हाण यांच्या हस्ते झाले. त्या सोहळयासाठी चंद्रपूरहून आलेल्या मित्रांच्या समूहात मीही होतो. त्या भव्य समारंभाला हजर राहून दुसऱ्या दिवशी चंद्रपूरला जाणारी बस पकडायला पुढे केंद्रीय अर्थखात्याचे राज्यमंत्री झालेले शांताराम पोटदुखे आणि मी नागपूरच्या जुन्या एस.टी. स्टँडवर आलो तेव्हा दादासाहेबांच्या पत्नी गोपिकाबाई त्या स्टँडवरच आम्हाला दिसल्या. हाती एक छोटीशी बॅग घेतलेल्या गोपिकाबाई एस.टी.च्या तिकिटासाठी सामान्य माणसांप्रमाणे रांगेत उभ्या होत्या. एक महिन्यापूर्वी मुख्यमंत्रीणबाई असलेल्या गोपिकाबाईंना तसे बेदखल उभे असलेले पाहून आम्ही गलबलून गेलो. मग आमच्यातल्या एकाने त्यांना जबरीनेच बसायला लावून त्यांची तिकिटे काढून आणली. मुंबईच्या टीकाखोर वर्तमानपत्रांनी रंगविलेली कन्नमवारांची विकृत प्रतिमा धुवून अन् पुसून काढायला तो प्रसंग पुरेसा होता.
दादासाहेब कोण होते? साऱ्या विदर्भात आपल्या हजारो चाहत्यांचा वर्ग त्यांनी कसा उभा केला? अत्यंत प्रतिकूल आर्थिक परिस्थिती, अर्धवट शिक्षण, प्रस्थापित अन् धनवंत अशा साऱ्यांचा कडवा विरोध, या साऱ्यावर कोणत्याही दखलपात्र जातीचे पाठबळ नसताना मात करून त्यांनी विदर्भावर आपला एकछत्री अंमल कसा कायम केला? त्यांच्या शब्दाखातर विदर्भातील 54 आमदार स्वतंत्र विदर्भाच्या मागणीला पाठिंबा द्यायला आपापले राजीनामे घेऊन का उभे राहिले? भंडाऱ्यात मनोहरभाई पटेल, वर्ध्यात पाटणी अन् बजाज, चंद्रपुरात छोटूभाई पटेल व इतर आणि नागपुरात अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे व दादा धर्माधिकाऱ्यांपासून आर.के. पाटील यांच्यासह खरे-अभ्यंकरांच्या प्रतिष्ठित अनुयायांपर्यंतचे सगळे बुध्दीसंपन्न लोक राजकारणावर प्रभाव गाजवीत असताना त्या साऱ्यांच्या डोळयादेखत विदर्भाचे राजकारण कन्नमवारांनी ज्या अलगदपणे आपल्या ताब्यात आणले तो इतिहास खरे तर स्वतंत्रपणेच लिहिला गेला पाहिजे. त्या काळात खुद्द म. गांधी विदर्भाचे (सेवाग्रामचे) रहिवासी होते आणि महात्माजींचे मानसपुत्र स्व. जमनालाल बजाज विदर्भाच्या राजकारणावर नजर ठेवून होते ही गोष्टही हा इतिहास लिहिताना स्पष्टपणे ध्यानात घ्यावी लागणार आहे.
चंद्रपूरच्या भानापेठ नावाच्या साध्या वस्तीतील एका दरिद्री कुटुंबात दादासाहेबांचा जन्म झाला. जेमतेम सातवीपर्यंत शिक्षण झालेल्या आणि कोणत्या धनवंत वा संख्यासंपन्न जातीचे पाठबळ नसलेल्या या साध्या माणसाने महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत केलेली वाटचाल कोणालाही थक्क करणारी आहे. कधीकाळी वृत्तपत्रे विकणाऱ्या व काँग्रेस कमेटीच्या बाहेर ठेवलेल्या बाकडयावर दिवस काढणाऱ्या मारोती कन्नमवारांच्या पत्नीने एकेकाळी वरोऱ्याच्या रस्त्यालगत खाणावळ चालवून आपली व आपल्या कुटुंबाची गुजराण करण्याचे प्राक्तन अनुभवले. कन्नमवारांच्या इंग्रजीला आणि व्यवहारात अभावानेच दिसणाऱ्या त्यांच्या नेटकेपणाला हसणाऱ्या तथाकथित मोठया माणसांना त्यांचा हा बिकट वाटेवरचा प्रवास कधी विचारात घ्यावासा वाटला नाही.
कन्नमवारांना राज्याचे मुख्यमंत्रीपद अपघाताने वा नशिबाने मिळाले नाही. त्यांना मुख्यमंत्रीपद देणे ही महाराष्ट्राच्या मराठी राजकारणाची तेव्हाची गरज होती ही बाबही त्याचमुळे कोणाला महत्त्वाची वाटली नाही. 1956 च्या अखेरीस देशात भाषावार प्रांत रचना झाली. त्यावेळी स्थापन झालेल्या द्विभाषिक मुंबई राज्यात 1957 मध्ये झालेल्या विधानसभेच्या निवडणुकीत काँग्रेस पक्षाने सपाटून मार खाल्ला. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या उमेदवारांनी मुंबईसह प. महाराष्ट्र आणि मराठवाडयात काँग्रेस उमेदवारांना अस्मान दाखविले तर इंदुलाल याज्ञिकांच्या नेतृत्वातील महागुजराथ जनता परिषदेने साऱ्या गुजराथेत त्या पक्षाला धूळ चारली. त्या स्थितीत मुंबईत काँग्रेसचे यशवंतराव सरकार टिकवायचे तर त्या पक्षाचे 54 आमदार निवडून देणाऱ्या विदर्भाला महाराष्ट्रात कायम ठेवणे ही त्या पक्षाची गरज होती. दादासाहेब कन्नमवार हे त्या आमदारांचे सर्वश्रेष्ठ नेते होते. ते वेगळया विदर्भाचे पुरस्कर्ते होते. फाजल अली कमिशनच्या शिफारशीनुसार विदर्भाचे वेगळे राज्य झाले असते तर कन्नमवार हे त्याचे पहिले मुख्यमंत्रीच झाले असते. पुढे 1959 मध्ये नागपुरात काँग्रेस पक्षाचे अखिल भारतीय अधिवेशन यशस्वीरित्या भरवून त्यांनी आपले ते स्थानमहात्म्य सिध्दही केले होते. विदर्भ राज्याच्या मुख्यमंत्रीपदावर पाणी सोडून कन्नमवारांनी एका निष्ठावान पक्ष कार्यकर्त्यासारखे महाराष्ट्रात राहणे तेव्हा मान्य केले आणि त्या बळावर यशवंतरावांचे मुख्यमंत्रीपद शाबूत राहिले व टिकले. मात्र त्यासाठी कन्नमवारांचे मन वळवायला प्रत्यक्ष पं. जवाहरलाल नेहरूंना आपला शब्द खर्ची घालून त्यांची मनधरणी तेव्हा करावी लागली होती.
कन्नमवारांच्या वाटयाला आलेले उपमुख्यमंत्रीपद या घटनाक्रमातून त्यांच्याकडे आले ही गोष्ट पश्चिम महाराष्ट्रासकट विदर्भातल्या विचारवंतांनीही पुरेशा गांभीर्याने कधी नोंदवली नाही. उलट उपमुख्यमंत्रीपदासाठी कन्नमवारांनी विदर्भ राज्याची आपली मागणी सोडली असा गहजबच त्या काळात त्यांच्याविरुध्द केला गेला. पुढे यशवंतराव चव्हाण केंद्र सरकारात संरक्षण मंत्री पदावर गेल्यानंतर त्यांचे मुख्यमंत्रीपद कन्नमवारांकडे येणे अतिशय स्वाभाविक व प्रस्थापित नियमाला अनुसरूनच होते. एकेकाळी वृत्तपत्रे विकणारा हा आडगावचा दरिद्री माणूस महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदावर असा पोहोचला होता.
कन्नमवार मुख्यमंत्री होऊन चंद्रपुरात आले तेव्हा त्यांच्या स्वागतासाठी 10 हजारावर लोकांचा समुदाय तिथल्या विश्रामभवनासमोर उभा होता. पोलिसांची मानवंदना स्वीकारण्याआधी दादासाहेब त्यांच्या नित्याच्या सवयीप्रमाणे त्या समुदायात शिरले. त्यातल्या अनेकांशी त्यांची नावं घेऊन ते बराच काळपर्यंत एकेरीत बोलत राहिले. सावलीजवळच्या खेडयातून आलेला एक शिक्षक तेवढया गर्दीत मुख्यमंत्र्यांजवळ आपल्या जावयाची तक्रार करताना तेव्हा दिसला. आपला जावई मुलीला सासरी नेत नसल्याचे गाऱ्हाणे मुख्यमंत्र्यांच्या कानावर घालून त्या नाठाळ जावयाला दटावण्याची विनंती तो घरच्या माणसाशी बोलावे तशा आवाजात त्यांना करीत होता. पुढे दादासाहेबांच्या दौऱ्यात गेलेल्या पत्रकारांत मीही होतो. कन्नमवारांचे सावधपण हे की त्या जावयाच्या गावी जाताच त्यांनी अधिकाऱ्यांना धाडून त्याला बोलवून घेतले आणि 'बायकोला नेले नाहीस तर माझ्याशी गाठ आहे' अशी समज त्यांनी त्या जावयाला दिली. कन्नमवारांच्या येण्याचा मुहूर्त हा चंद्रपूर परिसरातल्या लोकांसाठी जत्रेचा मुहूर्त असे. 'दादासाहेबांना पाहायला चाललो' असे एकमेकांना सांगत शेकडोंच्या संख्येने लोक त्यांना नुसतेच पाहायला येत. ग्रामीण भागातून येणाऱ्या लोकांचे असे लोंढे आवरताना पोलिसांची पुरेवाट होत असे.
