Friday, April 13, 2012

श्री संत कान्होपात्रा

महान भगवतभक्त महावैष्णव श्री ज्ञानेश्वर महाराज कालीन १२ व्या शतकात मंगळवेढे नगरीत त्यावेळी बिदरचे बहामनी राज्याचा जुल्मी सत्तेचा अंमल होता. अशा जुलमी सत्तेच्या काळात मंगळवेढ्यात कृष्ण तलावाच्या शेजारीस एक जुनाट असे महादेवाचे मंदीर आहे. आणि त्या मंदीराशेजारी शामा नायकीण नावाची एक नर्तकी नाचगाणे करून त्यावेळच्या धनधांडग्या अमिर उमरावांना व मुसलमानी सरदारांना खुश करीत असे. प्रसंगी स्वत:चा देह विक्री करायला सुध्दा ती मागे पूढे पाहत नसे. त्यामूळे तिची किर्ति दुरवर पसरली होती. लांब लांब चे श्रीमंत व धनवान लोक मंगळवेढ्यास येऊन शामा नायकीणच्या घरी हजेरी लावत असत. अशा या शामा नायकीणच्या पोटी सुंदर असे एक कन्यारत्न जन्मास आले. चिखलातून तसे कमळ उगवावे त्याप्रमाणे ती कन्या चंद्रकलेसारखी दिवसेंदिवस वाढू लागली. शामाने तिचे नाव कान्होपात्रा असे ठेवले. वयात आल्यावर आपल्या मुलीनेही आपल्याप्रमाणे नाचगाणे करून बड्या श्रीमंतांची मर्जी राखावी असे शामाला वाटू लागले. कान्होपात्रा ही अती सुस्वरूप व सुंदर मुलगी होती. पण वयात आल्यानंतर नायकिणीचा धंदा न करता तिने पांडुरगाच्या भक्तीत वाहून घेतले. व ती पंढरपूरास वारक-यासोबत वारीला जात असे. त्यामुळे तिला संत श्रेष्ठ ज्ञानेश्वर माऊलीची भेट होऊन सहवास लाभला. संत संगतीमुळे तिच्या जीवनात अमुलाग्र बदल झाला व ती नेहमी हरीनाम दंग होत असे व किर्तन ही करत असे. तीचे अनेक अभंगही प्रसिध्द आहेत.
योगिया माजी मुगुट मणी । त्रिंबक पाहावा नयनी ॥
माझी पुरवावी वासना । तू तो उध्दाराच राणा ॥
करुनिया गंगा स्नान । घ्यावे ब्रह्मगिरीचे दर्शन ॥
कान्होपात्रा म्हणे पंढरीराव । विठठल चरणी मागे ठाव ॥

तिच्या देखणेपणाची ख्याती बिदरचे बादशहाला समजताच त्याने तिला पकडून आणण्यासाठी आपल्या सरदारास मंगळवेढ्यास पाठवले. आपले शील भ्रष्ट होऊ नये म्हणून ती पंढरपूरी गेली व विठठल मंदीरात जाऊन परमेश्वराचा धावा करु लागली. बादशहाचे सरदार तिला पकडण्यासाठी मंदिरात गेले. त्यावेळी कान्होपात्रेने भक्तवत्सल पांडूरंगाच्या पायास कडकडून मिटी मारली व आर्तवाणीने पांडुरंगाचा धावा केला
नको देव राया अंत असा पाहू । प्राण हा सर्वता जावू पाहे ॥
हरीणीचे पाडस । व्याघ्रे धरीयले । मजलागी झाले तैसे देवा ॥
मोकलून आस । जाहले उदास । घेई कान्होपात्रेस ह्र्द्यात ॥

बादशहाच्या सरदाराने तिचा पंढरपूरी पाठलाग केला. तेंव्हा तिने अत्यंत करूण वाणीने धावा करून आपला देह पांडुरंगाच्या चरणी समर्पण केला. परमेश्वर प्रसन्न झाले. तिचा जीवआत्मा तिचे कुडीतून परमेश्वर स्वरूप झाला व तिचा देह तेथेच मृतवत होऊन पडला. तिला मंदिराच्या दक्षिण दरवाज्याजवळ पूरण्यात आले आहे. तेथे एक तरटी वृक्ष उगवला असून तो अक्षय हिरवा आहे. शालिवाहन १२ व्या शतकात घडलेली ही सत्य घटना कान्होपात्रेच्या तरटी वृक्षाच्या रुपाने आजही जसाच्या तशी पांडुरंगाच्या मंदिरात काळ्या दगडावर उभी आहे.

विठ्ठलभक्तीचा लखलखीत आविष्कार घडवणाऱ्या कान्होपात्रेविषयी फार कमी माहिती उपलब्ध आहे. त्यांनी बरीच अभंगरचना केली असावी, पण ते लिहून ठेवणारं कुणी नव्हतं. त्यामुळे त्यांचं खूप थोडं काव्य उपलब्ध आहे. पण त्यांचं जे भक्तीरसपूर्ण अभंग उपलब्ध आहेत त्यातल्या विठ्ठलभक्तीच्या आविष्काराने आपण दिपून जातो.

इतर विठ्ठलभक्त स्त्रियांहून कान्होपात्रेचं जीवन पूर्णत: भिन्न होतं. शामा नावाच्या अतिशय धनवान, रूपसंपन्न गणिकेच्या पोटी तिचा जन्म झाला. ऐषोआरामी आणि सुखोपभोगी वातावरणात ती वाढली. त्या घरात विठ्ठलभक्तीची परंपरा असणं शक्यच नव्हतं. वेश्याकुळातल्या स्त्रीला गुरू तरी कुठला लाभणार? पण गणिकेच्या रूढ अशा भोगविलासी मार्गाकडे न जाता ती परमार्थ मार्गाकडे वळली आणि उत्कट भक्तीने परमेश्वरस्वरूप पावली.
पंढरपूरपासून सात कोसांवर मंगळवेढे गावात राहणाऱ्या धनाढ्य शामा नायकिणीची कान्होपात्रा ही मुलगी. वडील अर्थात कोण ते माहीत नव्हतं. पण शामाचा असा अंदाज होता की गावचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर तिचा पिता असावा. लहाणपणीच तिच्या पायात बांधलेले गेलेले चाळ कोडकौतुकाचे नव्हते तर वेश्यावृत्तीला अपरिहार्य असं नृत्य शिकण्यासाठी होते. रूप आणि तारुण्याच्या जोरावर लोकांकडून पैसे वसूल करावेत असं वातावरण अवतीभोवती होतं. आईचा आग्रह तसाच होता. पण भक्तीचा अंकूर तिच्या हृदयात फुटला होता.

कान्होपात्रा रूपवती होती. तितकीच बुद्धीमानही होती. ती मेनका-अप्सरेचा अवतार असल्याचं लोककथांमधून मांडलं गेलंय. गायन आणि नृत्यात तिने अगदी लहान वयात प्रावीण्य मिळवलं होतं. हळूहळू तिचं कलानैपुण्य आणि सौंदर्याची कीतीर् दूरवर पसरली. तिची आई अत्यंत धनवान गणिका होती. महालासारखा त्यांचा भव्य प्रासाद होता. अनेक दासी तिच्या सेवेला तत्पर होत्या. शामाने कान्होपात्रेच्या शिक्षणाची चोख व्यवस्था केली होती. कान्होपात्रेने आपला गणिका व्यवसाय पुढे चालू ठेवावा. राजदरबारी रूजू व्हावं असं शामाला वाटत होतं. तर कान्होपात्रेला त्याची किळस वाटत होती. मुलीच्या रूपगुणांना योग्य असा पुरूष कान्होपात्रेला मिळावा असं शामाला वाटत होतं. पण कान्होपात्रेने आईला स्पष्ट सांगितलं की माझ्यापेक्षा रूपवान पुरूष असेल तर मी त्याच्याजवळ राहेन, विवाह करेन. ही अट अर्थात कठीण होती.

मंगळवेढ्याचा नगराध्यक्ष सदाशिव मालगुजर याची नजर कान्होपात्रेवर पडली. त्याने कान्होपात्रेचं नाचगाणं बघण्याची इच्छा व्यक्त केली. शामाने काहीतरी सांगून कान्होपात्रेला कसंबसं सदाशिवसमोर आणलं. त्याची विषारी नजर तिच्यावर पडली. याच्यासारख्या नीच माणसाच्या इच्छेखातर आपण गायन-नृत्य करणार नाही असं तिने त्याच्या तोंडावर सांगितलं. भडकलेल्या नगराध्यक्षाने सूडसत्र सुरू केलं. ती त्याची मुलगी असल्याचं शामाने सांगून पाहिलं. पण तो इतका वासनांध झाला होता की हे खोटं असल्याचं त्याने म्हटलं. शामा आणि कान्होपात्रेचा छळ सुरू झाला. वैभव ओसरलं. त्याच्याविरूद्ध न्याय कोण देणार? अखेर शामाने त्याची माफी मागितली. त्याने तीन दिवसांत कान्होपात्रेला आपल्यासमोर आणून उभं करण्याचा हुकुम दिला. या संकटाने कान्होपात्रा डगमगली नाही. ती देवासमोर हात जोडून जप करू लागली. रात्रभर ती जप करतच होती. पहाटे डोळा लागला आणि भजन-टाळांचा गजर ऐकून कान्होपात्रेला जाग आली.

वारकऱ्यांचा एक जत्था आषाढीनिमित्त भजन गात पंढरपूरास चालला होता. त्याक्षणी मनातला अस्पष्ट विचार तिने पक्का केला. तिची म्हातारी दासी हौसा वारकरी होती. बळजबरी अत्याचारातून सुटण्याची संधी जणू देवाने तिला दिली होती. हौसाच्या संगनमताने तिने फाटके विटके कपडे घातले आणि ती पंढरपूरला निघाली. तिच्या मनाला विठ्ठलाची ओढ लागली. मध्यरात्रीच्या अंधारात एका दासीच्या वेषात तिने मंगळवेढे सोडलं. यापुढे रूपवती तरुण कान्होपात्रेने निर्भयतेने पूर्णपणे विठ्ठलावर विसंबून आपला जीवनक्रम ठरवला. पंढरपूरला आल्यावर तिने पांडुरंगाचं दर्शन घेतलं आणि त्यावेळी ती संपूर्णपणे त्याच्या चरणाशी एकाग्र झाली.

व्याकूळ भावाने ती विठ्ठलाची विनवणी करू लागली -

मज अधिकार नाही । भेटी देई विठाबाई ।।

ठाव देई चरणापाशी । तुझी कान्होपात्रा दासी ।।

आपलं सगळं अस्तित्व विठोबाच्या पायी समपिर्त करून तिने त्याचं दास्यत्व पत्करलं. कान्होपात्रा स्वरचित अभंग गाऊ लागली आणि तिचा स्वगीर्य आवाज ऐकून हजारो वारकरी तल्लीन झाले. तिथे येणारे सारे विठ्ठलावरच्या प्रेमामुळेच येत होते. त्या अभंगातला भाव त्यांच्या हृदयाला भिडला. वृद्ध हौसाबाईने कान्होपात्रेसाठी आणि स्वत:साठी एक झोपडी बांधली. कान्होपात्रा दिवसातून दोनदा विठ्ठलाचे देऊळ झाडून पुसून लख्ख करत असे. पहाटे आणि रात्री ती देवासमोर नृत्य आणि भजन करी. लोकांना वाटे ती देवाचं वेड घेतलेली, गरीब शेतकऱ्याची पोर आहे. कान्होपात्रा दिवसेंदिवस विठ्ठलभक्तीत खोल बुडत गेली. लोक तिचा आदर करू लागले. भोगविलासाची इच्छा तिला नव्हतीच. मुळचा ओढाच परमार्थाकडे असल्याने तिच्या ध्यानी मनी विठ्ठल राहू लागला. मन त्याच्या चरणी एकाग्र होऊ लागले. त्याची भेट व्हावी म्हणून तळमळ होऊ लागली.

जिवाचे जिवलगे माझे कृष्णाई कान्हाई

सावळे डोळसे करूणा येथु देई काही

अशी आर्त विनवणी उमटू लागली. कालांतराने,

सर्व सुखाचे जे निजसुखाचे सारगे माय

तो हा पंढरीराय विटेवरी

असा समाधानाचा, शांतीचा भाव मनी उपजला. विठ्ठलाचे चरण हे आत्मसुखासमान असल्याने सर्व इच्छा, वासना निमाल्या. इकडे नगरप्रमुखावर खवळलेल्या लोकांनी त्याच्या घराला आग लावली. पण तो निसटून बादशहाकडे गेला. बादशहाच्या साहाय्याने त्याने लोकांवर सूड उगवला. त्यांच्या घरादारांवर नांगर फिरवला. त्यांना पकडून तुरुंगात टाकून हाल केले आणि सर्वत्र वचक बसवला. नंतर त्याने कान्होपात्रेचा पत्ता मिळवला आणि तिच्या लावण्याचं वर्णन करून तिला जनानखान्यात दाखल करण्याविषयी बादशहाला उद्युक्त केलं. बादशहाने पंढरपूरच्या पुजाऱ्यावर फर्मान बजावलं की त्याने कान्होपात्रेला स्वाधीन करावं. नाहीतर मंदिर जमीनदोस्त करण्यात येईल. विठ्ठलमंदिराला सैनिकांचा गराडा पडला. आपल्यासाठी लाखोंचं भक्तिस्थान असलेलं सारसर्वस्व विठ्ठलाचं राऊळ उद्ध्वस्त व्हावं हे तिला सहन होणं शक्यच नव्हतं. कान्होपात्रा सेनाधिकाऱ्यासमोर हजर झाली. तिने एकवार विठ्ठलाचं दर्शन घेण्याची परवानगी मागितली.

कान्होपात्रा तडक देवासमोर हात जोडून उभी राहिली. देवापासून दूर जाण्याची कल्पना तिच्यासाठी असह्य होती. ती देवाला म्हणाली,

नको देवराया अंत आता पाहू ।

प्राण हा सर्वस्व फुटो पाहे ।।

हरिणीचे पाड व्याघ्रे धरियले

। मजलागी जाहले तैसे देवा ।।

तुजविण ठाव न दिसे त्रिभुवनी

। धावे वो जननी विठाबाई ।।

मोकलूनी आस, झाले मी उदास ।

घेई कान्होपात्रेस हृदयास ।।

परमेश्वराची आर्त व्याकूळ विनवणी करत असलेला तिचा आवाज सर्वत्र भरून राहिला. आपल्या उत्कट भक्तीने चराचर चैतन्याशी ती जोडली गेली आणि अखेर त्या चैतन्याशी एकरूप झाली. आपल्या विठ्ठलाच्या पायाशी तिने देह ठेवला. एक आख्यायिका अशी आहे की, त्यावेळी चंदभागेला प्रचंड महापूर आला. सारं यवन सैन्य वाहून गेलं. विठ्ठल मंदिरही जलमय झालं. चंदभागेतल्या एका खडकाळ जागी आधी तिचं शरीर अडकलं. मग ते महासागराच्या खोल तळाकडे चंदभागेने वाहून नेलं. दुसऱ्या दिवशी पूर ओसरल्यावर तिचा मृतदेह ज्या खडकाळ जागी काही काळ पडला होता तिथे एक तरटी वृक्षाचं रोप उगवल्याचं आढळलं. तो अक्षय तरटी वृक्ष आजही कान्होपात्रेच्या विठ्ठलभक्तीची ग्वाही देत तिथे उभा आहे.

