Friday, April 13, 2012

कवी कलश

संभाजी महाराजांचे चरित्र एका व्यक्तिशिवाय पुर्णच होवु शकत नाही आणि ती व्यक्ति म्हणजे कवी कलश. खरे तर कवी कलशांना बखरकारांनी खुपच बदनाम केलेले दिसते. कवी कलशांना बदनाम करण्यामध्ये त्याच लोकांचा हात आहे ज्यांनी शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकावर बहिष्कार टाकला. राजांच्या अभिषेकासाठी महाराष्ट्रातील एकही भट ब्राह्मण पौरोहित्य करण्यास तयार झाले नाही. तेंव्हा राजांनी काशीवरुन गागा भट्टांना आणुन राज्याभिषेक पार पडला. सहाजिकच उत्तरेतील ब्राह्मणांबद्दल महाराष्ट्रातील ब्राह्मणांना राग होता व पुढे त्यांनी तो वेळोवेळी व्यक्त करत कवी कलशाचे बलिदान अडगळीत टाकुन त्यांना बदनाम करण्याची मोहिम सातत्याने चालुच ठेवली. अर्थात जे लोक संभाजी महाराजांना शिव्या देताना मागे पुढे पाहत नाहीत ते कवी कलशाबद्दल अनुदगार काढायला थोडेच कचकणार आहेत. कवी कलश संभाजी राजांचे खुपच विश्वासु असे मित्र होते. कवी कलश ब्राह्मण असुनही तलवार बाजी करण्यामध्ये खुपच पटाईत होते. कदाचित त्यांना शिवाजी महाराजांच्या स्वराज्याची रीत चांगलीच माहिती होती, देशासाठी शस्त्र घेईन हाती हे शिकुनच आले होते.

कवी कलश यांची बुद्धीमत्ता निष्ठा व शौर्य पाहुनच संभाजी राजांनी कवी कलशांना अष्टप्रधान मंडळात सामिल करुन घेतले व त्यांना छंदोगामत्य अशी पदवी दिली. अर्थात कवी कलश जेवढे संभाजी राजांच्या जवळ गेले तेवढे महाराष्ट्रातील नतद्रष्टांच्या डोळ्यात खुपायचे म्हणुनच अष्टप्रधान मंडळाची भट कंपनी एकत्र येवुन कवी कलशांना कोंडीत पकडण्याचा नेहमीच प्रयत्न करायचे. कवी कलश एवढे बुद्धीमान होते की संभाजी राजे बहुतेक निर्णय त्यांच्या सल्लामसलती नंतरच घ्यायचे परंतु त्यांचा एखादा निर्णय किंवा मोहीम बाहेर फुटली असे कधीच घडले नाही यावरुन कवी कलशांची विश्वसनीयता स्पष्ट होते आणि म्हणुनच संभाजी राजांनी त्यांना पुढे कुलमुख्तेयार म्हणजे प्रशासनाचे प्रमुख म्हणुनही जबाबदारी दिली होती. कवी कलश शाक्तपंथीय होते त्यानुसार ते शक्ती पुजा करायचे. तेंव्हा येथील सांप्रदायाचे मंडळींनी त्यांच्याबद्दल ते मेलेल्या रेड्याच्या कातड्यावर पुजा करतात, बळी वगैरे देतात असा निखालच खोटा प्रचार करुन त्यांची विश्वसनियता व लोकप्रियता संपवीण्याचा प्रयत्न केला. कवी कलशांना अशा अनेक अपमानजन घटनांना सामोरे जावे लागले.

एकदा तर ते महाराष्ट्र सोडुन जाण्याच्या तयारीतच होते परंतु संभाजी राजांनी समजुन घालुन तुमच्या एवढा भरवसा आम्ही दुसर्‍या कोणावर ठेवु शकत नाही असे ठणकावुन सांगत आग्रह केल्यामुळेच ते पुढेही तेथेच राहीले. परंतु आपल्या कर्तव्यात कोठेही कुचराई येऊ दिली नाही याच कवी कलशांनी संभाजी राजांच्या गैर हजेरीत शहाबुद्दीन खानने रायगडावर केलेले आक्रमण रायगडाच्या वेशीवरच मोडुन काढले. याच कलशावर राजांनी कुडाळ व डीचोलीचे बारुदखाने चालवण्याची जबाबदारी दिली होती. याच कलशांनी जेंव्हा गणोजी शिर्केंनी प्रल्हाद पंतसारख्या जुन्याशिलेदाराला पैशाचे आमिष दाखवुन पन्हाळा मुघलांच्या घशात घालण्याचा प्रयत्न केला तेंव्हा रायगडावरुन विशाळगड व तेथुन ३ हजारांची फौज मलकापुर येथे तातडीने पन्हाळगडावर चढवुन पन्हाळा वाचवीला होता तो पर्यंत संभाजी राजे पश्चिमेकडुन येऊन किल्यावर थडकले होते. पन्हाळा ही स्वराज्याची उपराजधानीच मुकबर खानाने बळकवण्याचा प्रयत्न कवी कलशांच्या प्रसंगावधानाने हाणुन पाडता आला.