एकच एक मळकट सदरा अन् एकच एक काळपट धोतर नेसून काँग्रेस पक्षाच्या शहर कार्यालयात पडेल ते काम करणारे अन् प्रसंगी कार्यालयाबाहेर टाकलेल्या बाकडयावर थकून झोपी जाणारे दादासाहेब कन्नमवार आजही त्या परिसरातील वयोवृध्द माणसांच्या स्मरणात आहेत. त्याच काळात तेव्हाची वृत्तपत्रे घरोघर टाकणाऱ्या पोराचे काम करून त्यांनी गुजराण केली. काँग्रेस पक्ष आणि त्याचे सगळेच कार्यकर्ते त्या काळात कमी अधिक हलाखीचे जिणे जगणारे होते. कधीमधी त्यातल्याच एखाद्याला त्यांच्या घरातल्या दारिद्रयाची आठवण यायची अन् तो त्यांच्या घरात कधी पायली दोन पायली तांदूळ तर कधी ज्वारी नेऊन टाकायचा.
चंद्रपूरसह सगळया विदर्भातील काँग्रेस पक्षावर तेव्हाच्या प्रतिष्ठित धनसंपन्न आणि उच्चवर्णीय पुढाऱ्यांचा वरचष्मा होता. त्यांच्यात अण्णासाहेब सहस्त्रबुध्दे व दादा धर्माधिकारी यांच्यासारख्या तपस्वी अन् विद्वान माणसांपासून बजाज व बियाणींपर्यंतच्या धनवंतांचा समावेश होता. त्या काळात कन्नमवारांनी समाजाच्या तळागाळातली साधी अन् सामान्य माणसे हाताशी धरली. त्यांच्या माध्यमातून बहुजन समाजातील वेगवेगळे वर्ग आपल्यासोबत घेतले. उच्चवर्णीय पुढाऱ्यांचे लक्ष दिल्ली अन् नागपूरकडे लागले असताना ग्रामीण भागातील उपेक्षित वर्गांना जवळ करणारा कन्नमवार नावाचा गरीब माणूस त्या वर्गांना स्वाभाविकपणेच अधिक विश्वासाचा वाटला.
स्वातंत्र्याच्या आंदोलनात वाटयाला आलेल्या हालअपेष्टा कन्नमवारांच्याही वाटयाला आल्या. जवळजवळ प्रत्येकच आंदोलनात त्यांना तुरुंगाची वारी घडली. त्या काळातली त्यांची एक आठवण अजूनही जुनी माणसे मिस्किलपणे सांगतात. कन्नमवार चांगली भाषणे देत. त्यांच्या भाषणात ग्रामीण म्हणी अन् गावठी किस्से भरपूर असत. ते सगळे चपखलपणे व्याख्यानात आणून ते भाषण रंगवीत. पण आरंभीच्या काळात त्यांना आपल्या व्याख्यानातला उत्साह आवरता येत नसे. बोलताना अवसान चढले की ते श्रोत्यांच्या दिशेने पुढे सरकू लागत. लाऊडस्पिकरची चैन तेव्हाच्या काँग्रेसला परवडणारी नसल्यामुळे पुढे सरकणाऱ्या त्या जोशिल्या नेत्याला अडवायला तो अडसरही त्या काळात नसे. या प्रवासात खूपदा ते व्यासपीठाच्या पुढल्या टोकापर्यंत पोहोचत. मग त्यांना कोणीतरी धरून मागे आणत असे. कै. पं. बालगोविंदजी हे त्या काळात चंद्रपूरच्या काँग्रेसचे ज्येष्ठ व आदरणीय नेते होते. भाषण देताना पुढे सरकणाऱ्या कन्नमवारांना एका जागी खिळवून ठेवण्यासाठी त्यांच्या शर्टाच्या मागल्या बाजूला दोरी बांधण्याचा अफलातून आदेशच तेव्हा पंडितजींनी काढला. ऐन भाषणात त्यांचे पाऊल पुढे पडले की कोणीतरी त्यांच्या शर्टाला बांधलेली दोरी मागून घट्ट धरून ठेवायचा. मात्र कोणताही दोर कन्नमवारांना थांबवू किंवा अडवू शकला नाही. उच्चभ्रू समाजाने कितीही नावे ठेवली तरी सामान्य माणूस नेहमी त्यांच्यासोबत राहिला अन् ते सामान्यांसोबत राहिले. याच प्रक्रियेतून त्यांच्या लोकनेतृत्वाचा उदय झाला.
विदर्भाच्या राजकारणात कन्नमवारांचे वर्चस्व जसजसे वाढत अन् विस्तारत गेले तसतसा काँग्रेसमधील एक एक प्रस्थापित पुढारी पक्षीय राजकारणाच्या बाहेर पडून 'विधायक कार्य' करू लागला. आचार्य विनोबा भाव्यांचा पवनार आश्रम विदर्भातच असल्यामुळे त्यातल्या अनेकांना तो जवळ करावासा वाटला. कन्नमवारांकडून पराभूत झालेली किती माणसे त्या काळात अशा विधायक चळवळीकडे वळली त्याचा हिशोब कधीतरी मांडला जावा लागणार आहे. पश्चिम महाराष्ट्रात कधीकाळी जोरात असलेली ब्राह्मणेतर चळवळ पूर्व विदर्भात फारशी जोरकस कधी नव्हतीच. असलीच तर तिचे थोडेफार अस्तित्व राजकारणापुरते मर्यादित होते अन् दादासाहेब कन्नमवार हे त्या क्षीण प्रवाहाचे प्रभावी नेते होते.
1941-42 या काळात पुनमचंदजी राका यांच्यानंतर नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटीचे ते अध्यक्ष झाले. नंतरच्या काळात काँग्रेसच्या तिकिटावर ते देशाच्या घटना समितीवर निवडले गेले. 1952 साली झालेल्या प्रांतिक कायदेमंडळाच्या निवडणुकीत मध्यप्रांत व वऱ्हाडच्या विधीमंडळात निवडून जाऊन ते त्या राज्याचे आरोग्यमंत्री झाले.
कोणतीही शैक्षणिक पदवी गाठीशी नसणारा माणूस आरोग्य खात्याचा मंत्री झाला तेव्हा त्याची राज्याच्या उच्चभ्रूंकडून भरपूर टिंगलटवाळी होणे अपेक्षितच होते. कन्नमवारांचीही अशी पुरेशी टवाळी झाली. मेडिकल कॉलेजमधील एका रुग्णावरील उपचाराचे कागद हाती घेऊन कन्नमवारांनी त्याला 'पोस्टमार्टम' अहवाल म्हटले असा एक सरदारजीछाप विनोद त्यांच्या नावावर त्या काळात खपविला गेला. स्वत:ला प्रतिष्ठित म्हणविणाऱ्या अनेक तथाकथित बुध्दिवंतांनी नंतरच्या काळात कन्नमवारांच्या नावावर अशा सवंग विनोदाच्या अनेक कहाण्या पिकविल्या. कन्नमवारांचा वेष आणि वागणे या दोहोतही एक अस्सल ग्रामीणपण असल्यामुळे अनेक पदवीधारक विद्वानांना त्या कहाण्या खऱ्याही वाटल्या. कन्नमवारांना सफाईदार अन् अस्खलित नसले तरी चांगले इंग्रजी येत होते. प्रशासकांच्या व अन्य अधिकाऱ्यांच्या बैठकीत प्रसंगी ते इंग्रजीतून बोलत. मुंबईत भरलेल्या एका आंतरराष्ट्रीय परिषदेचे उद्धाटन करताना त्यांनी तब्बल 20 मिनिटे इंग्रजीत भाषण केले. त्या भाषणात जराशीही चूक झाल्याचे कोणाला आढळले नाही या वास्तवाकडे त्यांच्या टवाळखोरांना लक्ष द्यावेसे कधी वाटले नाही. 1959 साली मी मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालो. माझे वडील स्वातंत्र्यसंग्राम सैनिक व जिल्ह्याच्या काँग्रेस संघटनेतील एक आघाडीचे कार्यकर्ते होते. कन्नमवारजींशी त्यांचा संबंध परस्परांशी एकेरीत बोलण्याइतका निकटचा होता. दादासाहेब माझ्या वडिलांना 'जन्या' (जनार्दन) म्हणत अन् माझे वडील त्यांना त्यांच्या 'मारोती' या नावाने हाक मारत. त्या काळातील आमच्या हलाखीच्या स्थितीची पूर्ण जाणीव असलेल्या दादासाहेबांनी मला माझ्या परीक्षेतील यशाचे अभिनंदन करणारे 12 ओळींचे पत्र लिहिले. हे पत्र त्यांच्या हस्ताक्षरात अन् अस्सल इंग्रजीत आहे. ते मी अद्याप जपून ठेवले आहे. कन्नमवारांनी अनेक मंत्रीपदे भुषविली. वाटयाला आलेले खाते कोणतेही असो त्यातील प्रशासनाधिकाऱ्यांवर त्यांचा कमालीचा वचक होता ही गोष्ट प्रशासनातला कोणताही जुना अधिकारी आज सांगू शकेल.
1953 साली पोट्टी श्रीरामलू यांच्या नेतृत्वात झालेली आंध्रप्रदेशाच्या निर्मितीची चळवळीचे पडसाद पश्चिम महाराष्ट्रात उमटले. पश्चिम महाराष्ट्रात संयुक्त महाराष्ट्राचे आंदोलन उभे राहिले. याच काळात विदर्भात व विशेषत: पूर्व विदर्भात वेगळया विदर्भाची चळवळ संघटित होऊ लागली. दादासाहेब कन्नमवार हे मनाने पुरते विदर्भवादी होते. फाजल अली यांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या राज्य पुनर्रचना आयोगासमोर बोलताना कन्नमवारांनी वेगळया विदर्भाच्या मागणीचा जाहीर उच्चार केला. वेगळया विदर्भासाठी स्वत:सकट आपल्यासोबत असलेल्या काँग्रेसच्या आमदारांचा विधीमंडळाचा राजीनामा द्यायला आपण तयार असल्याचे कन्नमवारांनी त्यावेळी सांगितले. राज्य पुनर्रचना आयोगाने भाषावर प्रांत रचनेबाबत केंद्र सरकारला केलेल्या शिफारशीत विदर्भाच्या वेगळया राज्याची शिफारस पुढे नोंदवली, हे कन्नमवारजींच्या भूमिकेचेच यश होते.