कान्होपात्रेने स्वत:ला देवाची वधू म्हणवलं तरी तिचा विठ्ठल तिच्यासाठी आई होता. सखा होता. माय, बाप, बंधू, भगिनी होता. देहाच्या उपाधी सुटाव्या म्हणून देवाकडे प्रार्थना करते. कान्होपात्रेला काय हवं होतं? 'देगा प्रेमकळा-नाम तुझे' विठ्ठल तिच्यासाठी कनवाळू, मायमाऊली होता. दासाची कळकळ वागवणारा दीनांचा नाथ, कृपावंत मालक होता. भक्तांचा दास होता. ज्याच्या प्राप्तीसाठी चारी वेद सहाही शस्त्रं शिणली तो केवळ भक्तीने प्राप्त होतो. 'अगा वैकुंठीच्या राया, अगा विठ्ठल सखया' अशी आर्त हाक ती त्याला आपल्या संरक्षणासाठी मारत होती.

कान्होपात्रेच्या अपूर्व भक्तीने अखेर तिला सर्वातून मुक्ती मिळाली. विठ्ठलाचे पाय न सोडता त्याच्या चरणी सहज देहत्याग घडावा हे पराकोटीच्या भक्तीखेरीज अशक्य होतं. कुणी गुरू नाही. काही परंपरा नाही. भक्तीचं वातावरण नाही. अशा परिस्थितीत केवळ आपल्या भक्तीने तिने ईश्वरप्राप्ती करून घेतली. म्हणून कान्होपात्रा अद्वितीय ठरते. तिच्या भक्तीमुळे समाजही तिच्या पायाशी नतमस्तक झाला आणि तिला संतपद मिळालं.

जनाबाई

भीमा आणि इंद्रायणीच्या संगमावर छत्रपति संभाजी राजांना औरंग्याने अत्यंत क्रुरपणे ठार मारले. राजांच्या देहाचे अक्षरशः तुकडे तुकडे करुन नदी काठावर व पाण्यात फेकुन देण्यात आले. खरे तर इतर वेळी दुनियाभरातील पापे करणारी पापी मंडळी आपले पाप प्रक्षलन करण्यासाठी अशा पवित्र नद्यांच्या संगमावर येतात. परंतु त्या नद्याच आज संभाजी महाराजांच्या देहाच्या मासाच्या फेकल्या गेलेल्या तुकड्यांनी रक्तांनी पावन झाल्या होत्या. आख्या महाराष्ट्राला पावन करणार्‍या या नद्यांनाच पावन करण्याची संधी या बलिदानाच्या निमित्ताने संभाजी राजांना जीवनाच्या शेवटाच्या क्षणी मिळाली. तेही महाराष्ट्राचे एक प्रकारे भाग्याच होय.

पुण्याच्या बारा मावळ मधुन झालेली स्वराज्याची सुरुवात संभाजी राजांना पुण्याच्या परिसरात मारुन आपण शेवट करु असा गैरसमज असणार्‍या बादशहाला पुढे आयुष्यभर कळुन चुकले की आपण जेवढे संभाजी राजांचे हाल हाल केले तेवढा हा महाराष्ट्र देश पेटुन उठला व भीमा इंद्रायणीच्या पात्रात साक्षात सामिल झालेले शंभु राजांचे रक्त घराघरात लोकांना प्रेरणा देवुन गेले. देशासाठी जगायचे तर शिवबा सारखे आणि मरायचे तर संभाजी सारखे हाच तो संदेश आणि हाच तो महाराष्ट्राच्या मुक्तीचा मंत्र. संभाजी राजांच्या देहाचे तुकडे तुकडे करुन नदी काठवर फेकल्याचे सर्वात पहिले जर कोणाला कळले असेल तर ते जना परटीणीला. कारण नदीवर कपडे धुण्याकरीता ती गेली होती. बिचारी कपडे तसेच घेवुन धावत धावत पळत आली गावच्या पाटलासह सर्व मंडळींना त्या धनगराने सांगितलेली सर्व हकिकत सांगितली परंतु कोणीही पुरुष बादशहाच्या फर्मानामुळे पुढे येण्यास धजत नव्हता.

अख्खा महाराष्ट्र जणु षंड झाला होता तेंव्हा याच जना परटीणीने आपली मालकीन राधाबाई व इतर महिलांना गोळा करुन संभाजी राजांच्या देहाचे तुकडे गोळा करुन अंतिम संस्कार करण्याचा निश्चय केला व त्याप्रमाणे अंधार्‍या रात्रीत धडपडत जावुन त्या सर्व महिलांनी संभाजी राजांच्या देहाचे विखुरलेले तुकडे गोळा करुन गावात आणले कारण नदी किनारी आग पेटवली असली तर औरंग्याच्या सैनिकांना कळले असते. आणि औरंग्याने तर फतवाच काढलेला शंभु राजाच्या देहाला कोणी हात लावायचा नाही.

अहो पण मृत्युच्या भीतीने आपल्या राजाच्या देहाला शिवायला महाराष्ट्रातील वतनदार जरी घाबरले असतील तरी राष्ट्रमाता जिजाऊ साहेबांनी बाळकडु पाजुन घडवलेली स्त्री शक्ति मात्र अजुनही शाबुत होती. आणि त्यांच्या मनगटांनीच ते आव्हान पेलले व शंभु राजांच्या देहाला अग्नि देण्याचा ऐतिहासिक निर्णय त्यांनी घेतला. आणि महाराष्ट्राच्या समस्त रयतेची अग्नि परिक्षा ठरु शकणार्‍या या अत्यंत अवघड आणि मोलाच्या कामगिरीला त्यांना अंजाम दिला.

ज्या संभाजीच्या चरित्र्यावर बखरकारांनी अनेक प्रकारचे शितोंडे उडविले त्या मुर्खांना जेंव्हा हे कळेल की शंभु राजाच्या चितेला अग्नि देण्यासाठी जेंव्हा अख्खा महाराष्ट्र षंड झाला होता तेंव्हा हीच स्त्री शक्ती या राजाच्या अग्निसंस्कारासाठी कामी आली. एखाद्या दुर्व्यसनी बदफैली व्यक्तिसाठी स्त्री वर्गाची एवढी अपार सहानभुती असुच शकत नाही. शेवटी शंभु राजांच्या चितेला अग्नि देण्याची मातृशक्तिने तयारी दाखवली तरीही महाराष्ट्रातील वतनदार जमीनदार खानदानी लोक चितेसाठी जागा द्यायस तयार नव्हते. तेंव्हा गाव कोसाबाहेर राहणार्‍या महार समाजाने शंभु राजांच्या चितेला अग्नि देण्यासाठी आपली जागा उपलब्ध करुन दिली.

परंतु सर्वात मोठा वाटा होता तो स्त्री शक्तीचा त्यामुळे जेंव्हा जेंव्हा संभाजी राजांच्या चरित्राचा उच्चार केला जाईल तेंव्हा तेंव्हा या मातृशक्तीचा महाराष्ट्र देशावर आणि स्वराज्यावर असलेले उपकार स्मरण केले जातील हे मात्र नक्की ज्या छत्रपति संभाजींना बखरकारांनी स्त्रीयांचे नाव जोडुन बदनाम केले ते कदाचित नियतीला मंजुर नव्हते आणि सत्य बाहेर येणे काळाची गरज होती म्हणुनच कदाचित संभाजी महाराजांच्या चितेला अग्नि देण्यासाठी स्त्री शक्तीला पुढाकार घेण्याची संधी मिळाली आणि स्त्री शक्तीने हे ऐतिहासिक कार्य पार पाडुन संभाजी राजांच्या चितेला अग्नि देवुन त्यांच्या बद्दल बखरकारांनी तयार केलेले खोटे नाटे प्रसंग यांनाही अग्नि दिला.

कवी कलश

संभाजी महाराजांचे चरित्र एका व्यक्तिशिवाय पुर्णच होवु शकत नाही आणि ती व्यक्ति म्हणजे कवी कलश. खरे तर कवी कलशांना बखरकारांनी खुपच बदनाम केलेले दिसते. कवी कलशांना बदनाम करण्यामध्ये त्याच लोकांचा हात आहे ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर बहिष्कार टाकला. राजांच्या अभिषेकासाठी महाराष्ट्रातील एकही भट ब्राह्मण पौरोहित्य करण्यास तयार झाले नाही. तेंव्हा राजांनी काशीवरुन गागा भट्टांना आणुन राज्याभिषेक पार पडला. सहाजिकच उत्तरेतील ब्राह्मणांबद्दल महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राग होता व पुढे त्यांनी तो वेळोवेळी व्यक्त करत कवी कलशाचे बलिदान अडगळीत टाकुन त्यांना बदनाम करण्याची मोहिम सातत्याने चालुच ठेवली. अर्थात जे लोक संभाजी महाराजांना शिव्या देताना मागे पुढे पाहत नाहीत ते कवी कलशाबद्दल अनुदगार काढायला थोडेच कचकणार आहेत. कवी कलश संभाजी राजांचे खुपच विश्वासु असे मित्र होते. कवी कलश ब्राह्मण असुनही तलवार बाजी करण्यामध्ये खुपच पटाईत होते. कदाचित त्यांना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची रीत चांगलीच माहिती होती, देशासाठी शस्त्र घेईन हाती हे शिकुनच आले होते.

कवी कलश यांची बुद्धीमत्ता निष्ठा व शौर्य पाहुनच संभाजी राजांनी कवी कलशांना अष्टप्रधान मंडळात सामिल करुन घेतले व त्यांना छंदोगामत्य अशी पदवी दिली. अर्थात कवी कलश जेवढे संभाजी राजांच्या जवळ गेले तेवढे महाराष्ट्रातील नतद्रष्टांच्या डोळ्यात खुपायचे म्हणुनच अष्टप्रधान मंडळाची भट कंपनी एकत्र येवुन कवी कलशांना कोंडीत पकडण्याचा नेहमीच प्रयत्न करायचे. कवी कलश एवढे बुद्धीमान होते की संभाजी राजे बहुतेक निर्णय त्यांच्या सल्लामसलती नंतरच घ्यायचे परंतु त्यांचा एखादा निर्णय किंवा मोहीम बाहेर फुटली असे कधीच घडले नाही यावरुन कवी कलशांची विश्वसनीयता स्पष्ट होते आणि म्हणुनच संभाजी राजांनी त्यांना पुढे कुलमुख्तेयार म्हणजे प्रशासनाचे प्रमुख म्हणुनही जबाबदारी दिली होती. कवी कलश शाक्तपंथीय होते त्यानुसार ते शक्ती पुजा करायचे. तेंव्हा येथील सांप्रदायाचे मंडळींनी त्यांच्याबद्दल ते मेलेल्या रेड्याच्या कातड्यावर पुजा करतात, बळी वगैरे देतात असा निखालच खोटा प्रचार करुन त्यांची विश्वसनियता व लोकप्रियता संपवीण्याचा प्रयत्न केला. कवी कलशांना अशा अनेक अपमानजन घटनांना सामोरे जावे लागले.

एकदा तर ते महाराष्ट्र सोडुन जाण्याच्या तयारीतच होते परंतु संभाजी राजांनी समजुन घालुन तुमच्या एवढा भरवसा आम्ही दुसर्‍या कोणावर ठेवु शकत नाही असे ठणकावुन सांगत आग्रह केल्यामुळेच ते पुढेही तेथेच राहीले. परंतु आपल्या कर्तव्यात कोठेही कुचराई येऊ दिली नाही याच कवी कलशांनी संभाजी राजांच्या गैर हजेरीत शहाबुद्दीन खानने रायगडावर केलेले आक्रमण रायगडाच्या वेशीवरच मोडुन काढले. याच कलशावर राजांनी कुडाळ व डीचोलीचे बारुदखाने चालवण्याची जबाबदारी दिली होती. याच कलशांनी जेंव्हा गणोजी शिर्केंनी प्रल्हाद पंतसारख्या जुन्याशिलेदाराला पैशाचे आमिष दाखवुन पन्हाळा मुघलांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला तेंव्हा रायगडावरुन विशाळगड व तेथुन ३ हजारांची फौज मलकापुर येथे तातडीने पन्हाळगडावर चढवुन पन्हाळा वाचवीला होता तो पर्यंत संभाजी राजे पश्चिमेकडुन येऊन किल्यावर थडकले होते. पन्हाळा ही स्वराज्याची उपराजधानीच मुकबर खानाने बळकवण्याचा प्रयत्न कवी कलशांच्या प्रसंगावधानाने हाणुन पाडता आला.

संभाजी राजांनी औरंगजेबाशी होणार्‍या अखेरच्या लढाईची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे जी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कवी कलशही जातीने हजर झाले होते. संभाजी राजांबरोबर लढता लढता तेही कैद झाले होते औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ करु पाहीला. त्यांना वेगळे भेटायला बोलवुन जहांगिरीचे आमिष दाखविले. परंतु कवी कलश बादशहाच्या आमिषाला न धजता स्वराज्याच्या खाल्या मिठाला जागले. औरंगजेबाने पुन्हा एकदा कवी कलशाचे मन तपासुन पाहीले कवी कलशांना अगदी आगतीक होवुन विनंती केली. अरे काय जादु आहे शिवाजीची आणि संभाजीची इथल्या मुलखावर व लोकावर अरे राजा कैद झाला, सेनापति मारला गेला तरी हे मराठे शरण येत नाहीत कोणत्या मातीचा स्वाभिमान यांच्या रक्तात भरला आहे. संभाजीची धिंड काढली प्रचंड अपमान केला तरीही मराठे चालुन आले नाहीत कि महाराणी येसुबाई रायगड सोडत नाहीत. या पेच प्रसंगातुन आपणच मार्ग काढु शकता तेंव्हा तुम्ही संभाजी राजांचे विश्वासु सहकारी आहात छंदोगामत्य आहात तुमच्यावर मराठी फौजेचा आणि स्वतः येसुबाईचा विश्वास आहे त्यामुळे तुम्ही एवढेच करा की संभाजी राजांच्या नावाने कागद तयार करुन सही शिक्यानिशी रायगडावर पाठवा व संभाजी राजांच्या जिवीत रक्षणासाठी सर्व किल्यांच्या चाव्या देवुन सर्व किल्ले आमच्या ताब्यात द्या त्याच्या बदल्यात तुम्हाला हवी तेवढी उत्तरेकडील जहांगिरी देऊ शिवाय कुराणाची शपथ घेऊन सांगतो कि संभाजीला जिवदान देवु. औरंगजेबाला वाटले, महाराष्ट्रातील काही वतनाला चटावलेले बांडगुळ वतनदार जसे जहांगिरीला भाळले तसे कवी कलशही भाळतील परंतु बादशहाची अपेक्षा फोल ठरली.

कवी कलशाने अशा अनेक प्रकारच्या धोकेबाजीचा ठाम नकार देवुन उलट बादशहाच्या धोकेबाजीचा पाढाच त्यास वाचुन दाखविला. अशा बेईमान माणसांवर जगातील कोणतीही व्यक्ति विश्वास ठेऊ शकत नाही हे ठणकावुन सांगितले. तेंव्हा राग अनावर होवुन औरंग्याने कवी कलशांची जीभच छाटली. पुढे पुढे संभाजी राजांवर जो अमानुष प्रयोग केला जायचा त्याची रंगीत तालीम औरंग्या कवी कलशांवर करायचा जेणेकरुन कवी कलशांचे हाल पाहुन संभाजी राजे गहीवरुन शरण येतील परंतु जीवलग मित्रांना वेगळे करुन पाहिले, आमिषे दाखविली व शेवटी अनेक अन्वित अत्याचार केले गेले प्रसंगी जीव दिला परंतु कवी कलशांनी महाराष्ट्राशी व स्वराज्याशी व संभाजी राजांशी ईमान राखत आपल्या देहाचे बलिदान याच महाराष्ट्राच्या भुमीवर संभाजी राजांच्या अगोदर दिले. संभाजी राजांबरोबर एवढ्या हाल अपेष्टा भोगणारा प्रत्यक्ष मृत्युलाही सामोरे जाणार्‍या कवी कलशांचा हा महाराष्ट्र नेहमीच ऋणी राहील. संभाजी राजांच्या चरित्रात या कवीला अमर रुप प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे योगदान महाराष्ट्रातही १६०० किलोमीटरहुन आलेल्या कवी कलशाने दिले आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने कधीच विसरु नये.