संभाजी राजांनी औरंगजेबाशी होणार्‍या अखेरच्या लढाईची योजना बनविण्यासाठी संगमेश्वर येथे जी निवडक लोकांची बैठक घेतली त्यात कवी कलशही जातीने हजर झाले होते. संभाजी राजांबरोबर लढता लढता तेही कैद झाले होते औरंगजेबाने त्यांचा प्रचंड छळ करु पाहीला. त्यांना वेगळे भेटायला बोलवुन जहांगिरीचे आमिष दाखविले. परंतु कवी कलश बादशहाच्या आमिषाला न धजता स्वराज्याच्या खाल्या मिठाला जागले. औरंगजेबाने पुन्हा एकदा कवी कलशाचे मन तपासुन पाहीले कवी कलशांना अगदी आगतीक होवुन विनंती केली. अरे काय जादु आहे शिवाजीची आणि संभाजीची इथल्या मुलखावर व लोकावर अरे राजा कैद झाला, सेनापति मारला गेला तरी हे मराठे शरण येत नाहीत कोणत्या मातीचा स्वाभिमान यांच्या रक्तात भरला आहे. संभाजीची धिंड काढली प्रचंड अपमान केला तरीही मराठे चालुन आले नाहीत कि महाराणी येसुबाई रायगड सोडत नाहीत. या पेच प्रसंगातुन आपणच मार्ग काढु शकता तेंव्हा तुम्ही संभाजी राजांचे विश्वासु सहकारी आहात छंदोगामत्य आहात तुमच्यावर मराठी फौजेचा आणि स्वतः येसुबाईचा विश्वास आहे त्यामुळे तुम्ही एवढेच करा की संभाजी राजांच्या नावाने कागद तयार करुन सही शिक्यानिशी रायगडावर पाठवा व संभाजी राजांच्या जिवीत रक्षणासाठी सर्व किल्यांच्या चाव्या देवुन सर्व किल्ले आमच्या ताब्यात द्या त्याच्या बदल्यात तुम्हाला हवी तेवढी उत्तरेकडील जहांगिरी देऊ शिवाय कुराणाची शपथ घेऊन सांगतो कि संभाजीला जिवदान देवु. औरंगजेबाला वाटले, महाराष्ट्रातील काही वतनाला चटावलेले बांडगुळ वतनदार जसे जहांगिरीला भाळले तसे कवी कलशही भाळतील परंतु बादशहाची अपेक्षा फोल ठरली.

कवी कलशाने अशा अनेक प्रकारच्या धोकेबाजीचा ठाम नकार देवुन उलट बादशहाच्या धोकेबाजीचा पाढाच त्यास वाचुन दाखविला. अशा बेईमान माणसांवर जगातील कोणतीही व्यक्ति विश्वास ठेऊ शकत नाही हे ठणकावुन सांगितले. तेंव्हा राग अनावर होवुन औरंग्याने कवी कलशांची जीभच छाटली. पुढे पुढे संभाजी राजांवर जो अमानुष प्रयोग केला जायचा त्याची रंगीत तालीम औरंग्या कवी कलशांवर करायचा जेणेकरुन कवी कलशांचे हाल पाहुन संभाजी राजे गहीवरुन शरण येतील परंतु जीवलग मित्रांना वेगळे करुन पाहिले, आमिषे दाखविली व शेवटी अनेक अन्वित अत्याचार केले गेले प्रसंगी जीव दिला परंतु कवी कलशांनी महाराष्ट्राशी व स्वराज्याशी व संभाजी राजांशी ईमान राखत आपल्या देहाचे बलिदान याच महाराष्ट्राच्या भुमीवर संभाजी राजांच्या अगोदर दिले. संभाजी राजांबरोबर एवढ्या हाल अपेष्टा भोगणारा प्रत्यक्ष मृत्युलाही सामोरे जाणार्‍या कवी कलशांचा हा महाराष्ट्र नेहमीच ऋणी राहील. संभाजी राजांच्या चरित्रात या कवीला अमर रुप प्राप्त झाले आहे. अशा प्रकारचे योगदान महाराष्ट्रातही १६०० किलोमीटरहुन आलेल्या कवी कलशाने दिले आहे. हे महाराष्ट्रातील जनतेने कधीच विसरु नये.

No comments:

Post a Comment