मात्र कन्नमवारांच्या विदर्भवादाला वऱ्हाडातील काँग्रेसचे पुढारी त्याही काळात अनुकूल नव्हते. संयुक्त महाराष्ट्राची स्थापना झाली तर त्या राज्यावर मराठा जातीचे वर्चस्व असेल ही गोष्ट वऱ्हाड काँग्रेसमधील मराठा पुढाऱ्यांना तेव्हाही दिसत होती. विदर्भाचे वेगळे राज्य झाले तर त्याचे नेते मराठा नसलेले कन्नमवार असतील हेही त्या पुढाऱ्यांना कळणारे होते. स्वाभाविकच वऱ्हाडच्या प्रदेश काँग्रेस कमेटीमध्ये नागपूर काँग्रेस कमेटीएवढा विदर्भाबाबतचा उत्साह नव्हता. तशाही स्थितीत काँग्रेसच्या आमदारांना विदर्भाच्या प्रश्नावर एका रांगेत त्यांच्या राजीनाम्यानिशी उभे करणे कन्नमवारांना जमले, ही गोष्ट त्यांचा राजकारणावरील दबदबा स्पष्ट करायला पुरेशी ठरावी.
कन्नमवारजींचे विदर्भाच्या राजकारणावरील वर्चस्व निर्विवादपणे 1959 साली नागपुरात भरलेल्या अ. भा. काँग्रेस महासमितीच्या अतिप्रचंड अधिवेशनानेही सिध्द केले. कन्नमवारजींच्या पत्नी गोपिकाबाई तेव्हा नागपूर प्रदेश काँग्रेस कमेटीच्या अध्यक्ष होत्या. त्या अधिवेशनाचे स्वागताध्यक्षपदही त्यांच्याकडे होते. या अधिवेशनाचे यजमानपद त्यामुळे स्वाभाविकपणेच कन्नमवारजींकडे होते. पंतप्रधान पं. जवाहरलाल नेहरूंच्या उपस्थितीत ढेबरभाईंच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या अधिवेशनाची भव्यता पाहून देशाच्या वेगवेगळया भागातून आलेल्या काँग्रेस नेत्यांनी कन्नमवारांची मुक्तकंठाने प्रशंसा केली होती.
या अधिवेशनाच्या काळात झालेली नागपूर लोकसभेची पोटनिवडणूकही फार गाजली. संयुक्त महाराष्ट्र समितीच्या ऐन धडाक्याच्या त्या काळात समितीने आपले उमेदवार म्हणून रिपब्लिकन पक्षाचे सरचिटणीस बॅ. राजाभाऊ खोब्रागडे यांना उभे केले. ते कन्नमवारांच्याच गावचे म्हणजे चंद्रपूरचे होते. कॉ. डांगे, अत्रे, एसेम ही सगळी संयुक्त महाराष्ट्राची फर्डी माणसे त्यांच्या प्रचारासाठी नागपुरात तळ मांडून बसली होती. काँग्रेसने आपली उमेदवारी बापूजी अण्यांसारख्या तपस्वी विदर्भवाद्याला दिली होती. साऱ्या देशाचे लक्ष वेधून घेतलेली ही निवडणूक बापूजींनी 50 हजारांच्या मताधिक्याने जिंकली. कन्नमवारांच्या विदर्भावरील वर्चस्वाची चुणूकही संयुक्त महाराष्ट्र समितीच्या नेत्यांना त्यामुळे येऊन चुकली. या नेत्यांचा कन्नमवारांवरील रोष नंतर अखेरपर्यंत कायम राहिला हेच पुढच्या घटनांनी स्पष्ट केले.
कन्नमवारांकडे पदवी नसली तरी प्रशासन कौशल्य होते. खेडयातून आलेल्या माणसाजवळ आढळणारे सहज साधे सावधपण आणि समयसूचकता त्यांच्यात होती. माणूस जोखण्याचे राजकीय कसब होते. कोणत्याही कार्यकर्त्याच्या खांद्यावर हात ठेवून बोलण्यात अन् त्याला आपलेसे करून घेण्यात त्यांचा हातखंडा होता. सांगली-साताऱ्याकडील अनेक कार्यकर्त्यांनाही त्यांचे हे सहजसाधे माणूसपण भावले होते. 'मुख्यमंत्री असून ते आमच्याशी घरच्या माणसाशी बोलावे तसे बोलले' अशी त्यांची आठवण काढणारे पश्चिम महाराष्ट्र अन् मराठवाडयातले अनेकजण दादासाहेबांच्या मृत्यूनंतर मला भेटले अन् त्यांच्यातील अनेकांनी तशा आठवणी लिहिल्या.
कन्नमवार मुख्यमंत्रीपदावर असतानाची गोष्ट.
सरकारी कामासाठी त्यांच्या वारंवारच्या बोलावण्याला कंटाळलेले एक वरिष्ठ अधिकारी एक दिवस सगळा धीर गोळा करून मुख्यमंत्र्यांना म्हणाले 'दादासाहेब, आम्हा लोकांना एक कौटुंबिक जीवन आहे. सायंकाळची वेळ आम्हाला त्यात घालवायची असते. तुम्ही एकतर सकाळी नाहीतर सायंकाळी आम्हाला बोलवीत चला' दादासाहेब म्हणाले 'ठीक आहे'.
दुसरे दिवशी सकाळी ते स्वत:च त्या सचिवांच्या घरी पोहोचले. त्यांना तसे आलेले पाहून ते सचिव पुरेसे सर्द झाले. आरंभीचा स्वागताचा उपचार आटोपल्यानंतर मुख्यमंत्री म्हणाले, 'एक दोन फायलींवरचे निर्णय राहिले होते. ते आज दुपारपूर्वी घेणे जरूरीचे होते, तुम्हाला बोलवायचे जीवावर आले म्हणून मीच तुमच्याकडे आलो.' सचिव जे समजायचे ते समजले अन् माफी मागून मोकळे झाले.
सिंहगडावर जाणारा रस्ता ताबडतोब दुरुस्त करण्याचे आदेश बांधकाम मंत्री असताना दादासाहेबांनी तिथल्या अधिकाऱ्यांना जागच्या जागी दिले. तसे करणे यंदाच्या आर्थिक तरतुदीत कसे बसणार नाही ही गोष्ट ते अधिकारी त्यांना समजावू लागले तेव्हा कन्नमवार म्हणाले, 'तरतुदी काम करण्यासाठी असतात. ते न करण्यासाठी नसतात. तुमच्याने ते होत नसेल तर तेवढेच फक्त सांगा.'
मुंबई महापालिकेतील सफाई कामगारांचा एक मोठा संप कन्नमवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकीर्दीत झाला. त्या संपाच्या वाटाघाटीसाठी कामगार नेत्यांचे एक शिष्टमंडळ जॉर्ज फर्नांडिस यांच्या नेतृत्त्वात त्यांच्या भेटीला मुख्यमंत्र्यांच्या दालनात दाखल झाले. मुंबईच्या वृत्तपत्रांसह अनेक नामवंतांनी कन्नमवारांची जी प्रतिमा रंगविली तीच बहुदा या नेत्यांच्याही मनात असावी. वाटाघाटीला सुरुवात करतानाच त्या नेत्यांपैकी एकजण म्हणाला, 'आमच्या मागण्यांपैकी बहुतेक सगळया आधीच्या मुख्यमंत्र्यांनी, यशवंतरावजींनी तत्त्वत: मान्य केल्याच आहेत.' त्या पुढाऱ्याला तेथेच थांबवत दादासाहेब म्हणाले, 'आता यशवंतरावजी मुख्यमंत्री नाहीत. मी मुख्यमंत्री आहे.' पुढारी चपापले अन् साऱ्या गोष्टी नव्याने चर्चेला आल्या. त्याच चर्चेच्या दरम्यान त्या पुढाऱ्याने एकवार पुन्हा धीर एकवटून दादासाहेबांना म्हटले 'आमच्या विनंतीचा मान राखायला आपण एकवार यशवंतरावजींशी बोलून का घेत नाहीत?'
त्यावर मुख्यमंत्र्यांच्या कार्यालयातून तेव्हाच्या संरक्षण मंत्र्यांना तात्काळ फोन जोडून दिला गेला. अडचण एवढीच झाली की कधीही न बिघडणाऱ्या त्या फोनवर मुख्यमंत्र्यांचे बोलणे संरक्षण मंत्र्यांना स्पष्ट ऐकू गेले. संरक्षणमंत्र्यांचे बोलणे मात्र कन्नमवारांना अजिबात ऐकू आले नाही. हताश चेहरा करून दादासाहेबांनी यशवंतरावांना अखेर म्हटले 'काही एक ऐकू येत नाही. तुमचे म्हणणे मला लिहूनच कळवा.' अन् त्यांनी फोन ठेवला. कन्नमवारांचा बेरकीपणा यशवंतरावांसकट फर्नांडिसांनाही समजला तेव्हा त्या वाटाघाटी रीतसर सुरू झाल्या.