क्रांतीवीर बाबाराव सावरकर !

स्वा. सावरकरांना घडवणारे शिल्पकार

क्रांतीवीर गणेश दामोदर तथा बाबाराव सावरकर हे स्वा. विनायक दामोदर सावरकर यांचे थोरले बंधू. त्यांनीच स्वा. सावरकरांना पितृतुल्य प्रेम देऊन, अत्यंत हालअपेष्टा सोसून लहानाचे मोठे केले आणि त्यांच्या बरोबरीने क्रांतीकार्यातही भाग घेतला.

बाबारावांचा जन्म नाशिक जिल्ह्यातील भगूर या गावी १३ जून १८७९ रोजी झाला. लहानपणी त्यांची प्रकृती नाजूक होती. सहाव्या वर्षापासून चौदाव्या वर्षापर्यंत त्यांना सुमारे दोनशे वेळा विंचूदंश झाले. पुढील क्रांतीकारी आयुष्यात यातना सहन करण्याची शक्‍ती यावी, अशीच ही निसर्गाची योजना असावी. तरुण वयातही त्यांनी स्वत:च्या शरीरास मुद्दामहून खूप कष्ट दिले. कडक थंडीतदेखील ते उघड्या अंगाने, पांघरूण न घेता घराबाहेर झोपत. त्यांच्या डोक्यात क्रांतीचेच विचार सतत घोळत असत. बलाढ्य ब्रिटीश साम्राज्याविरुद्ध क्रांती करणे हे एकट्यादुकट्याचे काम नाही, तर त्यासाठी प्रबळ आणि कट्टर संघटना आवश्यक आहे, हे बाबारावांनी लहान वयातच हेरले. यासाठी `मित्रमेळा' या संघटनेची स्थापना करण्यात आली. राष्ट्रगुरु रामदासस्वामी, छत्रपती शिवाजी महाराज, नाना फडणवीस आदी थोर पुरुषांच्या जयंत्या जाहीर सभा घेऊन साजर्‍या करण्यास त्यांनी सुरुवात केली. त्यामुळे तरुणांत आणि जनतेत देशभक्‍ती जागृत होण्यास खूपच मदत झाली. या निमित्ताने लोकमान्य टिळक, `काळ' या वर्तमानपत्राचे संपादक शिवराम महादेव परांजपे यांची देशभक्‍तीने रसरसलेली भाषणे नाशिककरांना ऐकण्याची संधी प्राप्‍त झाली.

वन्दे मातरम् अभियोग !

बाबारावांचा (`साहेब' हा शब्द फारसी. त्यामुळे साहेब ऐवजी `राव' हा शब्द सावरकरबंधूंनी रूढ केला. जसे बाबाराव, तात्याराव) ब्रिटीश शासनाशी पहिला संघर्ष १९०६ साली उडाला. नाशिकमध्ये जाहीर सभा घेण्यास असलेली बंदी मोडली, या गुन्ह्यासाठी त्यांना अटक करण्यात आली आणि १० रुपये दंड करण्यात आला. बाबारावांनी याविरुद्ध वरिष्ठ न्यायालयाकडे दाद मागितली आणि त्यांचा दंड रद्द झाला. २७ सप्टेंबर १९०६ रोजी दसर्‍यानिमित्त नाशिक येथील कालिकेच्या मंदिराकडून सीमोल्लंघन करून परतणार्‍या तरुणांनी `वन्दे मातरम्'चा जयघोष केला. तो ऐकून एका पोलिसाने `बोंब मारणे बंद करा', असे म्हणत बाबांच्या अंगावर हात टाकला. मात्र त्या पोलिसावरच पश्चात्तापाची पाळी आली. बाबांसकट सर्वांनीच त्या पोलिसाला ठोकून काढले ! या प्रसंगाने संतप्‍त झालेल्या ब्रिटीश सरकारने ११ तरुणांवर अभियोग भरला. `वन्दे मातरम् अभियोग' या नावाने तो गाजला. यात बाबाराव मुख्य आरोपी होते. नाशिक जिल्ह्यात हा अभियोग निरनिराळया ठिकाणी सहा महिने चालला; कारण न्यायाधीश फिरतीवर असत आणि ते असतील तेथे हा अभियोग चालत असे. या अभियोगात बाबारावांना २० रुपये दंड होऊन मोठ्या रकमेचा प्रतिभू (जामीन) मागण्यात आला. अन्य तरुणांनाही अशाच प्रकारच्या शिक्षा झाल्या. बाबाराव नाशिकमध्ये असतांना त्यांनी राष्ट्रहिताच्या दृष्टीने मूलभूत स्वरूपाच्या अनेक चळवळी सुरू केल्या. स्वदेशी चळवळ, विलायती मालावर बहिष्कार, राष्ट्रीय शिक्षणाची सुरुवात इत्यादी चळवळींचे सूत्रसंचालन बाबाराव धुरिणत्वाने करत असत.

प्रकाशक बाबाराव !

याच सुमारास बाबारावांचे पाठचे बंधू स्वा. वि.दा. सावरकर लंडनमध्ये शिक्षण घेत होते. १९०६ साली स्वा. सावरकरांनी लिहिलेले प्रसिद्ध इटालियन क्रांतीकारक जोसेफ मॅझिनी यांच्या चरित्राचे हस्तलिखित बाबारावांकडे आले. ब्रिटिशांच्या दृष्टीने हे चरित्र अत्यंत स्फोटक होते. जून १९०७ मध्ये बाबारावांनी हे पुस्तक प्रसिद्ध केले. दोन महिन्यांतच २ सहदा प्रतींची पहिली आवृत्ती जवळ जवळ संपली. पुस्तकाच्या विषयाबरोबर बाबांचे परिश्रमही याला कारणीभूत होते. या पुस्तकाला स्वा. सावरकरांनी लिहिलेली २६ पृष्ठांची प्रस्तावना त्या वेळी अनेकांनी मुखोद्‌गत केली. यातील ज्वलंत विचारांनी प्रभावित होऊन अनंत कान्हेरे यांनी नाशिकचा जिल्हाधिकारी जॅक्सन याचा वध केला. लवकरच स्वा. सावरकरांनी लिहिलेल्या आणि हॉलंडमध्ये मुद्रित केलेल्या `१८५७ चे स्वातंत्र्यसमर' या ग्रंथाच्या प्रती बाबारावांच्या हाती आल्या. बाबारावांनी या प्रतीही अत्यंत गुप्‍तपणे क्रांतीकारकांपर्यंत पोहोचवल्या. या अद्वितीय ग्रंथामुळे ब्रिटिशांविरुद्ध बंगाल, पंजाब आणि महाराष्ट्रात `गदर' पक्षाची स्थापना होऊ शकली ! `अभिनव भारत' संघटनेतील युवकांना आपण कोणत्या आगीशी खेळत आहोत, तसेच आपल्या कृत्यांना भारतीय दंडविधानात (इंडियन पिनल कोड) कोणत्या शिक्षा सांगितल्या आहेत, हे कळावे म्हणून भारतीय दंडविधानाची एक छोटी आवृत्तीही बाबारावांनी छापून घेतली होती. भावनेच्या आहारी जाऊन नव्हे, तर समजून उमजून तरुणांनी क्रांतीकार्याला हात घालावा, हा उद्देश यामागे होता ! लंडनहून स्वा. सावरकरांनी हातबाँब तयार करण्याचे तंत्र शिकवणारे कागदपत्र सेनापती बापट यांच्यामार्फत बाबारावांकडे पाठवले. बाबारावांनी हातबाँब तयार करण्याची ही कृती क्रांतीकारकांपर्यंत पोचवली. या कृतीवरूनच खुदिराम बोस यांनी न्यायाधीश किंग्जफोर्ड याच्या गाडीवर हिंदुस्थानात सिद्ध झालेला पहिला बाँब टाकला !

१ महिना सश्रम कारावास !

या सर्व व्यापांमुळे बाबारावांना अटक करण्याची संधी ब्रिटीश शासन शोधू लागले. ११ जून १९०८ रोजी शिवरामपंत परांजपे यांना पुण्यात अटक करण्यात आली आणि दुसर्‍याच दिवशी मुंबईला आणून त्यांच्यावर अभियोग सुरू करण्यात आला. स्वराज्य चळवळीसंबंधी परांजपे यांच्या ओघवत्या आणि परिणामकारक वक्‍तृत्वाने अनेक तरुण भारले होते. त्यामुळे परांजपे यांच्या अटकेने बाबारावांसहित अनेक तरुण प्रक्षुब्ध झाले. त्यांना काही मदत करावी या हेतूने बाबारावही मुंबईत आले. तेथील न्यायालयासमोर एका खोजा जमातीच्या व्यापार्‍याला पोलीस अधिकारी खूप त्रास देत असलेला बाबारावांनी पाहिला. बाबारावांचे तरुण रक्‍त उसळून आले. त्या व्यापार्‍यास पाठीशी घालून बाबारावांनी त्या पोलीस अधिकार्‍याशी वितंडवाद घालावयास सुरुवात केली. त्यामुळे चिडून पोलिसांनी बाबारावांनाच अटक केली. हे काय प्रकरण चालले आहे हे पाहण्यासाठी वरिष्ठ पोलीस अधिकारी गायडर बाबारावांकडे आला आणि त्याने त्यांचे नाव विचारले. `बाबा सावरकर' हे नाव ऐकताच गायडरला अत्यानंद झाला. त्याने ताबडतोब बाबारावांची झडती घेतली तेव्हा त्यांच्याजवळ रशियन क्रांतीसंबंधीचे एक पत्रक सापडले. त्या पत्रकाच्या आधारे बाबारावांना एक महिन्याची सश्रम कारावासाची शिक्षा झाली. ती त्यांनी ठाणे आणि नाशिक येथील कारागृहांत आनंदाने भोगली.

जन्मठेपेची शिक्षा !

क्रांतीकारकांच्या अनेक गुप्‍त उद्योगांत बाबाराव सावरकरांचा हात आहे आणि त्यांना त्यांचे मार्गदर्शनही लाभले आहे, हे ब्रिटीश गुप्‍तहेर खात्याने ओळखले होते. १९०९ मध्ये बाबारावांनी कवी गोविंद रचित चार क्रांतीकारी कविता प्रसिद्ध केल्या. त्यांपैकी `रणावीण स्वातंत्र्य कोणा मिळाले ?' या कवितेत प्रतिपादले होते की, गुलामगिरीत खितपत पडलेल्या जगातील कोणत्याही देशाला सशस्त्र क्रांतीशिवाय स्वातंत्र्य मिळाले नाही. मग त्याला हिंदुस्थानच कसा अपवाद असेल ? या कविता प्रसिद्ध केल्या म्हणून सरकारने बाबारावांना अटक करून जन्मठेपेची अतिशय कठोर शिक्षा दिली. ८ जून १९०९ रोजी बाबारावांना शिक्षा होऊन अंदमानात नेण्यात आले. त्या वेळी ते जेमतेम ३० वर्षांचे होते !

अंदमान

अंदमानातील `सेल्युलर जेल'मध्ये असतांना बाबारावांच्या शारीरिक यातनांना पारावार राहिला नाही. धोकादायक क्रांतीकारक म्हणून तेथील तुरुंगाधिकार्‍याने बाबारावांकडून अतिशय कष्टाची कामे करवून घेतली. तरीही बाबारावांच्या मनातील क्रांतीची भावना यत्किंचितही कमी न होता ती अधिकच धारदार झाली. संघटनचातुर्य आणि अन्यायाचा प्रतिकार हे त्यांच्या रोमरोमांत भिनले असल्यामुळे त्यांनी अंदमानातच कारावास भोगत असलेल्या स्वा. सावरकरांच्या साहाय्याने तेथील राजकीय कैद्यांना संघटित केले. चांगली वागणूक आणि अन्न मिळावे म्हणून उपोषण, असहकार, संप आदी मार्गांनी लढा दिला. परिणामी त्यांना अधिकाधिक कठोर शारीरिक शिक्षा भोगाव्या लागल्या; परंतु त्याची तमा न बाळगता बाबारावांनी आपले कार्य अविरत चालू ठेवले. अंदमानातील ११ वर्षांच्या प्रदीर्घ कालावधीत त्यांची प्रकृती पार ढासळली आणि त्यांना क्षयाचा विकार जडला. ते अंदमानात असतांनाच त्यांची पत्‍नी सौ. येसूवहिनींनी या जगाचा निरोप घेतला. त्या दोघांची शेवटची भेटही मुजोर शासनाने होऊ दिली नाही. १९२१ मध्ये बाबारावांना हिंदुस्थानात परत आणण्यात आले आणि साबरमतीच्या कारागृहात ठेवण्यात आले. त्या वेळी त्यांची प्रकृती खूपच खालावली होती. बाबाराव आता काही तासांचेच सोबती आहेत, असे शासनाच्या डॉक्टरने सांगितले तेव्हाच म्हणजे सप्टेंबर १९२२ मध्ये सरकारने त्यांची सुटका केली !

बाबारावांची ग्रंथसंपदा

बाबारावांनी अनेक पुस्तके लिहिली. `वीर बैरागी' या भाई परमानंदलिखित पुस्तकाचे त्यांनी भाषांतर केले. या पुस्तकात बंदा वीराचे चरित्र सांगून हिंदूंना स्फूर्ती द्यावी, सूड कसा उगवावा ते शिकवावे तसेच पंजाबातील शीख आणि मराठे यांचा दुवा जोडावा, हा बाबारावांचा उद्देश होता. या पुस्तकात औरंगजेबाच्या मुसलमानी सत्तेशी वीर बंदा बैराग्याने केलेल्या संघर्षाची कहाणी आहे. `राष्ट्रमीमांसा' या पुस्तकात त्यांनी `भारत हे हिंदुराष्ट्र आहे' हे सिद्ध केले आहे. `श्री शिवरायांची आग्र्‍यावरील गरुडझेप' या पुस्तकात आग्र्‍याला जाण्यात शिवरायांचा हेतू औरंगजेबाचा वध करण्याचा होता, असे प्रतिपादन त्यांनी केले आहे. `वीरा-रत्‍नमंजुषा' या पुस्तकात महाराणी पुष्पवती, राजा दाहिरच्या दोन वीरकन्या, राणी पद्मिनी, पन्नादायी आदी रजपूत स्त्रियांची चरित्रे वर्णिलेली आहेत. `हिंदुराष्ट्र - पूर्वी, आता नि पुढे', `धर्म हवा कशाला ?', `ख्रिस्तास परिचय अर्थात् ख्रिस्ताचे हिंदुत्व' ही त्यांची अन्य पुस्तके आहेत.

बाबाराव आणि रा. स्व. संघ

संघाचा भगवा ध्वज डॉ. हेडगेवार यांनी बाबारावांकडून करवून घेतला. संघाची प्रतिज्ञाही बाबांनीच सिद्ध केली. त्यात थोडेफार शाब्दिक फेरफार करून डॉ. हेडगेवार यांनी ती स्वीकृत केली. बाबारावांनी स्थापन करून वाढवलेली `तरुण हिंदु महासभा' ही संघटना १९३१ मध्ये त्यांनीच संघात विलीन केली. संघाच्या सेनेत शिलेदारांची, म्होरक्यांची भरती करत असतांना बाबांनी संघाला अखिल भारतीय पाठिंबा मिळावा म्हणून अविश्रांत परिश्रम केले.

अखेरपर्यंत हिंदुराष्ट्राची चिंता

बाबारावांनी अखेरपर्यंत हिंदुराष्ट्राचीच चिंता वाहिली. बाबारावांच्या शेवटच्या दिवसांत चित्रमहर्षी भालजी पेंढारकर त्यांना भेटायला गेले असता त्यांनी भालजींना विचारले, ``माझ्या या हिंदुराष्ट्राचे कधीतरी पुनरुत्थान होईल काय ?'' भालजींनी उत्तर दिले, ``बाबा, हा महाराष्ट्र व हिंदु धर्म पुरातन, सनातन आहे. यानंतर खूप धर्म, राष्ट्रे जन्माला आली नि गेली. त्यामुळे या हिंदुराष्ट्राचे पुनरुत्थान नक्की होईल, यात मला शंका नाही !''

आयुष्यभर देशहितासाठी प्राणपणाने झटणारा हा वीरात्मा १६ मार्च १९४५ रोजी सांगली येथे कालवश झाला. बाबारावांचे चरित्र म्हणजे राष्ट्रासाठी चंदनाप्रमाणे अखंड झिजलेल्या एका थोर देशभक्‍ताची स्फूर्तीदायी कथा आहे !

देशभक्‍त डॉ. नारायण दामोदर सावरकर !

विद्यार्थीदशेपासूनच क्रांतीचे विचार !

देशभक्‍त नारायणरावांचा जन्म २५ मे १८८८ रोजी झाला. सावरकरांचे घराणे मुळात श्रीमान; परंतु एकावर एक आकस्मिकपणे कोसळत गेलेली संकट परंपरा आणि आपत्ती यांच्यामुळे नारायणरावांचे बालपण कष्टमय परिस्थितीत गेले. आई-वडिलांचे छत्र दैवाने लवकर हिरावून घेतल्यामुळे त्यांचे लालनपालन मोठे बंधू गणेशपंत तथा बाबाराव आणि त्यांची पत्‍नी सौ. येसूवहिनी यांनी केले. विख्यात लेखक आणि चरित्रकार द.न. गोखले `क्रांतीवीर बाबाराव सावरकर' या चरित्रग्रंथात म्हणतात, `नारायणराव अर्भक असतांना मातेच्या ममतेने आणि पित्याच्या प्रेमळपणाने बाबांनी त्यांचे संगोपन केले. आपल्या तात्याप्रमाणे आपला बाळही देशभक्‍त व्हावा, म्हणून ते नारायणरावांचे शिक्षण मोठ्या आशेने करत. त्यांची ती आशा नारायणरावांनी इंग्रजी तिसरीत गेल्यापासूनच पुरी करण्यास प्रारंभ केला. बाबा-तात्यांपासून त्यांनी जी स्फूर्ती घेतली तिच्या बळावर त्यांनी `मित्रसमाज' या विद्यार्थी संघटनेचा व्याप उभा केला आणि तो समर्थपणे सांभाळून क्रांतीकक्षेत कितीतरी तरुण आणून सोडले. आपल्या स्फूर्तीप्रद वक्‍तृत्वावर ते विद्यार्थीदशेपासून तरुणांना मोहवत आणि थोरांकडून वाहवा मिळवत. मॅट्रिकनंतर १९०८ मध्ये ते उच्च शिक्षणासाठी बडोद्याला गेले आणि तेथे त्यांनी `अभिनव भारता'ची शाखा स्थापली. या शाखेत अजमासे दोनशे तरुण प्रतिज्ञित झाले होते. बडोद्याचे संघटनकार्य `मित्रसमाजा'प्रमाणेच नारायणरावांनी नावारूपाला आणले. त्याच वेळी अभ्यास सांभाळून माणिकरावांच्या व्यायामशाळेत कुस्ती, मल्लखांब, लाठी इत्यादींचे त्यांनी उत्तम शिक्षण घेतले. नारायणराव सुटीत नाशिकमध्ये आले की, तेथल्या मुलांशी या विद्येची देव-घेव चाले. नाशिकमधल्या उद्योगात सैनिक संचलन, नेमबाजी नि भिंतीवर चढण्याची कला यांचाही समावेश होता. हा `मित्रसमाज' म्हणजेच अन्यत्र उल्लेखलेला `मित्रमेळा'. मित्रमेळयाच्या साप्‍ताहिक सभा होत नि त्यात देशाविषयी वेगवेगळया पुस्तकांद्वारे चर्चा चाले. स्फूर्तीप्रद विचार मांडले जात.

सहा महिन्यांची शिक्षा !

१८९९ ते १९०८-९ पर्यंत नाशिकमध्ये क्रांतीकार्य जोरात चालू होते. या क्रांतीकार्याच्या परिणामी वयाच्या केवळ अठराव्या वर्षीच इतिहासप्रसिद्ध `नाशिक कट' अभियोगात नारायणरावांना सहा महिन्यांची शिक्षा झाली. (बाबारावांना जन्मठेपेची शिक्षा झाली २१ नोव्हेंबर १९०९ या दिवशी. त्याआधीच कर्णावतीला झालेल्या ध्वमस्फोटांच्या संबंधात नारायणरावही पकडले गेले. लंडनमध्ये असलेल्या विनायकरावांवर ब्रिटीश शासनाची वक्रदृष्टी होतीच.) आरक्षींनी (पोलिसांनी) केलेली मारहाण सहन करून, शेवटी पुराव्याअभावी ते त्यातून निर्दोष बाहेर पडले. १८ डिसेंबर १९०९ ला ते घरी येऊन टेकतात, तोच २१ डिसेंबरला नाशिकलाच अनंत कान्हेरे यांनी जॅक्सनचा वध केला. त्याच रात्री नारायणराव पकडले गेले नि पुन्हा छळयातनांच्या चक्रात सापडले.
२१ जून १९११ ला सुटल्यानंतर त्यांना कोठल्याही महाविद्यालयात प्रवेश मिळेना. शेवटी कोलकात्याच्या `नॅशनल मेडिकल महाविद्यालयात' प्रवेश मिळाला. आर्थिक चणचण, शासकीय गुप्‍त आरक्षींचा ससेमिरा, पुन:पुन्हा होणार्‍या चौकशा यांना तोंड देत, १९१६ मध्ये नारायणराव `अँलोपथी' आणि `होमिओपथी' या दोन्हींचे पदवीधर झाले. `दंतचिकित्सा' या विषयातही त्यांनी पदवी घेतली. त्या दिवसांत शिक्षणव्यय भागवण्यासाठी त्यांनी अधूनमधून व्यापारी पेढ्यांवर कारकुनाचे कामही केले. विद्यार्थीदशेत त्यांना मॅडम कामा यांनी फ्रान्समधून पाठवलेल्या अर्थसाहाय्याचे मोलच करता येणार नाही !
कोलकात्यामधील त्या दिवसांतच नारायणराव आणि डॉ. हेडगेवार यांची मैत्री झाली. त्या दिवसांतली एक गोष्ट सांगण्याजोगी आहे.
तिघाचौघा मित्रांचा एक गट झाला होता. आर्थिक अडचण तर नेहमीचीच. खानावळीतून दोन व्यक्‍तींचा डबा मागवायचा आणि तो चौघांनी वाटून खायचा, असे चाले. अर्थातच तो अपुरा पडे. `तुम्ही पाठवता तो डबा पुरत नाही' असे खानावळवाल्याजवळ एकदा गार्‍हाणे केल्यावर थोडी वादावादी झाली; पण तो म्हणाला, " तुमच्यापैकी एकाने एक दिवस इथे येऊन जेवावे. तो जेवढे खाईल तेवढे मी पाठवीन."
वसतीगृहावर आल्यावर विचारविनिमय झाला आणि डॉ. हेडगेवारांनी जेवण्यास जावे असे ठरले. हेडगेवार जेवायला गेले आणि त्यांनी बावीस-चोवीस पोळया खाल्ल्या ! खाणावळवाला पहात होता. त्याची दानत अशी की, त्याने शब्द पाळला. तो प्रतिदिन तेवढ्या पोळया पाठवू लागला आणि चौघांचे बर्‍यापैकी भागू लागले !
या प्रसंगाविषयी विख्यात लेखक पु.भा. भावे एका लेखात म्हणतात, " खादाडपणाची ही कहाणी हिंदुत्वाला अमृतवाणी ठरली. कारण त्या काळात खाल्लेला प्रत्येक घास हिंदुजातीचे आयुष्य वर्षावर्षाने तेज:पुंज व पराक्रमी करता झाला. पुढे १९४० सालापर्यंत ठिकठिकाणी घडणार्‍या मुसलमानी अत्याचारांना ठायीठायी हाणण्यात आले ते याच सावरकर-हेडगेवार मैत्रीमुळे !"

चार पदरी संसार !

वैद्यकीय पदवीग्रहणानंतर १९१६ मध्ये मुंबईतच वैद्यकीय व्यवसाय करण्याचे ठरवून डॉ. नारायणरावांनी औषधालय थाटले. या औषधालयाचे उद्घाटन करण्याची त्यांनी साहित्यसम्राट न.चिं. केळकर यांना विनंती केली. त्यांनीही ती आनंदाने स्वीकारली, कारण त्यांनाही डॉ. नारायणरावांच्या देशभक्‍तीचे कौतुक होते. यापूर्वी म्हणजे १९१५ साली सौ. येसूवहिनींच्या आग्रहामुळे त्यांनी विवाह केला होता. त्यामुळे मुंबईत औषधालयाबरोबरच घर घेऊन त्यांनी संसारही थाटला.
एकीकडे व्यवसाय, दुसरीकडे प्रपंच, तिसरीकडे गुप्‍तपणे क्रांतीकार्य व क्रांतीकारकांना साहाय्य आणि प्रत्यक्षपणे करता येईल तितके समाजकार्य अशी चौपदरी जीवनक्रमाची त्यांची घोडदौड चालू झाली.

लोकमान्य टिळकांचे अनुयायित्व !

लो. टिळकांच्या मुंबईतील सार्‍या कार्यक्रमांना यशस्वी करण्यासाठी झटणार्‍या अनुयायांत डॉ. नारायणराव पुढे असत. लो. टिळकांच्या दौर्‍यात ते अनेकदा त्यांच्याबरोबर असत. काँग्रेस पक्षाच्या अधिवेशनांना ते नियमितपणे उपस्थित रहात. मुंबईतील सार्वजनिक कामांतील त्यांच्या नावलौकिकामुळे ते काही काळ मुंबई नगरपालिकेचे निर्वाचित सदस्य होते. प्रारंभीच्या काळात अन्य अनेक नेत्यांप्रमाणेच त्यांनी काँग्रेस पक्षाच्या माध्यमातून ब्रिटीशविरोधी सत्याग्रहात आणि विधायक कार्यक्रमांत भाग घेतला व शिक्षा भोगल्या. १९२५ नंतर रा.स्व. संघाच्या प्रसारात मन:पूर्वक साहाय्य केले आणि त्यानंतर १९३७ पासून हिंदुमहासभेच्या माध्यमातून त्यांनी कार्य केले. या सर्व काळात अखेरपर्यंत हिंदुस्थानच्या हितार्थ स्वातंत्र्यप्राप्‍तीसाठी आणि हिंदुहितासाठी कार्य हे सूत्र मात्र कधीही सुटले नाही. क्रांतीकार्याला त्यांचे गुप्‍तपणे साहाय्य असेच. स्वत:चे शिक्षण पूर्ण करून व्यवसाय आणि प्रपंच करतांनाच, प्रभावी वक्‍तृत्व, लेखन आणि विधायक सामाजिक कार्य यांद्वारे दोघा वडील बंधूंच्या कार्यास पूरक कार्य ते करत राहिले.

लेखनकार्य आणि समाजकार्य !

अब्दुल रशीदने स्वामी श्रद्धानंदांचा खून केल्यानंतर त्यांच्या स्मरणार्थ डॉ. ना.दा. सावरकरांनी `श्रद्धानंद' नावाचे साप्‍ताहिक चालू केले. `या साप्‍ताहिकातील लिखाणाचा व बुद्धीवादाचा माझ्यावर खोल ठसा उमटला', असे पु.भा. भावे यांनी म्हटले आहे. १० जानेवारी १९२७ ते १० मे १९३० पर्यंत ते `श्रद्धानंद'चे संपादक- संचालक होते.
लोकमान्यांच्या निधनानंतर गिरगांव चौपाटीवरील त्यांच्या दहनस्थानी कुठल्याही प्रकारे स्मारक उभारण्यास ब्रिटीश शासन अनुमती देत नव्हते. परंतु अनेक `टिळक भक्‍तांनी' त्या जागेचे पावित्र्य जपले. त्या जागेचा सांभाळ केला. पुढे १९३० मध्ये स्मारक उभे राहिले. त्या सर्व कामांत डॉ. नारायणरावांचा सहभाग होता. चौपाटीवर हिंदु धर्माची निंदा करून ख्रिस्ती धर्मप्रसार करणार्‍या एका मिशनर्‍याला डॉ. नारायणराव, डॉ. वेलकर आणि सुरतकर या तिघांनी असा धडा शिकवला की, त्याने पुन्हा तिथे पाय ठेवला नाही !
मुंबईत जागोजाग असणार्‍या पठाणांच्या जागी रक्षक म्हणून गुरखे आणणे हे डॉ. नारायणरावांनी केलेले आणखी एक कार्य. श्रद्धानंद महिलाश्रमाच्या प्रमुख संस्थापकांपैकीही ते एक होते. या आश्रम उभारणीसाठी आणि नंतर त्याच्या प्रत्यक्ष कार्यातही त्यांनी मन:पूर्वक कष्ट घेतले. गोव्यातील गावडे लोकांच्या शुद्धीकरणाची जी प्रचंड चळवळ विनायक महाराज मसूरकर यांनी सुरू केली, त्या कार्याला डॉ. नारायणरावांचे सर्व प्रकारे साहाय्य होते. १९२५, १९३७, १९३९ या वर्षी मुंबईत झालेल्या हिंदु-मुस्लिम दंग्यांत प्रत्याघात करणार्‍या हिंदूंच्या सुरक्षिततेची काळजी त्यांनी वाहिली !

विशेष साहित्यसेवा !

३० एप्रिल १९३० ला नारायणरावांना झालेल्या कारावासामुळे `श्रद्धानंद' साप्‍ताहिक बंद पडले. राजकीय कार्याच्या धकाधकीतही त्यांनी साहित्यसेवा केली. `वसंत' या टोपणनावाने लिहिलेले काव्य, १८५७ च्या समराच्या पार्श्‍वभूमीवर लिहिलेली `मरण कि लग्न' ही कादंबरी, `जातिहृदय' या नावाखाली लिहिलेली `समाजरहस्य' ही कादंबरी, `जाईचा मंडप' कादंबरी; सेनापती टोपे यांचे चरित्र, `हिंदूंचा विश्‍वविजयी इतिहास' इत्यादी त्यांचे साहित्य गाजले. स्वा. सावरकरांच्या `हिंदुत्व' आणि `हिंदुपदपादशाही' या महत्त्वाच्या इंग्रजी ग्रंथांचे मराठी अनुवादही त्यांनी केले.
३० जानेवारी १९४८ ला गांधीवध झाल्यानंतर दुसर्‍या दिवशी त्यांच्या रहात्या घरावर गुंडांनी दगडफेक आणि हल्ला करून आजारी असलेल्या डॉ. नारायणरावांना भयंकर जखमी केले. ते बेशुद्ध झाले. तितक्यात आरक्षी पोहोचल्याने त्यांचे प्राण वाचले; परंतु त्यांना के.ई.एम्. रुग्णालयात भरती करावे लागले. त्यांना अटक करण्याची शासकीय आज्ञा असल्याने तेथे त्यांच्यावर पोलीस पहारा होता. यातून डॉ. नारायणराव वाचले खरे, पण यामुळे खालावलेली त्यांची प्रकृती पूर्वपदावर आलीच नाही. ऑक्टोबर १९४९ च्या पहिल्या आठवड्यात पुणे येथील `दै. प्रभात'साठी `हिंदूंचा विश्‍वविजयी इतिहास' या लोकप्रिय झालेल्या लेखमालेतील लेख लिहित असतांनाच डॉ. नारायणरावांना अर्धांगवायूचा झटका आला व ते बेशुद्ध पडले. १९ ऑक्टोबर १९४९ ला त्यातच त्यांचे दु:खद निधन झाले.
आपल्या दोन्ही बंधूंप्रमाणेच देशसेवेत अग्रेसर राहून डॉ. नारायणराव सावरकर यांनीही `सावरकर' कुलाचे नाव उज्ज्वल केले !