1967 साली भरलेल्या आनंदवनाच्या मित्रमेळाव्याला आलेल्या फर्नांडिसांनी मुख्यमंत्री कन्नमवार यांच्याविषयीचे असे अनेक किस्से तेथे जमलेल्यांना ऐकविले. त्या वर्षी झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीत स.का. पाटील यांना पराभूत करून निवडून आलेल्या फर्नांडिसांभोवती एक तेजोवलय तेव्हा होते. त्यामुळे त्यांच्या गोष्टी ऐकायला त्यांच्याभोवती अनेकांनी गर्दी केली होती.
मुंबईतील सफाई कामगारांच्या संपाच्या काळात मुख्यमंत्री स्वत:च रस्ता झाडणार असल्याची साऱ्यांना आश्चर्याचा धक्का देणारी घोषणा कन्नमवारांनी केली होती. लागलीच मुंबईच्या वृत्तपत्रांनी झाडुवाला मुख्यमंत्री म्हणून त्यांची टर उडवायला सुरुवात केली. कन्नमवारांचे हे प्रसिध्दीचे चाळे आहेत असेही त्यांच्या टीकाकारांनी सांगून टाकले. हातात झाडू घेतलेले कन्नमवार दाखविणारी टवाळखोर व्यंगचित्रेही तेव्हा प्रकाशित झाली.
प्रत्यक्षात ठरलेल्या दिवशी अन् नियोजित वेळी मुख्यमंत्री दादर चौकात आले आणि त्यांनी शांतपणे रस्ता झाडायला सुरुवात केली. स्वातंत्र्याच्या लढयात शिपाई म्हणून काम केलेल्या आणि सारे आयुष्य दारिद्रयात काढलेल्या कन्नमवारांना त्या कामाची खंत वाटण्याचे काही कारणही नव्हते. मुख्यमंत्री रस्ता झाडत असल्याचे पाहून दादर परिसरातले काँग्रेसचे कार्यकर्तेही हातात झाडू घेऊन रस्त्यावर आले. मुंबईच्या नागरिकांना हा अनुभव नवा होता. राज्याचे मुख्यमंत्री रस्ते सफाईचे काम प्रतिक म्हणून एकच दिवस करतील ही सर्व संबंधितांची अटकळ कन्नमवारांनी खोटी ठरविली. दरदिवशी मुंबईच्या एका नव्या वस्तीत राज्याचा मुख्यमंत्री आपल्या सहकाऱ्यांसह रस्ते झाडत असल्याचे दृश्य मुंबईकरांना तेव्हा पाहायला मिळाले. परिणाम असा झाला की या घटनेने संकोचलेले सफाई कामगारच फर्नांडिसांकडे जाऊन संप मागे घेण्याची विनंती त्यांना करू लागले. रस्ते सफाईची आरंभी टर उडविणाऱ्या वृत्तपत्रांनी त्या साध्या आणि प्रतिकात्मक कामगिरीच्या या परिणामाची दखल घेण्याचे मात्र नेमके टाळले.
ग्रामीण भागातून आलेल्या माणसांत एक उपजत शहाणपण असते. तशा नेत्यांमध्ये मी ते अनेकदा पाहिले आहे. वसंतदादा पाटील मुख्यमंत्रीपदावर असताना एकदा भामरागडला आले. त्या गावच्या आदिवासींनी भामरागड ते लाहेरी हा रस्ता रुंद व चांगला करून देण्याची विनंती त्यांना केली. मात्र तेथील झाडे तोडता येणार नाहीत असा तेव्हाच्या वनसंवर्धन कायद्याचा निर्बंध होता. गावकऱ्यांची विनंती मान्य करायची तर शेकडो झाडे तोडावी लागतील आणि तसे करणे नियमात कसे बसत नाही हे तेव्हा वनखात्याच्या अधिकाऱ्यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. जरा वेळ दोन्ही बाजूंचे ऐकून घेऊन वसंतदादा अधिकाऱ्यांकडे वळून म्हणाले, 'झाडे तोडावी लागतील म्हणता ना. पण मला तर झाडे कुठे दिसतच नाहीत.' अधिकारी समजायचे ते समजले आणि भामरागड-लाहेरी हा रस्ता काही महिन्यांतच बांधून तयार झाला. कन्नमवार असेच होते. त्यांना वसंतदादांसारखा विकासाचा सरळ मार्गच दिसत होता.
कन्नमवारांच्या मुख्यमंत्रीपदाच्या कारकिर्दीतला असा एक प्रसंग मी स्वत: अनुभवला आहे. गडचिरोलीहून 13-14 किलोमीटर अंतरावर असलेल्या एका खेडयातील शाळेच्या इमारतीचे उद्धाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते ऐन पावसाळयात व्हायचे होते. त्यासाठी दादासाहेब आदल्या रात्रीच गडचिरोलीत डेरेदाखल झाले होते. त्यांच्यासोबत आलेल्या पत्रकारांच्या चमूत मीही होतो. सारी रात्र पडलेल्या पावसाने त्या मागासलेल्या क्षेत्रातील अगोदरच्याच कच्च्या रस्त्यांचा सकाळपर्यंत पार चिखल करून टाकला होता. त्यामुळे शाळेच्या जागी जाणे कसे अवघड आहे हे तेथील अधिकारी सकाळी त्यांना समजावून सांगू लागले. त्यांचा तो सल्ला अव्हेरताना दादासाहेब शांतपणे म्हणाले, 'अहो त्या गावात हजारो माणसे आपल्या भेटीसाठी आली असणार. तुमच्यापैकी ज्यांना चिखलातून येणे जमणार नसेल ते येथे थांबा. मला अशा प्रवासाची सवय आहे.'
पाहता पाहता हातात चपला घेऊन मुख्यमंत्री चिखलाची वाट तुडवू लागले. तब्बल 12 कि.मी. अंतर पायी चालत जाऊन ते तेथे जमलेल्या हजारो लोकांना भेटले. त्यांच्यामागे पळत जाणाऱ्या अधिकाऱ्यांची तारांबळ तेथे जमलेल्या अनेकांची करमणूक करणारी ठरली. कन्नमवार आयुष्यभर सामान्य माणसात राहिले. आपल्यावरचा सामान्यपणाचा संस्कार त्यांनी जाणीवपूर्वक सांभाळला. वागण्या बोलण्यातल्या साधेपणामुळे ते उच्चभ्रूंना त्यांच्या बरोबरीचे वाटले नसले तरी सामान्यांना मात्र ते कधी दूरचे वाटले नाही. त्यांचेही आग्रह असत आणि त्या आग्रहासाठी प्रसंगी ते कठोर भूमिका घेत. पण तुटेपर्यंत ताणण्याचा दुराग्रह त्यांनी कधी धरला नाही.
या साऱ्या काळात अत्रे आणि त्यांचा मराठा यांनी केलेले वार ते झेलतच राहिले. अत्र्यांच्या हल्ल्यापुढे भलेभले गारद झाले, भ्याले, त्यांना उत्तर देणे शक्य असूनही तसे करणे कोणाला फारसे जमले नाही. कन्नमवारांनी ते धाडस केले. मुळातच तो लढवय्या माणूस होता. अत्र्यांचे आव्हान स्वीकारून त्या जंगी माणसाला स्वप्नातही अनुभवावी लागली नसेल ती तुरूंगाची हवाच एक आठवडा कन्नमवारांनी त्याला खायला लावली. अत्र्यांची मुजोरगिरी त्यामुळे कमी झाली नसली तरी आपण ज्याच्याशी पंगा घेत आहोत त्याचे बळही त्या घटनेने त्यांच्या लक्षात आणून दिले... नंतरच्या काळात विदर्भाच्या चळवळीचे एक नेते त्र्यं.गो. देशमुख यांचे आपल्या कार्यालयात स्वागत करताना आचार्यांनी कन्नमवारांच्या त्या साहसाची कबुलीच त्यांच्याजवळ देऊन टाकली.
1962 साली नगरला झालेल्या अ.भा. पत्रकार परिषदेचे अध्यक्ष मराठवाडयाचे संपादक अनंत भालेराव तर उद्धाटक मुख्यमंत्री दादासाहेब कन्नमवार होते. अनंतरावांच्या छापील भाषणात सरकारच्या वृत्तपत्रविषयक धोरणावर कठोर टीका करणारे काही परिच्छेद होते. ते परिच्छेद तसेच वाचले जाणार असतील तर मला तेथे येता येणार नाही असा निरोप मुख्यमंत्र्यांनी ऐनवेळी परिषदेच्या आयोजकांना पाठविला. अनंतरावांनीही आपल्या भाषण स्वातंत्र्याचा आग्रह धरून आपण तो परिच्छेद वाचणारच असे स्पष्ट केले. परिणामी उद्धाटनाची वेळ टळली तरी परिषदेचे व्यासपीठ रिकामेच राहिले. जरा वेळाने स्वत: अनंतरावांनी मुख्यमंत्र्यांशी बोलून त्यांना ते स्वातंत्र्यसंग्राम सैनिक असल्याची आठवण करून दिली. खुद्द अनंतराव हैद्राबादच्या मुक्ती लढयातील आघाडीचे सैनिक होते. एका स्वातंत्र्य सैनिकाने दुसऱ्या स्वातंत्र्य सैनिकाच्या स्वातंत्र्याचा संकोच करणे चांगले नाही असे अनंतरावांनी म्हणताच कन्नमवार विरघळले आणि लगोलग समारंभाच्या ठिकाणी आले. पुढल्या कार्यक्रमात अनंतरावांनी ते परिच्छेद वाचले तेव्हा कन्नमवारांनी आपले डोळे मिटून घेतले एवढेच तेथे जमलेल्या पत्रकारांसोबत मी पाहिले.