मी नथुराम गोडसे बोलतोय.........

मी नथुराम गोडसे बोलतोय. हे नाटक मी एके दिवशी पाहिलं आणि मला शिकवला गेलेला इतिहास आणि स्वतःहुन माहिती करुन घेतलेला यामध्ये प्रचंड तफावत आढळली. आपल्याला शिकवलेला इतिहास हा नेहमीच कॉंग्रेस प्रणित असतो हेच माझ्या लक्षात आले. गांधी हत्येबद्दल कॉग्रेस प्रणित इतिहास एका नथुराम गोडसे नावाच्या हिंदु माथेफिरुने केलेली हत्या असेच वर्णन ऐकले होते. पण गोळी झाडाणारा नथुराम कोण होता? गांधी हत्येमागे नेमके कारण कोणते होते? गांधींच्या अहिंसावादी तत्वाला काही आधार होता की नाही? अखंड भारताच्या फाळणीला जीनांबरोबर गांधीही तितकेच जबाबदार होते का? गांधींच्या म्हणण्यानुसार मंत्रिमंडळाने पाकिस्तानला ५५ कोटी रूपये मदत म्हणुन का दिली. ( त्या रुपयांचावापर पाकिस्तानने काश्मीरमध्ये लढणार्‍या आपल्याच देशातील सैनिकांविरूद्ध वापरला. ) या सर्व आणि अशी अनेक प्रश्न निरुत्तरीत राहिली. मी आपल्यासमोर "मी नथुराम गोडसे बोलतोय" या नाटकाचा सारांश नथुराम गोडसे यांच्याच शब्दात मांडण्याचा एक क्षीण प्रयत्न करीत आहे.

नथुराम गोडसे उवाच्

सगळे चेहरे अनोळखी. खरं म्हणजे अनोळखी हा शब्दच चुकीचा आहे, अनोळखी हा शब्द अभावाने का होईना पण ओळखीचा उच्चार, तुम्हा सगळ्यांचेच चेहरे मला नवीन पण नवीन आहेत म्हणजे परके नव्हेत तुमच्यापैकी तरुण असतील तेव्हा त्यांचा जन्मही झाला नसेल. शासकीय इतिहासात केवळ एक हिंदु माथेफिरु म्हणुन तुम्ही माझी नोंद पाहिली असेल. तुमच्या मध्ये मध्यमवयीन असतील त्यापैकी काही त्यावेळी चाललेल्या ब्राह्मणाच्या कत्तलीपासुन ते जीव वाचवु पहाणार्‍या आपल्या आई - वडिलांना कोण हा नथुराम त्याच्यामुळे आमची घर का जळता आहेत अशा विचार करत असतील. हं ! पण अगदी म्हातारे म्हणजे जुनीखोडं असतील त्यांना मात्र मी आठवत असेन; वृत्तपत्रातुन वाचलेला, आकाशवाणीवरुन ऐकलेला मी ! त्यापैकी काहींनी माझं आणि नाना आपटेंच अग्रणी हे वृत्तपत्र वाचलं असेल. सभांमधील माझी भाषण ऐकली असतील, कदाचित प्रत्यक्षात येऊन भेटलेही असतील. पण ती भेट आणि ही ओळख ३० जानेवारी १९४८ नंतर मात्र त्यांनी सतत नाकाराली असेल. हो पण इतक्या म्हातार्‍या माणसांना कोण घेऊन येणार? माझं वय काय आहे ठाऊक आहे का तुम्हाला? ९३ वर्षे ! पटत नाही ना. तुम्ही म्हणाल खोट बोलतोय, तरुण तर दिसतोस. पण माझ्या चिरतारुण्याचे रहस्य आहे, माझा मृत्यु! अवेळी झालेला. मृत्यु हे चिरतारुण्याचं वरदान आहे असं नाही वाटत तुम्हाला? नाही पटत! आपल्या जवळच्या एखाद्या मृत व्यक्तीची प्रतिमा आणा डोळ्यासमोर २० - २५ वर्षापुर्वी मृत झालेल्या एखाद्या व्यक्तीची प्रतिमा ! तिच्या चेहर्‍यावर सुरकुत्या दिसतायत तुम्हाला? दात अजुनही शाबुत असतील केस काळेभोर असतील, असो. तर तो तरुण आहे कारण तो मृत आहे. वृद्धत्वाचा शाप जिवंत शरीराला असतो. मला चिरतारुण्याचा आशिर्वाद तात्याराव सावरकरांनी दिला आहे. तात्याराव सावरकर; सुर्याची उबदार प्रखरता, वार्‍याचा वेग, खडकाने हेवा करावा अशी कठोरता आणि प्रत्यक्ष बृह्स्पतीने शिष्यत्व पत्करावं इतकी बुद्धीची प्रगल्बता या सर्वांनी धारण केलेला मानवीय अवतार म्हणजे तात्याराव सावरकर. मला अजुनही आठवतो तो दिवस अटकेत होतो मी, माझी चौकशी चालु होती आणि बादरायण संबंध नसताना केवळ छळ करण्याच्या उद्देशाने त्या भिष्माचार्याला अटक करुन दिल्लीला आणलं. तात्यारावांना पाहताच क्षणी मी उठलो त्यांना नमस्कार केला. तात्याराव म्हणाले ' चिरंजीव हो'. मी म्हटलं तात्याराव माफ करा पण तुमच्या या आज्ञेच पालन माझ्याकडुन होईल अस मला नाही वाटत. तात्याराव म्हणाले वेडा आहेस नथुराम मी शतःयुषी हो असे नाही म्हटले, मी चिरंजीव हो असं म्हटलं आणि तु चिरंजीव झाला आहेस नथुराम ज्याक्षणी तु पिस्तुलाचा चाप दाबलास आणि गांधी मृत झाले त्याचक्षणी नथुराम गोडसे हे नाव चिरंजीव झालं आहे. गांधीवाद तु संपवलास की नाही हा कदाचित वादाचा मुद्दा ठरेल पण तु गांधी संपवलेस आणि स्वतः उरलास. गांधींचे विरोधक सच्चे हिंदु राष्ट्र्वादी तर तुला आपल्या हृदयसिंहासनात अढळपद बहाल करतीलच पण गांधींचे समर्थक ही त्यांच्या चरित्रात तुला अमररुप देतील.गांधीच्या माता- पित्यांच्या उल्लेखाशिवाय शिवाय जसा त्याच्या कुठल्याच चरित्राचा प्रारंभ होऊ शकत नाही तसेच तुझ्या उल्लेखाशिवाय त्यांच कुठलच चरित्र पुर्ण होऊ शकत नाही. तात्यारावांचे शब्द ते शिलालेखच जणु, तात्यारावांनी उच्चारलेला प्रत्येक शब्द म्हणजे भेद आणि लिहिलेला प्रत्येक शब्द म्हणजे वेद, मग तो खोटा कसा ठरणार? तर असा मी ९३ वर्षांचा बुड्ढाचारी ३९ व्या वर्षी सुळावर चढलेला, अवेळी मृत्यु. अवेळी होता पण आमंत्रित होता स्वीकृत होता , पण चिरतरुण! त्या अश्वथाम्यासारखा, त्या अश्वथाम्याच्या डोक्यावर खोल जखम झाली आहे म्हणुन तो तेल मागत फिरतो आहे. माझ्या हृदयात मस्तीक्षात खोल जखम झाली आहे किती वार झाले आहेत त्या जखमेवर देशाचे काष्ठानी केलेले तुकडे निर्वासितांमधील माता - भगिनींवर झालेले बलात्कार, पाकिस्तानला गांधींच्या बालहट्टापायी बहाल केलेले ५५ कोटी रुपयाचं अनुदान आणि अखंड हिंदुस्तानातुन अलग करुन पाकिस्तानला बहाल केलेली माझी सिंधु नदी. त्या अश्वथाम्याला अजुनही तेल हव आहे. पण मला मात्र स्पर्श हवा आहे तो त्या पवित्र पाण्याचा, त्या स्पर्शाची वाट माझ्या अस्थी पहात आहेत, गेली ६० वर्षे. माझ्या मृत्युपत्रात लिहुन ठेवले आहे माझ्या अस्थी पिढ्यान् पिढ्या हस्तांतरीत कराव्यात परंतु अखंड सिंधु अखंड हिंदुस्तानात येईपर्यंत त्या विसर्जित करु नयेत. माझं मृत्युपत्र वाचल्यानंतर तात्याराव म्हणाले, ' वाह नथुराम, आधुनिक भारतातील दधीची आहेस तु. तुझ्या या अस्थींनी शस्त्र होतील.' मी म्हटलं तात्याराव कशाला इतक्या मोठ्या माणसाची उपमा देता. भवानी तलवार लोखंडाची असली हे जरी सत्य असलं तरी लोखंडाचा प्रत्येक तुकडा भवानी तलवार नाही होऊ शकत. पण निरुत्तर होतील तर ते तात्याराव कसले त्यांच्या समोर प्रश्न नव्हतेच त्यांच्या समोर फक्त उत्तर होती. तात्याराव म्हणाले, ' नथुराम महाराजांनी स्पर्श केला म्हणुन तलवारीची भवानी झाली तलवारीच्या पात्यापेक्षा मुठ जास्त महत्वाची, मुठी मागच्या पकडीमागे जिद्द असेल तरच तलवारीला धार येते. तु मागे अस्थी ठेवत नाही आहेस वृत्ती ठेवतो आहेस विचार ठेवतो आहेस त्यांची शस्त्र होतील.'
माझ्या आयुष्याचे जे सोनं झालं त्यात माझा वैयक्तिक सहभाग इतकाच की मी लोखंडासारखा तात्याराजवळ गेलो आणि त्याच्या स्पर्शाने माझं सोनं झालं. माझ्या आयुष्यातल्या चुकांची दुर्गुणांची जबाबदारी माझी. जे हातुन चांगलं घडल त्याचं श्रेय मात्र तात्यारावांच. वाईटाचे उत्तरदाइत्व त्यांच्याकडे नाही. सुवर्णालंकार देवाच्या मुर्तीला आभुषित करण्याऐवजी तस्करांकडे गेले तर तो दोष परिसाचा नव्हे. नाही का?


तर असा मी ९३ वर्षांचा बुड्ढाचारी नथुराम विनायक गोडसे. गेल्या शतकाच्या पहिल्या दशकाच्या शेवटी शेवटी माझा जन्म झाला. १९ मे १९ १०. वडिल विनायकराव पोस्टात नोकरी करायचे, आईचं नाव लक्ष्मी. विष्णुचे अनेक अवतार तुम्ही पाहीले असतील. पण लक्ष्मीचा फक्त कष्ट आणि वनवास भोगण्यासाठी घेतलेला अवतार गोडस्यांच्या घराव्यतिरिक्त कोणीही कुठेही पाहीलेला किंवा ऐकीवात नसेल. दशरथासारखा पुत्रवियोग सहन करीत तिने प्राण सोडले. वेदना तीच, तळमळ तीच, पुत्रप्रेमही तेच. फक्त राम वनवासाला निघाला नव्हता. त्याने परलोकाच्या प्रवासाची तयारी केली होती. लक्ष्मण कारागृहात कुजत सडत पडला होता. उर्मिला जवळ होती पण या लक्ष्मणाने श्रावणबाळाला कधीच मारलं नव्हतं.असो, विनायकरावांना मासिक वेतन रू १५/-, रू १०/- मध्ये चरितार्थ चालवायचा आणि रू ५/- वडिलांना पाठवायचे. विनायक आणि लक्ष्मीला तीन मुले झाली एकही जगलं नाही नवस आयास झाले. मुलगा जगावा म्हणुन, मग मुलगा झाला तो नथुराम. जगला ! , त्यांच्या नशीबी पुत्र वियोग होता म्हणुनऽऽऽऽ, गांधी हत्या व्हायची होती म्हणुन. त्यानंतरच आयुष्य सुरळीत गेलं. लहानपणी कधीच चोरी केली नाही त्यामुळे वडिलांची माफी मागण्याचा कधी प्रश्नच आला नाही. ब्रह्मचर्य पालन करण्याची शपथ कधीच घेतली नाही ब्रह्मचर्य पालन करतच होतो. निर्वासितांमध्ये खुप फिरलो त्यांना अन्नवस्त्रांचीही मदत केली परंतु ते अर्धनग्न अवस्थेत आहेत म्हणुन मी अर्धनग्न अवस्थेत कधीच राहीलो नाही, सुत कातलं नाही, संडास साफ केले नाहीत आणि फासाच्या दोरावर चढेपर्यंत मौन कधीच पाळले नाही. तस गांधींच्या आणि माझ्यात साम्य किंवा कॉमन पॉईन्ट एकच मी त्यांचा वध केला आणि त्यांच्या वधामुळे माझा अंत झाला. पण फरक मात्र मोठा, ते त्यांच्या तत्वांसाठी जगायला तयार होते आणि मी माझ्या तत्वांसाठी मरायलाही तयार झालो.


अर्थात माझ्या या आयुष्यात तुम्हाला स्वारस्य असण्याच काहीच कारण नाही , नाही का? गड चढुण जाण्यापुर्वी ती हिरकणी कोण होती? विलायती कपड्यांनी भरलेला ट्रक छातीचा कोट कडुन अडवणारा बाबु गेनु जगला तो फक्त मृत्युचा क्षण. या अर्थाने नथुराम गोडसेच खरं चरित्र सुरु होतं ते ३० जानेवारी १९४८ पासुन गांधी वधानंतर खर तर नथुराम आयुष्य जगला ते फक्त ६५५ दिवस ३० जानेवारी १९४८ ते १५ नोव्हेंबर १९४९ आणि या चरित्राचा श्रीगणेशा झाला तो मंत्रिमंडळाने पाकिस्तानला ५५ कोटी रुपयांचा निर्णय घेतला त्या दिवशी. नाना आपटे तेव्हा मला विचारायला आले की आजचा अग्रलेख का बदलास? त्यावर मी म्हणालो आधी लिहीलेला अग्रलेख मला खोटा वाटायला लागला, नानाला तर विश्वासच बसला नाही की मी खोटा अग्रलेख का लिहीन ते? नानाला म्हणालो , ' नाना अग्रलेखाच नाव विचारलस नाही."क्रियेवीण वाचाळता व्यर्थ आहे." मी लिहलं आहे की उद्याच्या संक्रांतीला आपण दसरा साजरा करुया. शमीच्या वृक्षावरुन शस्त्र काढुन सिमोल्लंघन करुया.' त्यावर आपल्याला अटक होऊ शकते अशी शंका नानाने उपस्थित केली. मी त्याला म्हणालो, 'आपलं अग्रणी हे हिंदु मुखपत्र आहे. अजुन सरकार हिंदुनाच टिचभर महत्व द्यायला तयार नाही तर त्यांच्या मुखपत्राला काय देणार? आपल्या संयमाचा चुकीचा अर्थ लावला जातो. हिंदुंची होणारी कत्तल दुर्लक्षिली जाते आहे कारण आपण गप्प बसणार सहन करणार हे गृहितच धरल जातं. शेकस्पियरचे एक वाक्य आहे ना - घावांना जर जिव्हा असत्या तर त्यांनी वेदना बोलुन दाखवल्या असत्या - पण आपल्या घावांना जिव्हा नाहीत तर फक्त अश्रु आहेत. आपल्या क्रोधाला फक्त अंगार नाही तर क्षमाशिलता आहे, इतरांनी अत्याचार करायचे आणि आपण ते सहन करायचे यात काही विशेषच मानल जात नाही, तो सृष्टी नियमच मानला जातो. सरकार माझ्या विधानांची गंभीर दखल घेईल पण ती गांधी हत्येच्या खटल्याच्या वेळीच. गांधींना थोपवण्याचा एकच मार्ग आहे तो म्हणजे त्यांचा वध करणे. पण नानाला मात्र हे पाऊल आततायी आणि अविचारी वाटत होतं. वध करणे एवढ अनिवार्य आहे का? असा त्याचा सवाल होता. मी त्याला म्हणालो, ' घे बंदुक आणि घाल गोळी इतकी कुठलीही हत्या सोपी नसते, अकस्मात नसते. खुन असेल कदाचित पण वध नाही. आणि गांधीवध तर नाहीच नाही. वधाला जर अधिक विलंब हानिकारक होईल असही मला वाटतं.' इतिहासाच्या एका खंडाला आपण धक्का लावतो की काय असे वाटत असावे कदाचित नानाला. पण खंड वगैरे अशा मोठ्या शब्दांबद्दल माझं दुमत असल तरी इतिहासाच्या पानाला मी नक्कीच धक्का लावत नव्हतो. पण जर पान हे आज उलटलं नाही तर देशाच्या इतिहासाची बाकी पान कोरीच राहतील. काळाची पान उलटता येतात, फाडुन फेकता येत नाही. गांधींचे देशाच्या इतिहासातील पान कोणीही नाकारु शकत नाही आणि नथुरामसुद्धा ते करु इच्छित नाही त्यांच पान तसचं राहणार पुन्हा कधीतरी झंझावाती वादळ येईल, पानांची उलथापालथ होईल आणि ते पान पुन्हा समोर उघड होऊन पडेल. गांधींच अहिंसेच तत्व मी नाकारत नाही आहे. जगाला हिंसेपेक्षा अहिंसाच जास्त आवश्यक आहे. पण गांधींची अहिंसा स्वसंरक्षण स्वहित नाकारते. स्वसंरक्षण म्हणजे हिंसा नव्हे. स्वतःच्या अस्तित्व रक्षणासाठी धडपडणे याची व्याख्या हिंसा असे करणारी अहिंसा म्हणजे एक प्रकारे स्वःहिंसा नव्हे का? नानाला वाटत होतं की माझा हा निर्णय धाडसाच आहे. पण धाडस तर करावचं लागणार आणि कुणीतरी करायला हवं म्हणुन सगळेच वाढ बघत बसले तर हे कदापि होणार नाही. अर्थात निदर्शन करुनही बघितली पण त्याचाही काहीच फायदा झाला नाही. देशाच्या विभाजनाच्या वेळीही आम्ही निदर्शनच करत होतो. देशाच्या विभाजनाचा निर्णय हा अनावश्यक होता. अरे मुसलमानांची लोकसंख्या आणि टक्केवारी ती किती? त्यांचा संपुर्ण देशासाठी असलेला अठ्ठ्हास अनाठायी होता. तो तसा नसता तर मौलाना आझाद हिंदुस्तानमध्ये राहिले नसते. पण जीनांच्या वेड्या हट्टाला मान्यता देऊन केवळ कोणाचं मन मोडायच नाही, हिंसा नको म्हणुन गांधींनी विभाजनाला मान्यता दिली. व्यक्ति देशापेक्षा कधीच मोठी नसते आणि गांधी ही व्यक्ति स्वतःला देशापेक्षा मोठी समजु लागली तर मग देशसेवा , त्याग, या शब्दांना काय अर्थ राहतो. मुसलमान पंतप्रधान होण्यास तसा आमचा कधीच विरोध नव्हता पण लोकशाहीत तलवार उपसुन मागणी करायची नसते. जीनांनी तलवार उपसली आणि ती गांधींनी भारतमातेच्या छातीत खुपसुन लचका तोडला. अखंड सिंधु नदी हिंदुस्तानातुन निघुन गेली , देशाचा तुकडा पडला. त्याला जितके जीना जबाबदार तितके गांधींही जबाबदार, ते तर परकीय आणि हे स्वकीयच! नाही का? काय कमी निदर्शन केली होती का आम्ही? तेव्हाही बालभवनासमोर निदर्शनच करत होतो, शांततामय निदर्शनं. गांधी जीनांना जेव्हा भेटायला निघाले तेव्हा आम्ही त्याची गाडी अडवली त्यांना सांगितलं नका जीनांशी तडजोड करु, नका देशाचा तुकडा मोडु.पण आपला हा राष्ट्रपिता आपल्या छातीवर पाय ठेऊन पाकिस्तानच्या निर्मितीसाठी सुईणीसारखा त्यांच्या मदतीला धावला. मंत्रिंमंडळाच चुकलं एकच की ते गांधीजींच्या आमरण उपोषणाच्या धमकीपुढे नमले. गांधींनी स्वतःच्या देहाच्या अस्तित्वाला जेव्हा जेव्हा आव्हान उभ केलं तेव्हा तेव्हा मंत्रिमंडळ झुकलं. देशाच्या अहिताचेच निर्णय घेतले गेले. हा देहच यापुढे देशाच्या विनाशाचे कारण ठरणार होता. आज मुसलमान एक तुकडा मागुन घेऊन गेले उद्या शिख मागतील आणि परवा हिंदु मागतील पण हिंदुंच्या तुकड्याचे चा्र्तुवर्णीय चार तुकडे करतील, पुन्हा त्या वर्णांमध्ये उपजाती आहेतच, मग अखंड भारतवर्ष या संज्ञेला काय अर्थ राहतो. ब्रिटीशांची आपण एकत्र का लढलो? भगतसिंगाने फक्त पंजाबच का नाही मागितला? सुभाषचंद्र बोस आझाद हिंद फौज घेऊन फक्त बंगालसाठीच का नाही आले? सुदावरदीने हिंदुची कत्तल केली तेव्हाही आम्ही निदर्शनच करत होतो. सुदावरदी राजदबावाला शरण आला परंतु त्याचे अनुयायी कत्तल करतच होते. आमची निदर्शन सुरु होती आणि गांधींचे आमरण उपोषण सुरु होते. शेवटी हिंदुंनी शस्त्र खाली ठेवली. मला अजुनही आठवतं आहे, एक गरीब हिंदु पुढे आला आणि बापुंना म्हणाला - बापु तुमच्या हत्येच पातक माझ्या कपाळी नको आहे म्हणुन मी शस्त्र तुमच्या पायाशी ठेवतोय. पण मुसलमान मोहल्यात माझं एकच हिंदुच घर आहे - त्या रात्री हैद्राबाद सोडण्यापुर्वी मी त्या हिंदुकडे गेलो. त्याच्या घरी एकच हलकल्लोळ माजला होता. त्याच्या ८ वर्षाच्या मुलाची कत्तल केली होती मुसलमानांनी पण त्याच्याकडे फक्त आक्रोश होता आपल्या मुलाचं कत्तल केलेलं कलेवर माझ्या समोर फेकुन तो मला म्हणाला - जा हे तुमच्या गांधींकडे घेऊन जा, याचं रक्त घेऊन जा आणि त्यांना सांगा पुन्हा उपोषणाला बसलात तर मोसंबीचा रस पिऊ नका याच रक्त प्या.- काहीच बोलु शकलो नाही मी कारण गांधी माझेही राष्ट्रपिता होते. त्यांचा राष्ट्रपिता म्हणुन मीही स्विकार केला होता. क्षणभर अस वाटलं की घुसाव त्या मोहल्यात आणि एकेका मुसलमानाला बाहेर काढुन कापावं.पण मग विचार केला संहारच करायचा तर संरक्षण का? आता जर मी संहार केला तर मीही त्यांच्या इतकाच असंस्कृत ठरेन. नानाने मला तात्यारावांचा सल्ला घेण्यास सांगितले पण मला ते नको होते सतीच वाण घेतलेल्यांना अग्निच भय नसतं पण तात्यारावांच्या कष्टायत्नात माझ्या हातुन चुकुनही एकही संविधा पडायला नको. तात्याराव एकदा म्हणाले होते जर गांधी राजकीय संत असतील तर त्यांनी रामदास स्वामींचा आदर्श ठेवावा गरज पडली तर रामदास स्वामी सदैव शिवबाच्या पाठी उभे होते पण त्यांनी मात्र स्वराज्य उभारणीत कधीही लुडबुड केली नाही. वध करण्याच्या आधी मी नाना आपटे कडुन दोन वचने घेतली, मला आता एकटाच प्रवास करायचा होता कारण मी वध उघडपणे करणार होतो आणि स्वतःला स्वाधीन करणार होतो त्यामुळे नाना माझ्या सोबत असणे त्याच्यासाठी धोक्याचे झाले असते म्हणुन मी नानाला माझी साथ सोडायला सांगितली हे पहिलं वचन. वधानंतर मी लिहिलेला लेख अग्रणीत छापायचा हे नानाकडुन घेतलेलं दुसर वचन. एवढ्या वर्षांची साथ सोडायला सांगताना माझ्या जिवाला जड जात होतं. पण एक वध एक फाशी याच तत्वावर मला पुढची पावलं टाकायची होती. एका वधासाठी मला दोघांना फाशी मला मान्य नव्हती. खटल्यामध्ये मी गांधी हत्या का समर्थनीय आहे? याची माझी बाजु तर मांडणारच होतो. आणि त्यामुळे गांधी हे हिंदुस्तानचे नसुन पाकिस्तानचे राष्ट्रपिता आहेत आणि त्यांचा वध हे अपरिहार्य कर्तव्य आहे याची मला खात्री पटली.

३० जानेवारी १९४८ संध्याकाळी ५ च्या पुर्वी १० एक मिनीटे असताना मी बिर्ला भवनाच्या दाराशी गेलो. दारावरील पहारेकरी प्रार्थनेला जाणार्‍यांचे निरीक्षण करत होते. त्यांचं मला सर्वात अधिक भय होतं, म्हणुन चार पाच लोक जात होते, त्यांच्यातलाच मी एक आहे असं समजलं जावं ही दक्षता घेऊन आत गेलो. ५ वाजल्यावर १० एक मिनीटे होऊन गेली होती. गांधी आणि त्यांच्या जवळचे लोक खोलीच्या आतल्या परिसरातुन प्रार्थना स्थळाकडे निघु लागल्याच मला दिसलं. ते जिथुन अंगणाच्या पायर्‍या चढतील त्या ठिकाणच्या आसपास लोकांच्या आवरणात मी उभा राहीलो. गांधी पायर्‍या चढुन ५-६ पावलं पुढे आले, गांधींच्या भोवताली लोक असले तरी मला हवी असलेली मोकळीक मला मिळतेय एवढं मी बघितलं होतं. मला आणखी ३ सेकंदाचा वेळ हवा होता. दोन पावलं पुढे सरकुन गांधींच्या पुढ्यात जाणं, शस्त्र बाहेर काढणं आणि गांधींनी आपल्या जीवनात जी म्हणुन उपयुक्त देशसेवा केली, त्याग केला त्यासाठी त्यांना वंदन करणं. त्या दोन मुलीतली एक गांधींच्या जवळ होती. तिला दुखापत होईल अशी मला भीती होती. त्यावरील उपाय मनात योजुन मी पुढे सरलो. गांधींना नमस्ते या शब्दात वंदन केलं, एक पाऊल पुढे सरलो आणि............. आधीच क्लेश असलेले गांधी "अह्" असा अस्पष्ट आवाज करतं अचेतन होऊन खाली पडले.