1962 च्या निवडणुकीत चंद्रपूर जिल्ह्यातील सगळे विरोधी पक्ष त्यांच्या विरोधात प्रथमच संघटित झाले. त्या निवडणुकीत कन्नमवारांना जेमतेम सहाशे मतांनी विजय मिळवता आला. त्यांच्या विजयाची वार्ता समजली तेव्हा त्यांचे खंदे विरोधक असलेले अहेरीचे राजे विश्वेश्वरराव म्हणाले 'माझ्या सर्वात चांगल्या शत्रूचे मी मनापासून अभिनंदन करतो.' राजकारणात शत्रुत्व करणाऱ्या कन्नमवारांनी आपल्या विरोधकांशी असे जिव्हाळयाचे संबंध जपले होते हे सांगणारी ही घटना आहे.
त्यांच्या व्यक्तिमत्त्वात एक हजरजबाबी खटयाळपणाही होता. मुख्यमंत्रीपदावर आरूढ झाल्यानंतर चंद्रपूरच्या जिल्हा पत्रकार संघाने त्यांचा एक छोटेखानी सत्कार केला. शांताराम पोटदुखे हे त्यावेळी पत्रकार संघाचे अध्यक्ष आणि मी सरचिटणीस होतो. त्यांच्या स्वागतपर भाषणाची सुरुवात करताना 'महाराष्ट्राचे मुख्यमंत्री' असे न म्हणता चुकून मी महाराष्ट्राचे मुख्याध्यापक असे म्हणालो. त्यावर दादासाहेब जोरात ओरडून म्हणाले, 'अजूनही शाळेतच आहेस का रे?'
विदर्भातल्या माझ्यासारख्या असंख्य माणसांनी त्यांची अशी असंख्य साधी रूपे डोळयात आणि मनात साठवली आहेत. वंचनेपासून प्रतिष्ठेपर्यंतचा आणि सडकेपासून सत्तापदापर्यंतचा त्यांचा प्रवास आमच्या परिचयाचा आहे. सत्ताकारणात अपरिहार्यपणे वाटयाला येणारे सन्मान आणि मनस्ताप हे दोन्ही त्यांनी भरपूर अनुभवले. पण एवढया साऱ्या काळात त्यांचे माणूसपण आणि साधेपण कधी हरवले नाही. अपयशांनी खचलेले कन्नमवार कधी कोणी पाहिले नाहीत अन् यशाने त्यांना हेकेखोर बनविल्याचेही कधी कोणाला दिसले नाही. एवढया साध्या, सामान्य आणि गरीब माणसाचे मुंबईच्या वृत्तपत्रांनी केलेले विकृतीकरण त्याचमुळे विदर्भाला कधी समजू शकले नाही.
बापाचा वारसा नाही, जातीचं पाठबळ नाही, पैशाचा आधार नाही आणि शिक्षण वा पदवीसारख्या लौकिकावर मदार नाही. कन्नमवार असे वाढले आणि तशा गोष्टींच्या कुबडया घेऊन राजकारणाची वाट धरणाऱ्या साऱ्यांना त्यांनी मागे टाकले. आपल्या स्पर्धेत असलेल्या प्रत्येकाच्या गळयात त्यांनी पराजयाचा गंडाही असा बांधला की त्या पराभूतांनाही तो त्यांचा सन्मानच वाटावा. त्यांच्या राजकारणामुळे त्या क्षेत्रातून हद्दपार व्हावे लागलेल्या अनेक थोरामोठयांनी पुढे 'कन्नमवार आपले स्नेही होते' एवढीच एक गोष्ट नोंदवून त्यांच्या मोठेपणाएवढेच स्वतःच्या पराजयावर पांघरूण घातलेले दिसले.
महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदापर्यंत पोहचलेल्या प्रत्येकच पुढाऱ्याने आपले राजकीय वारसदार जन्माला घातले. पोटची मुले नसतील तर मानसपुत्र पुढे आणले. मुख्यमंत्री म्हणून पार अपयशी झालेल्या इसमांनीही तेवढा एक पराक्रम आपल्या नावावर नोंदविलेला दिसला. या साऱ्यांना अपवाद ठरलेला व त्यामुळे मराठी राजकारणातली घराणेशाही अधोरेखित करणारा एकमेव नेता आहे, मा.सां. कन्नमवार. त्याला अभावाचा वारसा होता आणि त्याने निर्माण केलेली परंपराही त्यागाचीच होती.
...........................................
कन्नमवारांचा जन्म 10 एप्रिल 1899 या दिवशी झाला. 1999 मध्ये त्यांची जन्मशताब्दी साजरी करण्यासाठी महाराष्ट्र सरकारने नेमलेल्या समितीची बैठक तेव्हाचे मुख्यमंत्री मनोहर जोशी यांच्या अध्यक्षतेखाली मुंबईच्या सह्याद्री या सरकारी अतिथीगृहात भरली होती.
तीत बोलताना विदर्भातील एका ज्येष्ठ पत्रकाराने सह्याद्री या अतिथीगृहाला कन्नमवारांचे नाव देण्याची सूचना केली. कन्नमवारांचा मृत्यू त्यात झाला म्हणून त्याला ती करावीशी वाटली. ती ऐकताच मुख्यमंत्र्यांची झालेली अडचण त्यांच्या चेहऱ्यावर उमटली. मग 'ही सूचना मान्य करण्यापेक्षा पंत वेगळा विदर्भ देणे पसंत करतील' असे म्हणून मीच मुख्यमंत्र्यांची त्या पेचातून सुटका केली होती.
कन्नमवारांच्या जन्मशताब्दीचा सोहळा प्रत्यक्षात कधी झाला नाही. मुंबईत नाही, नागपुरात नाही आणि चंद्रपूर या त्यांच्या गावातही नाही. जन्मशताब्दीच्या वर्षातही कन्नमवार ज्यांना दूरचे वाटले त्यांनी त्यांच्या हयातीत त्यांची उपेक्षा केली याची त्याचमुळे आता फारशी खंत करण्याचे कारण नाही.

अखेरचा सार्वभौम महाराजा यशवंतराव होळकर

(मी महाराजा यशवंतराव होळकरांचे चरित्र लिहिले असुन ते ल्वकरच प्रसिद्ध होत आहे. या महान सेनानी व पहिल्या स्वातंत्र्ययोद्ध्याबद्दल गैरसमजच अधिक पसरवुन त्यांना विस्म्रुतीत ढकलण्यात आले आहे. हा अन्याय दूर करण्याचा हा प्रयत्न आहे. पुर्ण चरित्र पुढील महिन्यात प्रकाशित होईलच...त्यातील खालील एक प्रकरण साप्ताहिक लोकप्रभाने प्रसिद्ध केले आहे.)

अखेरचा सार्वभौम राजा

-संजय सोनवणी

संकटांची वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रुरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता यशवंतराव होळकर यांची दोनशेवी पुण्यतिथी येत्या २८ ऑक्टोबरला आहे. त्या निमित्ताने यशवंतराव होळकरांच्या कर्तृत्वाचा घेतलेला हा वेध...

यशवंतराव होळकरांचा (३-१२-१७७६ ते २८-१०-१८११) एकूण जीवनप्रवास थक्क करणारा आहे. असा थरारक रोमांचक जीवनप्रवास, संकटांची एवढी वादळे, युद्धांचा सतत झंझावात, सतत विजयांची आस, स्वातंत्र्याची आस, विश्वासघात सहज पचवत पुढे जाण्याची तयारी, अफाट नेतृत्वक्षमता, पराकोटीचे युद्धकौशल्य, नितांत दुर्दम्य आशावाद, प्रयत्नांची निराश न होता केलेली पराकाष्ठा, क्षमाशीलता, शत्रूशी दुर्दात क्रूरता असे सर्व गुण एकत्र असणारा महायोद्धा व राज्यकर्ता जगाच्या इतिहासात क्वचितच सापडेल.
यशवंतरावांना राज्य सोडा साधी बोटभर जहागीर वंशपरंपरेने मिळालेली नाही. ती त्यांना भिल्ल-पेंढारी व पठाणांच्या स्वत: उभारलेल्या अल्प सन्याच्या जिवावर प्रशिक्षित पलटनींशी लढून मिळवावी लागली. त्यांनी िशदे-पेशव्यांच्या घशातून जप्त झालेले होळकरी प्रांत अविरत लढत-लढतच मुक्त केले. एवढेच काय, पण िशद्यांनी कैदेत टाकलेली पत्नी आणि अल्पवयीन कन्येलाही लढूनच मुक्त केले. गादीचा खरा वारसदार खंडेरावाला मुक्त करण्यासाठी आयुष्य पणाला लावले. त्यांना स्वत:ला इंदोरी गादीची हाव कधीच नव्हती, हे त्यांच्या सर्व कृत्यांवरून सिद्ध होते. आणि हे सर्व प्रांत त्यांनी जिंकलेले होते. एका अर्थाने त्यांनी संपूर्णपणे नव्याने राज्याची पायाभरणी केली होती. शिवरायांनंतर स्वत:चे राज्य स्वत:च्या हिमतीवर मिळवणारा, शेवटपर्यंत स्वतंत्र राहणारा, स्वत:हून एकही तह कोणाशीही न करणारा हा एकमेव महायोद्धा होता.
दौलतराव िशद्यांनी व पेशव्यांनी त्यांच्यावर व त्यांच्या परिवारावर आपत्तीमागून आपत्ती कोसळवल्या. दुसऱ्या मल्हाररावांचा खून केला. यशवंतराव व विठोजीरावांना कोवळ्या वयात आश्रयासाठी वणवण भटकावे लागले. रघोजी भोसल्यांनीही विश्वासघात केला. त्या क्षणापासून यशवंतरावांचे जीवन पूर्ण पालटलेले दिसते. त्यांनी स्वत: आपला मार्ग निर्माण केला, स्वत:च स्वत:चे नियम बनवले आणि आपली अविरत वाटचाल सुरू ठेवली.

अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे की यशवंतरावांनी युद्धात शत्रूच्या भीषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटूपुटूची युद्धे करून शत्रूला सन्मानपूर्वक जिवंत घरी धाडण्यासाठी?