वध झाला आणि मला अटकही करण्यात आली. पोलीस अधिकार्‍यांनी मला रात्रभर जागवल नाही पण ते कदाचित रात्रभर जागले असतील. खरं तर मला त्यांना एकट जागतं ठेवणं तस जीवावर आलं होतं पण मग मी विचार केला, मी दुपारी जागा होतो, पिस्तुल स्वच्छ करत होतो, त्यात गोळ्या भरत होतो. त्यावेळी त्यांनी वामपुक्षी घेतली असेल कदाचित, मग आता ते थोडे जागले तर काय बिघडलं. शांत झोप लागली मला त्या रात्री, अखंड हिंदुस्तानात आम्ही दोघच त्या रात्री शांतपणे झोपलो असु. कोठडीत झोपलेला मी आणि शितगृहात चिरनिद्रा घेणारे गांधी. बाकी सर्व देश धगधगत होता. काहींची कत्तल होत होती तर काही कत्तल करत होते. मातेच्या उदरातील गर्भही त्यारात्री शांतपणे पोहुरले नसतील. माझ्या आई - वडिलांना स.बु. बर्वेंनी आदल्यारात्रीच फरासखान्यावर नेवुन ठेवले, त्यामुळे ते वाचले. पण माझ्या भावाला दत्तात्रयला मात्र मारहाण झाली दुसर्‍या दिवशी तर सकाळ पासुन तर अटकसत्राला सुरुवातच झाली. विष्णु करकरे, डॉ. परचुरे, शंकर किस्तय्या, मदनलाल, नाना आपटे आणि तात्याराव सावरकर, एकेक करत सगळे मंडळी जमा होऊ लागले. तात्यारावांना तर याखटल्यात उगाचच गोवण्यात आल होतं. पण खरं सांगु का? तात्यारावांना अटक झाली याचा मला एक वेगळाच फायदा मिळाला. तो म्हणजे त्यांचा मिळालेला उदंड सहवास, तात्याराव निर्दोष होते त्यामुळे ते निर्दोष मुक्त
होणार ही सर्वांनाच खात्री होती. पण बाहेर असे तात्याराव एकटे कधीच भेटत नसतं. त्यांच्याबरोबर असणारी लोकांची वर्दळ त्यांच लिखाण, सभा. पण इथे तात्याराव फक्त आमचेच होते. खुप शिकायला मिळालं त्यांच्या सहवासात, आयुष्याचे शेवटचे दिवस अगदी चांगले गेले, सत्कारणी लागले. मृत्युंजयच तो मृत्युची सावली सुद्धा त्यांच्यापासुन अंग चोरुन उभी होती. एकदा आम्ही असेच सर्वे गप्पा मारत बसलो होतो. तेवढ्यात एक सिनीयर जेलर राऊंडसाठी आला, आम्हा सगळ्यांकडे एक एक पुठ्याच कार्ड दिलेलं असायचं त्याच्यावर कैद्याच नाव आणि त्याच्यावर लागलेली कलम असायची त्या जेलरला पाहताक्षणी तात्याराव उठले त्यांनी आपल्या पुठ्याच कार्ड छातीशी धरलं जेलर ओशाळला म्हणाला, ' सावरकरजी ये क्या कर रहे है ' तात्याराव म्हणाले, ' क्या कर रहां हुं? यही तो जेल का कानुन है वही तो मै कर रहां हुं.' जेलर म्हणाला, 'मगर बाकी लोक भी तो है, वे तो खडे नही रहें.' तात्याराव म्हणाले, ' वह तो बच्चे है. मै दुबारा हुं.' तुरुंगात दुसर्‍यांदा येणार्‍या कैद्याला दुबारा म्हणतात. तात्याराव खरचं दुबारा होते, स्वातंत्र्यापुर्वीही त्यांनी कारावास भोगला परकीय सरकारशी लढले म्हणुन आणि स्वातंत्र्यानंतर स्वकीय सरकारने त्यांना कारावासच भोगायला लावला. आम्हाला लाल किल्यात ठेवलं होतं. विषेश न्यायालय तिथेच भरायचं न्यायालय नसेल त्यादिवशी मोकळा दिवस असायचा. गप्पा तर अशा रंगायच्या की कोणाला वाटेल सहलीसाठी मित्रमंडळी जमली आहेत की काय. शिक्षेच सावट आम्ही सर्वांनीच मान्य केललं असल्यामुळे ते कोणालाच जाणवलं नाही, ती आम्हाला सावलीच वाटायची आणि मृत्युदंड हा तर मुक्ततेचा मार्गच. फासाचा दोर मला जाणवत होता तो पोलीस अधिकारी, जेल कर्मचारी आणि न्यायमुर्तींच्या चेहर्‍यावर. त्यांच्या चेहर्‍यावरच्या सुरुकुत्या सुंभाने विणल्या आहेत की काय असे वाटतं होतं. पोलीस सुप्रिटंडट शेख चिडचीडल्यासारखे वागत होते. अर्थात ही चीडचीड माझ्यावर नव्हती, स्वतःवरच होती. तिरडी बांधणार्‍यामाणसाची तत्परता त्यांच्या हालचालीमध्ये मला जाणवत होती. तिरडी बांधायला तर हवी पण आपल्या माणसाला आपण आपल्या हाताने शेवटच्या प्रवासाला घेऊन जायचे त्याला अग्नी द्यायचा, या कल्पनेने डोळ्यात अश्रु आल्याशिवाय राहत नाही. अजुनपर्यंत मजबुतपणे तिरडी वाहुन नेणारे खांदे मी तरी पाहीले नाहीत. मृत्यु माणसानाच नाही तर पशुंनाही जाणवायला लागला होता. आम्ही एक मांजराच पिल्लु पाळलं होतं लाल किल्यावर, मोठ मजेत होतं. दिवसभर खेळायचं उन्हात आणि सगळ्यांकडुन दुध वसुल करायचं. कधी माझ्या पांघरुणात येऊन शिरायचं तर कधी नानाच्या कधी तात्यारावांच्या डोक्यावर जाऊन बसायचं. तात्याराव एकदा गमतीने म्हणाले सुद्धा गेल्याजन्मी गोरा साहेब असला पाहीजे. गेल्या जन्मीची हौस या जन्मी भागवुन घेतो. न्यायमुर्ती निकालपत्र वाचणार होते त्याच्या आधीची रात्र, ते पिलू माझ्या अंथरुणाजवळ झोपलं होतं मध्यरात्री अचानक ते ताडकन् उठुन जाग झालं आणि कोठडीतुन पसार झालं. माझ्याबरोबर सावली सारखा चालणारा मृत्यु त्याला जाणवला असेल कदाचित. मला मात्र मृत्यु कधीच टोचला नाही बोचला नाही. जाणीवेच्या गाभार्‍यात कधीच तो सलला नाही. मी कस्तुरी सारखा पचवला असेल बहुदा. त्याचा सुगंध मला कधी जाणवलाच नाही. पण आमच्यात एकटा पडला तो दिगंबर बडगे. तो माफीचा साक्षीदार होता. बडगेचा मला कधीच राग आला नाही. त्याचा विचार मनात आला की फक्त कीव यायची. एखादी गोष्ट सत्सद विवेकबुद्धीने मनात स्मरुन केली तर मग परिणामांना कसं सामोर जायचं हा ज्याचा त्याचा प्रश्न. परिणामांचा विचार केला नाही तर कातडी गमावते पण आतला माणुस एकसंध राहतो तो दुभंगत नाही यालाच सदेह वैकुंठाला जाणे असे म्हणतात. बडगेने पहिला मार्ग स्वीकारला त्यामुळे तो एकाकी पडला. माझी आणि बडगेची फक्त एकदा आणि एकदाच भेट झाली. वरवर ती भेट अपघाती वाटत असली तरी नीट विचार केला तर वाटतं की घटीत होती. इंस्पेक्टर सावंतांनीच ती घडवुन आणली होती. इंस्पेक्टर सावंत हा एक वेगळाच माणुस होता तो जर न्यायासनावर बसला असता तर त्याने आम्हा सगळ्यांनाच मुक्त केलं असतं. बडगेला त्यादिवशी कोर्टात माफीचा साक्षीदार म्हणुन हजर करणार होते, तेव्हा इंस्पेक्टर सावंतांनी बडगेची आणि माझी भेट घडवुन आणली. सांवंतही तिथेच होते कारण सत्याला साक्षीदाराची अडचण येत नसते. बडगेला पश्चाताप झाला होता मी म्हणालो त्याला की पश्चातापाला काही अर्थ नसतो कारण क्रिया आधीच घडुन गेलेली असते. तु चुकला असशील असे तुला वाटत असेल तर तो समज मनातुन काढुन टाक. जगण्यासाठी प्रयत्न करणं जीव वाचवण्यासाठी धडपडण हा गुन्हा नाही. तो धर्म आहे, नव्हे ते प्रथम कर्तव्यच आहे. पण आपला जीव वाचवत असताना आपण इतर कुणाचा जीव अनाठायी घेत नाही ना, याची जाण ठेवावी. तु हिंदु आहेस हे जर तु नाकारलं असतं तर मला तुझी शरम वाटली असती. पण तुझ्या निवेदनाने माझ्या फासाचा दोर भक्कम झाला तरी मला तुझा राग येणार नाही. कारण मी मरणाला सिद्ध आहे. एकास एक हा सृष्टी नियमच आहे गांधी मेले नथुराम मेलाच पाहीजे. फक्त आपले निवेदन सत्य असेल याची काळजी घ्या. आपला जीव वाचवण्यासाठी सुद्धा खोटं निवेदन देऊ नकोस. तात्याराव निर्दोष आहेत. त्यांना अडकवण्याचा खोटा प्रयत्न जर तुझ्या मुखातुन होत असेल तर तुला वरच्या दरबारातही क्षमा नाही. अरे तात्याराव हीरा आहे. आपण फक्त कोंदण, कोंदणाने हीर्‍याचा आकार घ्यायचा असतो हीरा झाकवायचा वेडा प्रयत्नदेखील करायचा नसतो. एवढे सांगुन त्याला तेथुन जाण्यास सांगितले. बडगे आणि माझ्यामध्ये भेट घडवुन दिल्यामुळे इंस्पेक्टर सावंतांचे आभारच ते. सुर्याची काळजी करणारे आपण कोण? सुर्याला ग्रहण लागत अस आपल्याला वाटत, तोही आपल्याचा दृष्टीचा दोष असतो, बघण्याची आपली जागा चुकलेली असते. उद्या माणुस चंद्रावर उतरला तर त्याला
जाणवेल, सुर्याला कधीच ग्रहण लागत नाही.

खटला संपला! मला आणि नानाला फाशीची शिक्षा ठोठावण्यात आली. हा खटला मी स्वतःच चालवला असल्याने वधामागची भुमिका स्पष्ट करु शकलो. आम्हा दोघांना लाल किल्याहुन आता अंबाला येथे नेणार होते कारण फाशीची सोय तिथेच होती. माझी इच्छा होती की येरवड्याला न्यायची, आई - वडिलांचं शेवटच दर्शन घेता आलं असतं. तसा अर्ज करण्याची सुचनाही मला सावंतांनी केली होती. पण आता कुठलीही इच्छा व्यक्त करण्याचा अधिकार मला कसा असणार, मला आठवत होत की जेव्हा मला लाल किल्ल्यात आणल गेल तेव्हा सही करुन माझा चार्ज बॉडी रिसीट म्हणुन घेतला होता . नथुराम गोडसेचा शासकीय कागदपत्रात एकदा बॉडी म्हणुन उल्लेख झाला तेव्हा पासुन माझ्यातला मी उरलोच कुठे होतो. उद्या अंबाल्याच्या पोलीस पार्टीला नथुरामचा चार्ज नव्हे तर बॉडीचा चार्ज देणार आणि तेही बॉडीचाच चार्ज घेणार, आता या बॉडीची डेडबॉडी होणं ही फक्त एक औपचारिकता. आई - वडिलांची भेट व्हावी कारन त्यांना मला शेवटच भेटता याव म्हणुन, दिल्लीला येतानाच त्यांच शेवटच दर्शन झालं, असो. अंबाल्याला जायचं होत म्हणजे पानीपत मधुन चला त्या निमित्ताने त्या पवित्र भुमीच दर्शन तरी झालं. नाहीतर एरवी कशाला जाण झाल असतं. माझा अलिप्तपणा पाहुन सुप्रिटंडट शेखना माझा रागही येत असे. पण खटला चालु असताना त्यांच्या बसण्याच्या जागेवर गुलाबाची फुलं कोण आणुन ठेवतो हा प्रश्न मला नेहमीच पडत असे मी शेखना नेहमीच विचारायचो आणि ते नेहमीच उत्तर द्यायला टाळाटाल करायचे. पण अंबाल्याला जाण्याच्या आधी शेखानी मला माझ्या प्रश्नाच उत्तर दिलं. ती गुलाबाची फुलं त्यांची मुलगी जास्मीन आणुन द्यायची. ती गर्भवती असुनही, माझ्यासाठी ती दररोज दर्ग्यात जाऊन मन्नत मागायची. तिला प्रत्यक्ष जाऊन धन्यवाद देणे तर शक्य नव्हते पण सुप्रिटंडट शेख याच्या मार्फत तिला मी निरोप पाठविला की जर तुला तुझ्या या भावावर इतक प्रेम असेल तर तुला होणार्‍या बाळाची काळजी घे तुला मुलगाच होईल त्याच्यावर माझे संस्कार कर. उद्या जेव्हा या देशाला नथुरामची गरज पडेल तेव्हा हवा असलेला नथुराम तु जन्माला घाल. सुप्रिटंडट शेखांचे डोळे पाणावले. मला म्हणाले, ' पिस्तुलाच्या गोळीचा चाप ओढण्यासाठी मला या वर्दीच चिलखत घालाव लागत पण तु कुठलच चिलखत नसताना चाप ओढलास.' मी त्यांना म्हणालो की मला इतका मोठा करु नका शेख साहेब मी इतका मोठा नाही आहे. माझ्यात मोठेपणा असलाच तर तो इतकाच की ज्या वेळी जे करण गरजेच होत ते मी केलं. परिणामांची कल्पना असताना, पण माझ्याही अंगावर चिलखत होतच. काश्मिरला माझ्या देशातील सैनिकांनी सांडलेल्या रक्ताच चिलखत, फाळणीच्या वेळी माझ्या हिंदु बांधवांच्या रक्ताच चिलखत, माता भगिनींच्या भ्रष्ट झालेल्या शीलाच चिलखत, सावरकरांच्या विचारांच संस्कारांच चिलखत. मी काहीच केलं नाही मी तर फक्त ऋण फेडलं. पण हा नथुराम मातृभुमीकरीता फक्त एकच जीव ओवाळु शकतो याची खंत आहे.' खोट नाही सांगत पण मृत्युची मलाही खंत वाटली, मी मृत्यंजय नाही आहे. फासाच्या दोरावर लटकण्यापुर्वी जेव्हा माझ्या चेहर्‍यावर काळा बुरखा चढवला तेव्हा माझ्या डोळ्यात अश्रु आले या मातृभुमीच दर्शन परत घेता येणार नव्हते, या मातीचा सुगंध, सिंधु नदीचा स्पर्श मला कधीही घेता येणार नाही. या सगळ्यांच दुःख मलाही जाणवलं.

अंबाल्याला नाना आपटे आणि मी पोहचलो. माझी कोठडी फाशीखान्याच्या समोरच होती. फाशी होण्याआधी त्याची रंगीततालीम चालु होती. तुम्हाला वाटेल की अरे फाशीची सुद्धा रंगीततालीम चालते? हो चालते. माझ्या वजनाची बाहुली घेऊन त्याची रेग्युलर हेंगिंग प्रमाणे तालीम होत होती. पण बाहुली बनवताना काहीतरी घोळ झाला होता सगळे घामाघुम झाले होते बिचारे, हेंगिंग स्टाफचे लोक म्हणत की, काय म्हणे मानेला ' प्रॉपर चर्क ' भेटत नाही. मी त्यांना म्हणायचो बाहुलीच्या बदली मला उभे करा, हो पण ते त्यांच्या नियमात बसत नव्हते, असो. फासावर जाण्यापुर्वी हातात काही पकडता येईल का? असा प्रश्न इंस्पेक्टर सावंतांना केलाहोता पण त्यांनी माझ्या प्रश्नाचं उत्तर देण्यास टाळाटाळ केली होती. तसं आमच्याकडे अखंड हिंदुस्तानाचे मानचित्र, भगवा ध्वज आणि भगवतगीता एवढेच सामान होते. ते अखेरच्या श्वासापर्यंत आमच्या जवळ असावे अशी आमची इच्छा होती. येथील जेलरांनी आम्हा दोघांना फासावर जाताना त्या वस्तु बाळगण्याची परवानगी दिली.