पेशव्यांकडे व दौलतरावांकडे त्यांच्या सतत त्याच मागण्या होत्या.. खंडेरावाला व होळकरी परिवाराला मुक्त करा, होळकरी प्रांतांवरले जप्तीचे हुकूम मागे घ्या, दौलतरावांशी समेट करून द्या. खरे तर तोवर त्यांची स्वत:चीच शक्ती एवढी वाढली होती की पेशव्यांवर आक्रमण करून पेशवाई बुडवून ते आपल्याला हवे ते साध्य करू शकत होते. पण त्यांनी पेशव्यांच्या मसनरीचा, त्यांच्या सर्वोच्च अधिकारांचा नेहमीच आदर ठेवला. पेशव्यांनी त्यांचा थोरला भाऊ विठोजीरावाला अत्यंत क्रूरतेने ठार मारले. शत्रूलाही कोणत्याही राजसत्तेने अशी शिक्षा दिलेली नाही, तरीही संतापाच्या भरात आततायी कृत्य करणे त्यांनी टाळले. तत्पूर्वी िशद्यांनी मल्हारराव (दुसरा) या सावत्रभावाचीही हत्या केली होती. पेशवे नव्हेत तर िशदे हेच आपले शत्रू आहेत, एवढीच खूणगाठ त्यांनी मनाशी बांधली. हडपसरच्या युद्धात त्यांनी स्वत: ऐन जंगेत उतरून जो पराक्रम गाजवला त्याचे गुणगान त्यांचा कट्टर शत्रू मेजर माल्कमही करतो. खरे तर पेशव्यांनी यशवंतरावांच्या पराक्रमाचा दौलतीसाठी उपयोग करण्याची थोडीतरी दूरदृष्टी दाखवली असती, तर इंग्रजांचे राज्य या देशात कदापि आले नसते, हे यशवंतरावांनी एकटय़ाच्या जिवावर इंग्रजांशी जी युद्धे केली-जिंकली त्यावरून सहज स्पष्ट होते.
त्यांनी पुणे जाळले-लुटले हा धादांत खोटा आरोप करून पुणेकर सनातन्यांनी त्यांना महाराष्ट्रात पुरते बदनाम करून टाकले. अगा जे घडलेच नाही त्याच्या खोटय़ा रसभरीत कहाण्या बनवल्या गेल्या. पेशवा पळून गेला. त्याला परत आणायचा यशवंतरावांनी पराकोटीचा आटापिटा केला.. पण पेशवा पेशवाई इंग्रजांना विकून बसला. त्याचेही खापर जदुनाथ सरकार यशवंतरावांवरच फोडतात. एवढे होऊनही यशवंतरावांनी कोठेही पेशव्यांबद्दल कटू उद्गार काढलेले नाहीत. ही बाब यशवंतरावांच्या व्यक्तिमत्त्वावर वेगळाच प्रकाश टाकते. पण पुणेकरांनी त्यांची गणना ‘प्रात:काळी ज्यांची नावे घेऊ नयेत’ अशा त्रयीत करून टाकली. बंडवाला होलकर.. होळकरी दंगा असे शब्दप्रयोग वापरले. लाखावरच्या सन्याचा अधिपती, स्वतंत्र सार्वभौम राजाला त्यांनी बंडखोर-दंगेखोर ठरवले. मराठीत यशवंतरावांवर फारसे का लिहिले गेले नाही, जेही लिहिले गेले ते प्रत्यक्ष-अप्रत्यक्षरीत्या त्यांची बदनामी करणारेच होते यात शंका नाही.
वसईचा तह झाल्यानंतर इंग्रजांच्या आसुरी आकांक्षांचा अंदाज आलेला हा पहिला भारतीय शासक. िशदेंशी परंपरागत हाडवैर असूनही, त्यांनी होळकरांचे एवढे अपराध केले असूनही त्यांनी िशदेंना व भोसलेंना इंग्रजांविरुद्ध एकत्र आणले. िशदेंनी काय केले, तर होळकरांच्याच नाशाच्या योजना आखल्या. जर नर्मदेच्या तीरी हे िशदे व भोसले मनात कपट न ठेवता होळकरांची साथ देत तिघे इंग्रजांविरुद्ध र्सवकष लढा देते तर? यशवंतराव दिल्लीवर चालून गेले तेव्हाच भोसले यशवंतरावांच्या सूचनेनुसार खरेच कलकत्त्यावर चालून जाते तर? किंवा आपापल्या बळावर इंग्रजांशी सुनियोजित लढा देते तर? पण तसे झाले नाही. यशवंतरावांतील धगधगते राष्ट्रप्रेम आणि इंग्रजांचा खरा धोका त्यांना समजलाच नाही. त्याची परिणती त्यांच्याच अवमानास्पद पराभव व मांडलिकत्वाच्या तहांत झाली.
यशवंतरावांच्या दूरदृष्टीला दाद देत असता या करंटय़ा सरदारांच्या आत्मघातकी कृत्यांबाबत कोणालाही रोष वाटणे स्वाभाविक आहे.

यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे.

यशवंतरावांची युद्धनीती इंग्रजांना नेहमीच बुचकळ्यात टाकत राहिली. गनिमीकाव्याचा खरा उपयोग शिवरायांनंतर केला तो फक्त यशवंतरावांनी. गनिमीकावा हा फक्त पहाडी प्रदेशांत उपयुक्त असतो हे खोटे आहे हे त्यांनी सिद्ध करून दाखवले. मोन्सनचा भीषण पराभव हा गनिमीकाव्याचा अभिनव आणि कल्पक नमुना होता. युद्धशास्त्राच्या अंगानेही त्याचे विश्लेषण व्हायला हवे. आधी शत्रूला आपल्या मागे आणून, मग त्याला उलटे पळायला लावून, बदलत्या हवामानाचा अंदाज ठेवून भर पावसाळ्यात गाळाच्या जमिनीत त्याची फजिती करत तब्बल २५० मल पाठलाग करत, क्रमाक्रमाने त्याची शक्ती कमी करत नेत कसे संपवावे याचे हे एकमेव उदाहरण. या युद्धात इंग्रजांचे दहा हजारापेक्षा अधिक सन्य ठार झाले..
यामुळेच अनेकदा अनेक इंग्रज इतिहासकार यशवंतरावांवर क्रौर्याचा आरोप करतात. हे खरे आहे की यशवंतरावांनी युद्धात शत्रूच्या भीषण कत्तली केल्या. मग युद्धे असतात कशासाठी? लुटूपुटूची युद्धे करून शत्रूला सन्मानपूर्वक जिवंत घरी धाडण्यासाठी? यशवंतरावांचे युद्ध धोरण शक्यतो आक्रमकच असे. ते तसेच असले तरच विजय मिळतात. कर्नल फोसेटवर त्यांनी इशाऱ्याची लढाई केली त्यातही त्यांनी त्याच्या दोन पलटणी कापून काढल्या. त्यामुळे इंग्रज वचकला. कधी आक्रमक व्हायचे, कधी शत्रूला सावकाश जेरीस आणत मग संपवायचे, कोठे युद्ध टाळायचे याचे त्यांचे स्वत:चे आडाखे होते आणि ते बव्हंशी यशस्वी झालेले आहेत. यशवंतरावांच्या या आक्रमकतेचा व कथित क्रौर्याचा फटका सामान्य माणसाला बसल्याचे एकही उदाहरण नाही. त्यामुळेच आजही उत्तर भारतात यशवंतरावांचे पवाडे गायले जातात.
‘िहदवाणा हलको हुवा
तुरका रहयो न तत
अग्र अंगरेजा उछल कियौ
जोखाकियौ जसवंत..’
(िहदुस्तानचा एकमेव रक्षक आता राहिला नाही. िहदू समाजाचे बळ तुटले आहे. मुस्लिम बादशहाचे बळ तर पूर्वीच तुटले होते. यशवंतरावांच्या देहांतामुळे इंग्रज बेहद्द खूश झाले आहेत.) असे कवी चन सांदुने यशवंतरावांच्या मृत्यूनंतर लिहिले, यावरून उत्तर भारतात या पहिल्या स्वातंत्र्ययोद्धय़ाचा केवढा सन्मान आहे, याची मराठी वाचकांना कल्पना यावी.
खरे तर इंग्रजी सन्य हे त्यांच्या सन्यापेक्षा खूप प्रशिक्षित आणि अत्याधुनिक शस्त्रास्त्रांनी सुसज्ज होते. भारतातच काय फ्रान्समध्ये नेपोलियनलाही धूळ चारणारे हे इंग्रजी सन्य. त्यात इंग्रजांनी यशवंतरावांवर कोण सोडला तर जनरल जेरार्ड लेक. अत्यंत अनुभवी आणि कडवा सेनानी. त्याला यशवंतरावांनी भरतपूरच्या युद्धात धूळ चारली. त्याचा पराभव हा इंग्रजांच्या जिव्हारी लागणारा होता. जनरल स्मिथ, कर्नल मोन्सन, मरे, फोसेटसारख्या दिग्गजांचा पराभवही यशवंतरावांनी लीलया केला. याचे कारण म्हणजे यशवंतरावही आधुनिकतेचे भोक्ते होते. इंग्रजांएवढी नसली तरी त्यांच्या सन्याला त्यांनी पाश्चात्य शिस्त लावली होती. पेंढाऱ्यांसारख्या तशा बेशिस्त आणि बेबंद सन्यालाही त्यांनी आपल्या कडव्या शिस्तीच्या जोरावर कह्य़ात ठेवले होते. उज्जन व पुण्यावरील मोठय़ा विजयानंतरही त्यांनी पेंढाऱ्यांना शहरे लुटू दिली नाहीत. ज्यांनी प्रयत्न केले त्यांना हात-पाय तोडायच्या शिक्षा दिल्या. इंग्रजांनीही त्यांच्या या कठोर शिस्तप्रियतेचे कौतुक केले आहे. याउलट अन्य सरदारांच्या सन्यातील पेंढाऱ्यांचे वर्तन होते. खुद्द दौलतरावांच्या सन्यातील पेंढाऱ्यांनी पुणे, पुण्याचा परिसर ते पेशव्यांच्या अखत्यारीतील महाराष्ट्र किती निर्दयतेने लुटला याची अंगावर शहारा आणणारी वर्णने माल्कमनेच केलेली आहेत. पेंढारी त्यासाठीच कुप्रसिद्ध होते. पण यशवंतरावांनी त्यांच्या या वृत्तीवर कठोरपणे लगाम घालत त्यांच्या पराक्रमी प्रवृत्तींचा पुरेपूर उपयोग करून घेतला, यातच त्यांच्या सन्य व्यवस्थापनक्षमतेची चुणूक दिसते.

अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही.

इंग्रजांनी यशवंतरावांना सतत लुटारू व दरवडेखोर-बंडखोर असे उल्लेखून बदनाम करण्याचा प्रयत्न केला आहे, पण ती इंग्रजांची जुनीच रीत आहे. शिवरायांनाही ते लुटारूच म्हणत असत. स्वाभाविक आहे. शत्रूची बदनामी करण्याची संधी कोणी सोडत नाही. पण वास्तव हे आहे की यशवंतरावांनी शत्रूकडून रीतसर खंडण्या वसूल केल्या. ज्यांनी नकार दिला त्यांच्याच विभाग-महालांची लूट केली. पण असे करत असताना त्यांनी हात लावला तो फक्त श्रीमंतांना. सामान्यांना नाही अन्यथा उत्तर भारतात त्यांचा जनमानसात सन्मान राहिला नसता. भवानी शंकर खत्रीने त्यांच्याशी गद्दारी केली नसती तर त्याच्या हवेलीला आजही ‘निमकहराम की हवेली’ असे म्हटले नसते. सन्य पोटावर चालते आणि त्याचा खर्च हरलेल्यांकडून वसूल करण्याची जुनी रीत आहे. अगदी आजही ती चालू आहे. दुसऱ्या महायुद्धानंतर अमेरिकेने जपान ते जर्मनीवर ज्या जबरी खंडण्या लादल्या तो इतिहास तर अगदी अलीकडचाच आहे.
शत्रूला बदनामच करायचे झाले की कोणतेही कारण पुरते याचे हा आरोप म्हणजे एक नमुना आहे, यापलीकडे त्याला महत्त्व देण्याची आवश्यकता नाही.
तत्कालीन िहदवी राज्यकर्त्यांमध्ये आस्तित्वातच नसलेले यशवंतरावांचे सर्वात महत्त्वाचे वैशिष्टय़ म्हणजे त्यांना उमगलेली राष्ट्रभावना. १८५७चे बंडही जे झाले ते स्वत:ची संस्थाने सुरक्षित ठेवण्याकरता. राष्ट्रासाठी नाही. दुसऱ्या बाजीरावाला फक्त आपल्या गादीची पडली होती. निजाम, टिपु, बडोद्याचे गायकवाड, उत्तरेतील शिख महाराजे, नबाब, रजपूत राजे हे सर्वच आपापल्या संस्थानांपुरते पाहात होते आणि त्यामुळेच ते इंग्रजांचे मांडलिक/अंकितही बनत गेले. पण यशवंतरावांसमोर फक्त स्वत:चे राज्य कधीच नव्हते.. तर संपूर्ण देश होता. त्यासाठी ते सर्व राजेरजवाडय़ांना, िशदे-भोसलेंना जी पत्रे धाडत होते त्यातील राष्ट्रीयता दाहक आहे. ते पत्रांत म्हणतात..‘पहिले माझे राष्ट्र, माझा देश. आज धर्म, जात, प्रदेश याच्यापलीकडे जाऊन देश-राष्ट्रहित पाहण्याची गरज आहे. माझ्यासारखेच तुम्हा सर्वाना इंग्रजांविरुद्ध संघर्षांने युद्धास उभे राहिले पाहिजे.’ पुढे यशवंतराव भोसलेंना लिहिलेल्या पत्रात म्हणतात, ‘पूर्वी स्वराज्यात ऐक्यता बहुत. येणे करोन आजपावेतो व्यंग न पडता एकछत्री अंमल फैलावला होता..’ स्वराज्याची आठवण करून देत यशवंतराव पुढे तेच स्वराज्य घरापुरते करण्यात जमीनदार ते सरदार कसे गर्क झाले आहेत ही कटु वस्तुस्थिती विषद करत खंत व्यक्त करतात.
एक राष्ट्र, परकियांची हकालपट्टा व एतद्देशियांचा अंमल हेच त्यांच्या संघर्षांमागील खरे आणि एकमेव कारण आहे. आणि १८०३ला त्यांनी सुरू केलेला हा संघर्ष मुळात स्वत:साठी नव्हताच, कारण त्यांचे स्वत:चे राज्य सुरक्षित होतेच. त्यांनी उत्तरेत १८०३ पासून ज्या मोहिमा केल्या त्या सर्वस्वी अन्य राजसत्तांना जागे करत इंग्रजांविरुद्ध बळ एकवटवण्यासाठी. त्यांनी ज्याही १८०३ नंतर लढाया केल्या त्या सर्वच्या सर्व इंग्रजांविरुद्धच्या आहेत. एतद्देशियांविरुद्ध एकही नाही हेही येथे लक्षात ठेवले पाहिजे. या सर्व लढायांत-युद्धांत ते अजिंक्य राहिले आहेत हेही उल्लेखनीय आहे.
माल्कम म्हणतो ते खरेच आहे. यशवंतरावांत एक अद्भुत चतन्य सळसळत असायचे. निराशा त्यांना माहीत नव्हती. पराकोटीची व्यक्तिगत संकटे कोसळूनही त्यांनी मनाचे संतुलन ढळू दिले नाही. त्यांच्या स्वत: मदानात सनिकांच्या खांद्याला खांदा लावून लढण्याच्या वृत्तीमुळे अनेकदा संभाव्य पराजयही त्यांनी विजयात बदलवले आहेत. यशवंतरावांना भारताचा नेपोलियन का म्हणतात हे यावरून लक्षात यावे. खरे तर नेपोलियनच यशवंतरावांपासून तर शिकला नाही ना असा प्रश्न उपस्थित होतो. कारण यशवंतराव आधी झाले. नेपोलियन पाठोपाठ. वाटर्लूचे युद्ध १८१५ मध्ये झाले. आणि भारतात अनेक फ्रेंच तेव्हा तत्कालीन राजकीय व सामरिक घटनांची नोंद घेत होते व त्या आपल्या मायदेशी कळवत होते. त्यातून नेपोलियन काही शिकलाच नसेल असे म्हणता येत नाही. या युद्धात भरतपूरच्या युद्धातील काही सेनानी नंतर सामील झाले होते. तेही म्हणतात भरतपूर वाटर्लूपेक्षा अवघड होते. हीच यशवंतरावांना जागतिक योद्धय़ांनी दिलेली सलामी आहे.
यशवंतराव िहदू धर्माचे अभिमानी जरी असले तरी त्यांनी अन्यधर्मीयांचा दुस्वास केल्याचे एकही उदाहरण नाही. अमिरखानाला तर ते सगा भाई मानत असत. अक्षरश: हजारोंचे मुस्लिम सन्य त्यांच्या पदरी होते. फ्रेंच-इंग्रज असे ख्रिस्ती सेनानी व सनिकही त्यांच्या पदरी होते. त्यांच्या सन्यात भिल्लांसह सर्व जातींचे लोक होते. दरबारात ब्राह्मण कारभारी होते. स्त्रियांबाबत त्यांची भूमिका उदार होती. आपली कन्या भीमाबाई हीस त्यांनी घोडेस्वारी ते सर्व शस्त्रास्त्रांचे शिक्षण दिले तसेच लिहायला-वाचायलाही शिकवले. तत्कालीन सामाजिक स्थितीत राजे-रजवाडय़ांच्या स्त्रिया या जनान्यात पर्दानशीन वा घुंघटात असायच्या. महाराणी तुळसाबाईंनाही त्यांनी आवश्यक ते शिक्षण दिले होते. त्यामुळेच यशवंतरावांनंतर त्या राज्यकारभार पाहू शकल्या. इंग्रजांना अखेर त्यांचा खूनही गफुरखानाला विकत घेऊनच करावा लागला. त्यांचा खून करण्याचे एकमेव खरे कारण म्हणजे त्या जिवंत असता आपल्याला होळकरी राज्य गिळता येणार नाही याची त्यांना पटलेली खात्री.
यशवंतरावांची शिस्त कठोर होती. आपले इंग्रज अधिकारी फितूर झाले आहेत हे कळताच त्यांनी त्यांना देहांत शासन दिले.
यशवंतरावांचे सर्वात मोठे आणि शिवरायांनंतरचे अद्वितीय कार्य म्हणजे त्यांनी जानेवारी १७९९ मध्ये करून घेतलेला वैदिक राज्याभिषेक. या राज्याभिषेकाची कधीच चर्चा होत नाही. यशवंतरावांना पेशव्यांनी अधिकृत कधीच राजवस्त्रे दिली नाहीत. तरी लोकमान्यतेसाठी व अन्य सरदारांनी आपले महत्त्व जाणावे व आपल्या कार्यात साथ द्यावी म्हणून त्यांनी राज्याभिषेक करून घेतला. एका धनगराचा आधुनिक काळातील हा एकमेव राज्याभिषेक. त्याचे ऐतिहासिक मोल अद्याप आपल्याला समजावयाचे आहे.

यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली.

यशवंतरावांना िहदी, पíशयन, उर्दू, मराठी व संस्कृत भाषा येत असत हे वेगवेगळ्या ठिकाणी माल्कमनेच नोंदवून ठेवले आहे. ते स्वत: सर्वच शस्त्रास्त्रे उत्तमरीत्या चालवत असत. बंदुकीवर त्यांचे विशेष प्रेम होते. एकदा नेमबाजीचा सराव करत असता तोडा फुटून झालेल्या स्फोटात त्यांचा उजवा डोळा जायबंदी झाला होता. नंतरही त्यांचे बंदूकप्रेम कधी कमी झाले नाही. भालाफेकीत तर त्या काळात त्यांचा हात धरणारा कोणी नव्हता, असे माल्कमने गौरवाने नोंदवले आहेच. ते स्वत: उत्तम हिशेब तपासनीस होते, त्यामुळे महसूल-खंडणी वसुलीत कारकून त्यांची फसवणूक करण्याची शक्यता नसे. तोफांच्या कारखान्यात स्वत: तोफा ओतण्याचे कामही त्यांनी केले, यावरून त्यांची ध्येयावरची अथांग श्रद्धा सिद्ध होते.
आता प्रश्न असा उपस्थित राहतो की बाजीराव पेशव्यांनी दौलतराव िशदेंच्या एवढे कह्य़ात जाऊन यशवंतरावांचा एवढा दुस्वास का करावा? यशवंतरावांच्या उत्तरेतील पराक्रमाच्या वार्ता कानावर येत असता त्यांचा उपयोग दौलतीसाठी का केला नाही? हे महत्त्वाचे प्रश्न आहेत व या प्रश्नांची उत्तरे शोधणे गरजेचे आहे. कारण पेशवाईच्या अस्तामागे पेशव्यांचे यशवंतरावांबाबतचे चुकलेले धोरण आहे, हे तर उघड आहे.
इतिहासावरून तीन गोष्टी ठळक होतात त्या अशा-
१. मल्हारराव होळकरांच्या निधनानंतर महादजी िशदेंचे प्रस्थ पुणे दरबारात वाढले. त्यांच्यानंतर आलेल्या दौलतरावाने तेच स्थान कायम ठेवण्याचा सर्वस्वी प्रयत्न केला. पेशव्याला आपल्या अंकित ठेवण्याचा सतत प्रयत्न केला, इतका की पेशवे िशदेंचे वर्चस्व झुगारण्यासाठी इंग्रजांच्या मदतीसाठी सन १८०० पासूनच प्रयत्न करत होते, पण तेव्हा ते ब्रिटिशांच्या अटी मानण्याच्या परिस्थितीत नव्हते. अहिल्याबाईंनी तुकोजीरावांना होळकरी राज्याचा सेनापती नेमले असले व विविध युद्धांत सेना घेऊन ते सामील होत असले, तरी ते अहिल्याबाई असेपर्यंत अधिकृत शासक नसल्याने राजकारणात पेशव्यांनी त्यांना सामील करून घेतले नाही. अहिल्याबाई व नंतर तुकोजीरावही गेल्यानंतर होळकरांचे राज्य बेवारस असून ते गिळता येईल असाच दौलतराव व बाजीराव पेशव्यांचा होरा होता. आणि ते शक्य केलेही. पण यशवंतराव एवढे पराक्रमी निघतील व जप्त केलेले होळकरी राज्य ते परत जिंकून घेतील याचा त्यांना अदमास आला नाही. तेथून त्यांचे सारेच आडाखे फसत गेले. दौलतरावाच्या सनिकी शक्तीवर बाजीरावाचा फाजील विश्वास होताच. पुढे यशवंतरावांनी तो आत्मविश्वास धुळीला मिळवला.
२. दुसरे असे की यशवंतरावांना पेशव्याने वा दौलतरावाने ‘औरस’ कधीच मानले नाही. अनौरसाकडे पाहण्याचा खास पेशवाई हिनत्वाचा दृष्टिकोन येथे आडवा आला व कसलीही माहिती नसताना त्यांनी यशवंतरावांना एक ‘बंडखोर’ अशीच उपाधी देऊन पेशवाईचा शेवटपर्यंत शत्रूच मानले. त्यामुळे बाजीरावाने यशवंतराव व िशद्यांत सलोखा घडवून आणण्याचा प्रयत्न केला नाही. िशद्यांनी तसा प्रयत्न फेटाळूनच लावला असता कारण ‘अनौरसाशी काय समझोता करायचा?’ या उद्दाम भावनेतच तो राहिला. पुढेही त्याने यशवंतरावांच्या ऐक्याच्या व इंग्रजांविरुद्धच्या लढय़ाच्या ज्या हाका दिल्या त्याला नीट प्रतिसाद का दिला नाही, याचे उत्तर याच खास तत्कालीन मराठी सनातनी वृत्तीत आहे.. भोसलेंबाबतही हेच म्हणता येईल. प्रत्यक्षात यशवंतरावांनी कोणाहीबाबत कटुता ठेवली नव्हती हे आपण पाहिलेच आहे.
३. पहिले बाजीराव हे जातीभेदातीत बुलंद व्यक्तिमत्त्व होते. त्यामुळे अनेक नवी लढवय्यी घराणी पुढे आली हे वास्तव आहे, पण पुढील पेशवाई ही मात्र फाजील वर्णाहंकाराची होती. पानिपतच्या युद्धकाळातील घडामोडींतच जातीयवादाच्या पाऊलखुणा उमटताना आपल्याला दिसतात. पानिपतच्या पराजयामागे हा छुपा जातीयवाद होता. पानिपतच्या युद्धात मसलतींत मल्हाररावांना डावलले जात होते. ब्राह्मण - मराठा- अन्यजातीय अशी त्रिभागणी उत्तर-पेशवाईच्या काळात झालेली दिसते. एका धनगराला मराठा राजमंडलात बरोबरीचे स्थान द्यावे काय, अशा सुप्त प्रवाहांच्या नोंदी आपल्याला इतिहासात सापडतात. त्यामुळे यशवंतरावांना न मोजण्याचे धोरण दुसऱ्या बाजीरावाने कायम ठेवले असे दिसते. ‘इंग्रजांच्या वर्चस्वाखाली जाणे श्रेयस्कर, पण यशवंतराव होळकरांच्या नको..’ असा निर्णय दुसऱ्या बाजीरावाने घेतला असेल तर त्याची जातीय मनोभूमिका आपण समजावून घेऊ शकतो. पण त्याचे दूरगामी परिणाम काय होतील, याचा कसलाही विचार पेशव्याने केला नाही हे दुर्दैवी आहे. त्याने यशवंतरावांच्या आवाहनांना प्रतिसाद देऊन परत पुण्याला यायला हवे होते.. पण तसे झालेले नाही.
१७९७ ते १८११ असा फक्त चौदा वर्षांचा काळ यशवंतरावांच्या कर्तृत्वासाठी मिळाला. १७९७ ते १८०३ हा काळ यशवंतरावांना स्वत:चे राज्य व अधिकार प्रतिष्ठापित करण्यासाठी, स्वत:ची पत्नी व कन्येस कैदेतून मुक्त करण्यासाठी वेचावी लागली. १८०३ पासून त्यांनी इंग्रजांविरुद्ध र्सवकष अथक लढा उभारला आणि बलाढय़ इंग्रज सेनांना एकामागून एक वेळा पराजित केले. यशवंतरावांना जिंकता येत नाही म्हणून वेलस्लीसारख्या गवर्नर जनरलची हकालपट्टी इंग्रज सरकारला करावी लागली. भारताबाबतची धोरणे बदलावी लागली. जगात अजिंक्य मानल्या जाणाऱ्या इंग्रज सेनेची इभ्रत जगाच्या वेशीवर टांगली गेली. एवढे झंझावाती, दुर्दैवाच्या आघातांनी भरलेले त्यांचे जीवन. पण त्यांचा अजरामर आशावाद कधीच निस्तेज झाला नाही. कलकत्त्यावर आक्रमण करून एकटय़ाच्या जिवावर भारत स्वतंत्र करण्याची त्यांची उमेद अखेरच्या क्षणापर्यंत अभंग होती. मला वाटते कोणत्याही महाकवीला स्फूर्ती देईल असेच हे वादळी जीवन होते. असा महामानव आपल्या धर्तीवर जन्माला आला हे आपले भाग्यच आहे. आपण त्यांना समजून घेतले नाही, हे आपले दुर्भाग्य आहे.
जेम्स व्हीलर नावाचा पाश्चात्य इतिहासकार यशवंतरावांबद्दल लिहितो-
" The life of Yashwant Rao Holkar was one of unceasing struggle and peril, endured with the abounding high spirits for which he was renowned. He experienced the murder of one brother by Sindhia and the public execution of another by the Peshwa. He took lightly even the loss of an eye by the bursting of a matchlock; jesting at the belief that a one-eyed man is wicked, he exclaimed that he had been bad enough before but would now surely be the guru or high priest of roguery. He was generous as well as witty, and his wildness was pardoned as part of the eccentricity of genius. He was of superior education as well as superior mental abilities, a skilled accountant and literate in Persian as well as Marathi.
" No member of his race ever possessed the gift of guerilla warfare in such higher measures as did Yashwant Rao Holkar. His resources were always slight, but his energy and hopefulness boundless. When for the war that now followed he announced to his troopers that they must gather their own rewards and these conditions were accepted with enthusiasm. His reputation was such that, even when himself a fugitive from Scindiaks army, he had been continually strengthened by desertions from his pursuer. His personal courage was of the kind which soldiers most esteem, that of such leaders as Ney and Lannes, and he never lost his personal ascendancy until he lost his reason. "
खरे यशवंतराव या पुस्तकामुळे कळायला मदत झाली असेल.. आता तरी त्यांच्या वीरश्रीचे, स्वातंत्र्यप्रेमाचे पवाडे मुक्तकंठाने गाल आणि भारतभूमीच्या या सुपुत्राची नित्य आठवण ठेवाल अशी आशा आहे.