फाशीच्या शिक्षेची अंमलबजावणी व्हायला ८ दिवस शिल्लक असताना गांधींचे सुपुत्र देवीदास गांधी मला भेटायला आले. तशी आधी आमची भेट झाली होती एका पत्रकार परिषदेत, ते हिंदुस्तान टाईम्सचे पत्रकार म्हणुन आले होते आणि मी अग्रणीचा संपादक म्हणुन. गांधी वधाच्या दिवशी मला अटक केली तेव्हाही ते मला भेटायला आले होते आणि त्यांना व त्यांच्या परिवाराला झालेल्या वैयक्तिक नुकसानाबद्दल मी त्यांचे सांत्वनही केले. या वधामागील भुमिका काय होती? हे मी तुम्हाला सांगीन असा शब्दही त्यांना दिला होता. तसं खाजगीत भेटणं नियमानुसार शक्य नव्हतं पण जेलर साहेबांनीच तशी सोय केली होती. मी देवदासना म्हणालो, आज कस काय येणं केलत दोन वर्षांनंतर वेळ मिळाला. थोडसं संकुचित मनाने ते मला म्हणाले काही कागदपत्रावर सही हवी आहे तुमची. ती कागदपत्र म्हणजे वकालतनामा त्यांना माझी केस स्वीकारायची होती. देवीदास यांच्या म्हणण्यानुसार मी कोर्टात केस लढवताना काही मुद्दे वगळले होते. त्यांना माझ्या फाशीला आव्हान द्यायचे होते पण मी त्यांना म्हणालो मी वध केला आहे त्यामुळे मला जगण्याचा अधिकार नाही. मी तुम्हाला माझे वकीलपत्र नाही देऊ इच्छित. त्याच कारण त्यांनी माझ्याकडे विचारल मी त्यांना म्हणालो, तुम्ही वकालतनामा पुढे केलात तेव्हाच मी समजलो पण तुम्ही दुखावु नये म्हणुन उत्तर द्यायचे टाळत होतो. गांधींना हिंसा मान्य नव्हती म्हणुन त्यांच्या मारेकर्‍यालाही देहदंड देऊ नये हाच युक्तिवाद आहे तुमचा पण तो कायद्यात बसत नाही वकिलाने कायदा समजवुन मगच वकालतनाम्यावर सही मागायची असते कायद्याच्या कक्षेत भावना व्यक्तिगत हेवेदावे नाहीत. केवळ व्यक्तिगत स्वार्थासाठीच ते माझ्याकडे आले होते. पुढे मी त्यांना म्हणालो तुम्हाला वकिलपत्रच जर स्वीकारायच होत तर तुम्ही तात्याराव सावरकरांच का नाही स्वीकारलं? नाना आपटेंच का नाही स्वीकारलं? या निरपराध माणसांच्या बचावाला तुम्ही का नाही उभे राहीलात? तुम्ही बचावाला उभे राहताय तर नथुराम गोडसेच्या का तर एका गालावर थप्पड मारली तर दुसरा गाल पुढे करायचा हे आपल्या पित्याच तत्वज्ञान सिद्ध करण्याचा क्षीण प्रयत्न म्हणुन. हे ऐकुन देवीदासना कदाचित वाईटही वाटल असेल. एक व्यक्ति या कक्षेपलिकडे एक विचार म्हणुन गांधींचा विचार मी करु शकत होतो तसे देवीदास करु शकत नव्हते. तुम्ही काय विचार केलात? असा सवाल देवीदासजींनी मला विचारला. पण हा प्रश्न विचारायला त्यांनी दोन वर्षे विलंब लावला. तशी मागे मी त्यांना ग्वाही दिली होती. या वधामागचा उद्देश वैयक्तिक कधीच नव्हता उद्देश फक्त राजकीय आणि राजकीयच होता. पण त्यांना मात्र हे पटत नव्हतं आणि कुठेतरी हे पटवुन घेण्याचा प्रामाणीक प्रयत्न ते करत होते त्यासाठीच ते माझ्याकडे आले होते हे माझ्या लक्षात आलं. आणि त्यांनी प्रयत्न केला तो त्यादिवशीच कारण ८ दिवसानंतर नथुरामच्या बचावाचे सारे मार्ग बंद झाले ते शल्य त्यांना आयुष्यभर सलत राहणार होते. आज वेळ गेली तर पुन्हा वेळ येणार नाही. त्यांना मी बसायला सांगितले. आणि म्हणालो की देवीदासजी मी माझ मृत्युपत्र लिहलं आहे त्यात माझी पहिली अंतिम इच्छा काय लिहीली आहे सांगु? सिंधु नदी अखंड हिंदुस्तानात येईपर्यंत माझ्या अस्थी विसर्जित केल्या जाऊ नयेत, मगच त्या सिंधु नदीत विसर्जित कराव्यात. पिढ्यान पिढ्या हस्तांतरीत केल्या तरी चालतील पण त्या जतन कराव्यात. देवीदासजी आपल्या हिंदु धर्मात अस्थी दहाव्या दिवशी विसर्जित करतात तो पर्यंत त्या घराबाहेर बांधुन ठेवतात. अस्थींच विसर्जन होत नाही तोपर्यंत आत्म्याला मुक्ति मिळत नाही असा समज आहे. पण मी जाणुन बुजुन माझा आत्मा बंधनात ठेवणार आहे, त्याला मुक्त होऊ देणार नाही. कारण गांधी जसे तुमचे पिता आहेत तसे ते माझेही राष्ट्रपिता आहेत म्हणुन. गांधींनी शेवटची इच्छा प्रदर्शीत केली होती की त्यांची रक्षा सर्व नद्यांमध्ये विसर्जित केली जावी पण पाकिस्तानने त्यांची रक्षा सिंधु नदीत विसर्जित करायची परवानगी नाकरली जणु काही ते पाक पाणी त्यांच्या रक्षाच्या स्पर्शाने अमंगल होणार होते, तेव्हा मी एक खास पत्र पाठवुन भारत सरकारला विनंती केली होती गांधींच्या रक्षेचा काही अंश तरी जतन करा कारण या देशाचे शुर जवान केव्हा तरी सिंधु नदी हिंदुस्तानात खेचुन आणतीलच तेव्हा ती रक्षा सिंधु नदीत विसर्जित करा आणि हे कधीतरी होईलच कारण हा देशच भगिरथांचा आहे गंगा खेचुन आणणार्‍यांचा आहे. पण माझी विनंती मानली गेली नाही. गांधींचा तो तडफडणारा आत्मा एकाकी पडु नये म्हणुन दहाव्या दिवशी मी माझा आत्माही मुक्त होऊ देणार नाही. मरणांत आणि वैराणी असे सगळेच म्हणतात पण आयुष्यभर जी मुल्य पुजली त्यांना मृत्युनंतरही वंदन करणारा नथुराम एकच असतो. देवीदासजी तुमच्या पित्याशी माझं वैयक्तिक वैर काहीच नव्हतं पण त्याच भौतिक अस्तित्व संपवण्यात माझ्या देशाच भलं होतं. मी विद्वान नसेन देवीदासजी पण विद्वान माणसांच्या सहवासात मी आयुष्याची काही वर्षे काढली आहेत अगदी श्रीमंत नसलो तरी खाऊन पिऊन सुखी होतो. माझही स्वतःच एक स्थान होतं मान मरातम होता. गांधींचा वध करण्यापुर्वी त्यानंतर मी या सगळ्या गोष्टींना मुकणार आहे याची मला जाणीव होती पण मी मृत्यु स्विकारला भेकडासारखा पळुन नाही गेलो मला माझी भुमिका मांडायची होती. कारण माझ्याकडे माझी अशी भुमिका होती, विचार होता. गांधी हे महान होतेच जे सत्य आहे ते मी स्विकारण्याची आणि नाकारण्याची काहीही गरज नाही. दक्षिण आफ्रिकेत वर्णद्वेशाविरुद्ध त्यांनी जो निर्भिड लढा दिला तो स्तुत्यच आहे. भारतात परत आल्यानंतर खेड्यापाड्यात जाऊन खरा भारत बघण्याचा जो प्रयत्न त्यांनी केला तो आदरणीयच होता. दांडी यात्रा, चलेजाव चळवळ, मीठाचा सत्याग्रह या सर्वांमुळे मी स्वतः त्यांचा भक्त होतो गांधींना अटक झाली तेव्हा "साबरमतीनो संत जेल मा छे" या घोषणा माझ्याही ओठांवर होत्या. पण फाळणी अनावश्यक होती, तो गांधींचा निर्णय चुकीचा होता. त्यानंतर निर्वासितांची झालेली कत्तल, काश्मिरला लढणार्‍या आपल्या देशाच्या सैनिकांविरुद्ध पाकिस्तानला मदत म्हणुन दिलेले ५५ कोटी रुपयांच अनुदान हे सगळ अक्षम्य होतं. गांधीनी कधी हिंदु मुस्लिम असा पक्षपात नाही केला पण पाकिस्तानने केला आणि गांधींचा सर्वात मोठा पराभव हाच आहे. गांधींच्या रक्षा सिंधु नदीत विसर्जित करायला त्यांनी नाकारल्या, गांधी गेले तेव्हा पाकिस्तान आकाशवाणीने बातमी दिली की हिंदुंचा एक पुढारी गेला आम्ही गांधींना हेच सांगत होतो गांधी तुम्ही आमचे आहात पण ते म्हणत होते नाही मी तुमचा नाही मी त्यांचा आहे. गांधींचा आणि गांधीवादाचा विरोधक जितका मी नाही तितके त्यांचे शिष्य आहेत.मी गोळी झाडली गांधी कोसळले पडता पडता त्यांच्या तोंडातुन "अह्" असा अस्पष्ट आवाज आला. पण सगळीकडे अफवांच मोहोळ उठलं की गांधी हे राम म्हणाले. माझा जबाब नोंदवताना कोर्टात जबानी घेताना माझ्या मुखातुन हे असत्य वदवण्याचा पुन्हा पुन्हा प्रयत्न केला जात होता पण मी बदललो नाही. गांधी हे राम म्हणालेच नाही तर मी असत्य का बोलु? पण जर त्यांच्या शिष्योतमांनी जर का हा डंका असाच पेटत ठेवला आणि इतिहासात त्याची नोंद झाली तर गांधींचा आणि गांधीवादाचा सर्वात मोठा पराभव ठरेल. देवीदास म्हणाले हे कसं काय होऊ शकतो? मी म्हणालो ज्या माणसाने आयुष्यात कधीही राम आणि रहीम, कृष्ण आणि करीम यांच्यात कधी भेद केला नाही समजला नाही तो माणुस मरताना फक्त रामाचच नाव घेईल राम आणि रहीम दोघांचही घेईल ना आणि कुणा एकाचच जर घ्यायच असेल तर रहीमच घेईल कारण राम त्यांच्या हृदयात होता आणि रहीम मुखात.


१५ नोव्हेंबर १९४९ सकाळी आठ वाजता नथुराम गोडसे आणि नाना आपटे यांना फाशी देण्यात आली हातात अखंड भारताचे मानचित्र भगवा ध्वज आणि भगवदगीता दोघांनीही घेतली होती. फासाचा दोरं गळ्यात अडकवल्यावर दोघांनीही अखंड भारत अमर रहे आणि वंदे मातरम् असा घोष केला. त्यानंतर पायाखालील फळीचा दांडा ओढण्यात आला

जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती - वॉरन बफे

१.त्यांनी वयाच्या अवघ्या अकराव्या (११) वर्षी शेअर बाजारात गुंतवणुक करण्यास सुरुवात केली. आणि तरी देखिल आपण खुप उशीरा सुरुवात केली याची त्यांना खंत आहे.

२. वृत्तपत्रे विकुन मिळवलेल्या कमाईतून त्यांनी एक छोटीशी शेत जमीन विकत घेतली. वयाच्या अवघ्या चौदाव्या वर्षी.

३. ते आजही मिड टाउन येथील त्यांच्या जुन्या ३ बेडरूमच्या घरात राहतात, जे त्यांनी ५० वर्षांपुर्वी त्यांच्या लग्नाच्या आधी घेतले होते. वॉरन बफे यांच्या मते त्यांना मोठ्या घराची गरज नाही. आजही त्यांच्या घराला कुंपणाची भिंत नाही.

४. वॉरन बफे त्यांची कार स्वतःच चालवतात. त्यांना ड्रायव्हर अथवा सुरक्षा रक्षकांची गरज नाही.

५. वॉरन बफे जगातील सर्वात मोठ्या विमान कंपनीचे मालक आहेत. पण ते कधीही स्वतंत्र विमानाने प्रवास करत नाहीत.

६. त्यांची कंपनी बर्कशायर हाथवेच्या (Berkshire Hathaway) मालकीच्या ६३ कंपन्या आहेत. या सर्व कंपन्यांच्या CEO's (कार्यकारी अधिकारी) ना ते फक्त वर्षाला एक पत्र लिहितात. सर्व CEO's ना त्यांनी दोन नियम सांगीतले आहेत. पहिला नियम, कधीही आपल्या गुंतवणुकदारांचे पैसे बुडणार नाहीत याची काळजी घ्या. दुसरा नियम, कधीही पहिला नियम विसरु नका.

७. त्यांना इतर उच्च वर्गीयांबरोबर वेळ व्यतीत करणे आवडत नाही. घरी आल्यावर स्वतःसाठी काही पॉपकॉर्न बनवुन चित्रपट बघणे हा त्यांचा आवडता छंद आहे.

८. बिल गेट्स या जगातील दुसर्‍या श्रीमंत माणसाची त्यांच्याशी पाच वर्षांपुर्वी भेट झाली. बिल गेट्सला तेव्हा वाटले की वॉरन बफेंबरोबर बोलण्या सारखे काहीच नाही त्यामुळे त्यांनी मीटींग साठी केवळ अर्ध्या तासाचा वेळ दिला. मात्र प्रत्यक्षात ही भेट दहा तास चालली. आणि त्या भेटी नंतर बिल गेटस हे वॉरन बफे यांचे भक्तच झाले.

९. वॉरन बफे आजही मोबाइल फोन वापरत नाहीत.तरुणांसाठी वॉरन यांचा सल्ला - "क्रेडीट कार्ड पासुन दुर रहा. खरी गुंतवणुक स्वतःमध्ये करा."

-- पैशाने माणसाला घडवले नसुन माणसाने पैसा बनवला आहे.
-- जितकी साधे जीवनमान राखता येइल तितके साधे रहा.
-- ऐकावे जनाचे करावे मनाचे.
-- ब्रॅंड पाहुन खरेदी करु नका. आपल्याला जे आवडते तेच खरेदी करा.
-- अनावश्यक गोष्टींवर पैसे खर्च करु नका. तेवढेच विकत घ्या ज्याची गरज आहे.
दरवर्षी मी काही धोरणे अवलंबतो, जी पुढे वर्षभर सर्व उलाढालीत माझ्यासाठी दिप स्तंभाचे काम करतात.आणि स्वतहच शिकून घेतलेल्या या धड्यांमुळे दरवर्षी माझे फ़क्त वयच वाढत नाही तर शहाणपणाही तेवढाच वाढतो।

या वर्षी मी तुम्हा सर्वांना पुराणकाळापासून चालत आलेल्या (पण विस्म्रुतीत गेलेल्या)अशाच काही शहाण पणाच्या गोष्टी सांगणार आहे -


* अपार कष्ट करा : मेहनत कधिच वाया जात नाही, पण काम न करता केलेली बाप्ष्फळ बडबड माण्साला लयास नेल्या खेरिज राहत नाही.

* आळस झटकुन टाका : वाळुवर झोपुन राहणारा खेकडा कोणत्याही लाटेबरोबर समुद्रात वाहुन जातो.

* ऊत्पन्न(मिळकत) : कधिही केवळ एका उत्पन्नाच्या साधनावर अवलंबून राहु नका. एका मर्गाने येणाऱ्या १०० रुपयांपेक्षा १०० मर्गांनी येणारा १-१ रुपया नेहमीच चांगला.

* खर्च - आवश्यकते पेक्षा जास्त खरेदी केली तर लवकरच आवश्यक असणारया गोष्टी विकाव्याची वेळ येईल.

* बचत - खर्च करुन उरलेले उत्पन्नाची बचत करण्यापेक्षा, आधी बचत करुन नंतर उरलेले पैसे खर्च करा.

* कर्ज - कर्ज घेणारा हा कर्ज देणरयाचा गुलाम हॊउन जातो.



* जमाखर्च - जमाखर्च मांडणे आणि त्याचा अभ्यास करणे अतिशय मह्त्वाचे आहे. जर बूटच फ़ाटला असेल तर पावसाळ्यात छ्त्रीचा काय उपयोग ?

* हिशोब तपासणे - लहान लहान खर्चांचा ताळेबंद ठेवा, एक छोट्याशा भोकामुळे पुर्ण जहाज बुडू शकते.

* आर्थिक धोका - बरयाच इन्वेस्ट्मेन्ट्स भरपुर फ़ायदा देणरया आणी आकर्षक असतात मात्र त्यात तेवढाच धोका लपलेला असतो. त्यामुळे अशा इन्वेस्ट्मेन्ट्सचा जरा काळजीपुर्वक विचार करुन करा. जर नदीची खोली पहायची असेल तर दोन्ही पाय पाण्यात टाकुन कसे चालेल?
* गुंतवणुक - सर्व अंडी एकाच पारड्यात टाकुन कसे चालेल बरे?

मला खात्री आहे की जे या सर्व सुचनांचे आधीपासून पालन करत आहेत, त्य सर्वांची आर्थिक परिस्थिती उत्तम असेल. आणी मी हे देखिल खात्रीपुर्वक सांगु शकतो, कि जे या सर्व सुचनांचे पालन करायचे ठरवतिल तेही लवकरच आर्थिक सुखाचा आनंद घेतिल. चला आपण सर्वजण हुशार हॊउया आणि एक सुखी, समाधनी आणी शांत जीवन जगुया।